1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (14:32 IST)

प्रकाश आंबेडकरांना भाजपच्या अनुप धोत्रेंचं आव्हान, मविआ उमेदवार देणार का?

prakash ambedkar
काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून भाजपनं बालेकिल्ला बनवलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे अकोला मतदारसंघ. पण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकीर्दीचं केंद्रस्थान असल्यानंही हा मतदारसंघ महत्त्वाचा ठरतो.
 
या मतदारसंघामध्ये भाजपनं सलग चारवेळा खासदार बनलेले संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रेंना उमेवारी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय धोत्रे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची गणितं जुळली नसल्यामुळे पुन्हा एखदा आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळं वंचितनं प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी अकोल्यातून जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीचं चित्र मात्र अद्याप स्पष्ट नाही.अकोला लोकसभेचा गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहता याठिकाणी भाजपविरोधी आघाडी आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांच्या विरोधातच दंड थोपटत असल्याचं पाहायला मिळतं. तेही भाजपच्या इथल्या यशाचं एक कारण असल्याचं ठळकपणे पाहायला मिळतं.
 
प्रकाश आंबेडकरांनी दोनवेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत केलं आहे. तसं असलं तरी त्यानंतर मात्र त्यांना सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
 
वडिलांच्या जागी मुलाला संधी
संजय धोत्रे यांनी मतदारसंघांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून एकप्रकारची पकड तयार केलेली आहे. पक्ष आणि संघटनेच्या वाढीसाठीही संजय धोत्रे यांनी काम केल्याचं पाहायला मिळतं.
 
त्यामुळंच यावेळी संजय धोत्रे स्वतः निवडणूक लढवणार नसले तरी त्यांच्याच घरात त्यांच्या मुलाला लोकसभेचं तिकिट देण्याचा निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आलेला आहे. संजय धोत्रे यांच्या कामाची ही पावती असल्याचं समजलं जातं.
 
अनुप धोत्रे यांच्या रुपानं मतदारसंघाला उच्चशिक्षित आणि तरुण उमेदवार दिला असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे. वडिलांकडून राजकारण आणि जनसंपर्काचे धडे गिरवले असले तरी थेट निवडणूक लढवण्याचा अनुप धोत्रे यांना अनुभव नाही.
 
शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योजक म्हणून विविध व्यवसाय सांभाळत ते वडिलांच्या साथीनं पक्ष संघटनेसाठी काम करत आहेत. पण ते गेल्या काही महिन्यांपासूनच सक्रिय झाले असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळंच भाजपमधील एक गटही या उमेदवारीवर नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे.
 
काँग्रेसच्या निर्णयावर गणित अवलंबून
वंचित बहुजन आघाडी थेच महाविकास आघाडीबरोबर निवडणूक लढवत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण तसं असलं तरीही त्यांनी सात मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे.प्रकाश आंबेडकरांच्या या प्रस्तावाचा अकोला लोकसभा मतदारसंघाशी संबंध जोडला जात आहे. वंचितच्या पाठिंब्याच्या मोबदल्यात काँग्रेसनं अकोल्यात त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे. प्रकाश आंबेडकरांनी मात्र अद्याप तसं काहीही म्हटलेलं नाही.काँग्रेसचा विचार करता अकोल्यातून अभय पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसत आहे. पाटील यांना उमेदवारी दिल्यास भाजपसमोर ते तगडं आव्हान उभं करू शकतात, असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे.काँग्रेसच्या उमेदवारीवर या मतदारसंघातली अनेक गणितं अवलंबून आहेत. पण प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला उमेदवारी जाहीर करायला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं कदाचित अगदी शेवटच्या क्षणी अभय पाटील यांचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं.
 
मतदारसंघाचा इतिहास
लोकसभेतील प्रतिनिधित्वाचा विचार करता पहिल्या निवडणुकीपासून ते जवळपास तीन दशकांहून अधिक काळ अकोला मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला पाहायला मिळतो.
 
पहिल्यांदा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचून आणला तो विदर्भातले भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांनी. 1989 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा याठिकाणी खासदारकी मिळवली. तेव्हापासून सलग तीन वेळा पांडुरंग फुंडकर यांनाच अकोल्यातील मतदारांनी लोकसभेत पाठवलं.
 
पण 1998 आणि लगेचच 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत अकोलेकरांनी प्रकाश आंबेडकरांच्या बाजुनं कौल दिला आणि त्यांनी दिल्लीत अकोल्याचं प्रतिनिधित्व केलं.
त्यानंतर 2004 ला झालेल्या निवडणुकीत भाजपनं संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पुन्हा भाजपला इथून विजय मिळवून दिला. तेव्हापासून सलग चार टर्म संजय धोत्रे हेच या मतदारसंघातील खासदार राहिले आहेत.
 
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचीही मतदारसंघामध्ये चांगली पकड असल्याचं पाहायला मिळालं आहे. पण तसं असलं तरी लोकसभा किंवा एकूण निवडणुकांमध्ये त्यांचं मतांचं गणित जुळून येत नसल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
2019 ला काय घडले?
प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग हा या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचं पाहायला मिळालं होतं.
 
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या आघाडीला फक्त एकच खासदार निवडून आणण्यात यश आलं असलं तरी राज्यात अनेक मतदारसंघात या आघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक भूमिका बजावली. तेच अकोल्यातही झाल्याचं पाहायला मिळालं.
 
अकोल्यात 2019 मध्ये संजय धोत्रे यांनी साडेपाच लाख मतं घेत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर यांना पावणे तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस उमेदवारालाही अडीच लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती.त्यामुळं जागांचा विचार करता वंचितचा प्रयोग यशस्वी झाला नसला तरी राज्यातील प्रकाश आंबेडकरांची नेमकी शक्ती काय? याचा अंदाज त्यांच्यासह इतर सर्व पक्षांना आला. पण अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना किंवा विरोधकांना भाजपविरोधात विजय मिळवण्याचं सूत्र अद्याप जुळवता आलेलं नाही.
 
गेल्या चार वर्षांत काय घडले?
अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड या विधानसभा मतदारसंघांचा प्रामुख्यानं समावेश होतो.
 
2019 मध्ये लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही या जिल्ह्यात भाजपचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं होतं. बाळापूर आणि रिसोड वगळता इतर चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले.राजकीय घडामोडी किंवा बदललेल्या राजकीय गणितांचाही त्यामुळं या मतदारसंघावर फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची फार मोठी शक्ती दिसत नाही. त्यामुळं त्यांच्यातील विभाजनाचा इथं फार काही परिणाम झालेला नाही.
 
उलट प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी यांच्या एकत्र येण्याच्या शक्यता मावळल्या असल्यामुळं पुन्हा एकदा याठिकाणी युती, आघाडी आणि आंबेडकर अशी तिरंगी लढतच पाहायला मिळणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
 
तिरंगी लढत भाजपच्या फायद्याची?
अकोला मतदारसंघाचा विचार करता भाजप पक्ष आणि खासदार संजय धोत्रे यांनी अनेक वर्ष केलेलं संघटनात्मक काम यामुळं इथं त्यांचा पाया पक्का झाल्याचं पाहायला मिळतं. पण गेल्या काही निवडणुकांमधला मतांचा ट्रेंड पाहता आणखी एक गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडल्याचं पाहायला मिळतं.
 
ती बाब म्हणजे भाजपच्या विरोधातील असलेल्या मतांचं होणारं विभाजन. गेल्या तीन किंवा चार लोकसभा निवडणुकांची आकडेवारी पाहता, प्रत्येकवेळी आंबेडकर आणि काँग्रेस यांना एकत्रितपणे मिळणारी मतं ही भाजपच्या संजय धोत्रेंना मिळालेल्या मतांच्या जवळपास किंवा जास्तही राहिल्याचं दिसतं.
 
त्यामुळं मतदारसंघात तिरंगी लढत असणं हे भाजपला फायदेशीर ठरल्याचं दिसून येतं. या मतदारसंघात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांना मिळणारी मतं एकत्र आल्यास भाजपसमोर मोठं आव्हान उभं करायला विरोधकांना यश मिळू शकतं हे अगदी स्पष्ट आहे.
 
अकोला शहरात झालेली दंगल हादेखील या निवडणुकीमध्ये चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा निवडणुकीत ध्रुवीकरण करून मतं आपल्या बाजुनं वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
 
गेल्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची आघाडी असल्यानं मिळालेली मुस्लीम मतंही यावेळी विभागली जाऊ शकतात. त्यामुळं यावेळी महाविकास आघाडी अकोल्यातून कुणाला मैदानात उतरणार यावरही बरंच काही अवलंबून असेल.

Published By- Priya Dixit