मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (12:24 IST)

जगातील सर्वाधिक उंचीवरचे पोस्ट ऑफिस

देवाची भूमी अशी ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती व्हॅली मध्ये पर्यटकांना अनेक आकर्षणे आहेत. म्हणजे निसर्गाची आवड असलेल्यांना डोळ्याचे पारणे फेडतील अशी दृश्ये आहेत.
 
धार्मिक पर्यटनाची आवड असेल तर अनेक बौध्द मठ पाहता येतील. या पर्यटनात जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पोस्ट ऑफिस पाहण्याचा अनोखा अनुभव नक्कीच घेता येईल. लाहोल स्पितीच्या खडबडीत दुर्ग रस्त्यावरून प्रवास करून पहाडात वसलेल्या हिक्कीम या गावी हे पोस्ट ऑफिस आहे. 1983 पासून सुरु झालेल्या या पोस्टाने अनेक गावांच्या लोकांना जगाशी जोडले आहे. स्थापनेपासून गेली 34 वर्षे येथे रीन्चेन शेरिंग हेच पोस्टमास्तर म्हणून काम करत आहेत. येथे लोक पत्रे टाकायला येतात, पैसे काढायला येतात तसेच पर्यटक येथून दुसर्‍या देशात संदेश पाठविण्यासाठी येतात.
 
प्रचंड बर्फ पडणारा हा भाग असल्याने हे पोस्ट हिमवर्षावाच्या काळात 6 महिने बंद असते. या भागाला मिनी तिबेट असेही म्हटले जाते. लाहोल स्पिती हे प्रथम दोन वेगळे जिल्हे होते ते आता एकत्र केले गेले आहेत. येथे बौद्ध मठ खूप प्रमाणात आहेत. त्यातील ताबो हा मठ 1 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. या मठाच्या आवारात 9 मंदिरे 4 स्तूप आहेत. जागतिक वारसा स्थळात या मठाचा समावेश केला गेला आहे. या मठाला हिमालयातील अजंठा असेही म्हटले जाते.