1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (12:07 IST)

जळगाव लोकसभा : भाजपचे धक्कातंत्र, स्मिता वाघांना उमेदवारी; कशी होईल लढत?

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे.
गेल्या काही वर्षांतील राजकीय समीकरणांनं युतीचं समीकरण बदललेलं असलं तरी या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळालं.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं हा जिल्हा यावेळी नेमका कुणाच्या बाजूनं उभा राहतो. कोणत्या शिवसेनेची शक्ती अधिक ठरते यावर सगळी समीकरणं अवलंबून असणार आहेत.
जागावाटपाचा विचार करता महायुतीनं यावेळी मतदारसंघातला उमेदवार बदलला आहे. घोषणा होईपर्यंत उन्मेष पाटील यांचीच उमेदवारी कायम राहणार असा विश्वास सगळ्यांना होता. पण भाजप नेतृत्वानं जळगाव मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करत ऐनवेळी स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केली. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं राहणार असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडं तसा ताकदीचा उमेदवार नसल्याचं कारण यासाठी दिलं जात आहे.
तिकिट कापल्यानं नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांच्या नाराजीचा फायदा घेत उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या पत्नीलाच रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
त्यामुळं उमेदवारीचं हे गणित स्पष्ट झाल्यानंतर याठिकाणच्या लढतीचं चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट होईल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
 
धक्कातंत्राचा फायदा की फटका?
खान्देशातील महत्त्वाच्या अशा जळगाव मतदारसंघामध्ये भाजपनं उमेदवार बदलल्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत. स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यामुळं मावळते खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याचं दिसून आलं आहे.
 
उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रचाराच्या किंवा पक्षाच्या इतरही बैठक किंवा कार्यक्रमांमध्ये उन्मेष पाटील यांनी अनुपस्थिती जाणत आहे. हाच त्यांच्या नाराजीचं सर्वांत मोठा पुरावा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
आता भाजपचं हे धक्कातंत्र आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या नाराजीचा भाजपला फायदा होणार की तोटा हे काही दिवसांनी स्पष्ट होईल. पण विरोधी महाविकास आघाडी सध्या तरी याचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.
 
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटानं जळगावमधून स्मिता वाघ यांच्या विरोधात तिकीट कापलेल्या उन्मेष पाटलांच्या पत्नी संपदा पाटील यांना उतरवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
 
उन्मेष पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी प्रचंड प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले होते. पण तरीही त्यांना यश आलं नाही. त्यामुळं त्यांच्यासह त्यांचे समर्थकही नाराज आहेत. त्यामुळं त्यांच्या पत्नीला ठाकरे गटानं मैदानात उतरवलं तर ही लढाई तुल्यबळ होऊ शकते.
 
जळगाव मतदारसंघाचा इतिहास कसा राहिलाय ?
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या 35 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे.
 
मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचेच खासदार निवडून आलेलं पाहायला मिळतं.
 
पण त्यापूर्वी देशभरातील इतर सगळ्याच मतदारसंघांप्रमाणं इथंही काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. काँग्रेसचे हरि विनायक पाटसकर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार होते.
 
त्यानंतर शिवराम राणे, एस.एस.सय्यद, कृष्णराव पाटील, यादव महाजन अशा काँग्रेसच्या अनेक खासदारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं.
 
पण नंतर गुणवंतराव सरोदे यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला. त्यानंतर यशवंत महाजन, हरिभाऊ जावळे आणि ए. टी. पाटील यांनी भक्कमपणे धुरा सांभाळत याठिकाणचा भाजपचा बोलबाला कायम ठेवला. तर गेल्यावेळी उन्मेष पाटील याठिकाणी भाजपकडून निवडून आले होते.
 
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं बळ वाढलेलं पाहायला मिळत होतं. तरीही शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला असल्यामुळं शिवसेनेनं याठिकाणी कधी उमेदवार मैदानात उतरवला नाही.
 
त्यामुळं यावेळी या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एक नवी नोंद नक्कीच होणार आहे. कारण भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात असलेला प्रमुख उमेदवार हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा असणार आहे.
 
2019 मध्ये काय घडलं?
भाजपनं जळगाव मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकिट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं उन्मेष पाटलांबरोबरच त्यांच्या पाठीशी असलेला गट नाराज आहे.
 
पण याच उन्मेष पाटलांसाठी 2019 च्या निवडणुकीत स्मिता वाघ यांची उमेदवारी टळली अशा चर्चा होत्या. स्मिता वाघ 2019 मध्येच निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या. पण त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही.
 
भाजपनं गेल्यावेळीही ए. टी. पाटील यांचं तिकिट कापून उन्मेष पाटील यांच्या रुपानं नवीन उमेदवार मैदानात उतरवला होता. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्या रुपानं आघाडीनं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता.
 
पण निवडणुकीत भाजपचे उन्मेष पाटील हे चार लाखांपेक्षा जास्त अशा प्रचंड बहुमतानं विजयी झाले होते.
वंचित किंवा इतर कशाचाही फारसा फटका बसला नसतानाही राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
 
शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार म्हणून उन्मेष पाटील यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यामुळं ते या मतदारसंघात मोठी इनिंग खेळणार असा अंदाज बांधला जात होता. पण एकाच संधीनंतर त्यांचं तिकिट कापलं गेलं आहे.
 
गेल्या 4 वर्षांतली परिस्थिती
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत युती फिस्कटली आणि त्यांनंतर भाजप शिवसेना वेगळे लढले.
 
त्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्याचा विचार करता सहापैकी तीन आमदार निवडून आणत शिवसेनेनं शक्ती दाखवून दिली.
 
पण महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर शिवसेनेत आलेल्या भूकंपामुळं शिवसेनेची ही सगळी शक्ती पुन्हा भाजपकडं झुकल्याचं पाहायला मिळालं.
 
शिंदेंनी केलेल्या बंडखोरीत गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि किशोर पाटील हे तिन्ही आमदार शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले.
 
त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार भाजपमध्ये गेल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांचं बळही नक्कीच भाजपला मिळालं. त्यामुळं भाजपच्या बाजूनं तिन्ही पक्षांचं बळ एकवटल्याचं दिसत आहे.
 
पण त्याचवेळी फुटीनंतर उद्धव ठाकरे गटानंही जिल्ह्यात शिवसेनेच्या बळकटीकरणाकडं लक्ष दिलं. आदित्य ठाकरे यांनी याठिकाणी संघटना मजबूत करण्यासाठी भरपूर वेळ देत प्रयत्न केले. त्यामुळं महाविकास आघाडीनं या ठिकाणी शिवसेनेलाच उमेदवार देण्यास सांगितलं आहे.
 
शिवसेनेनंही याठिकाणाहून उमेदवार अंतिम केल्याचं समोर येत होतं. हर्षल माने यांच्या नावावर एकमत होणार असं सांगितलं जात होतं. पण भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना आता उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जात आहे.
 
शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल?
जळगाव जिल्हा हा प्रामुख्यानं केळी आणि कापूस उत्पादन होणारा जिल्हा आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील बहुतांस समस्या किंवा मुद्दे हे शेतकरी किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत असलेले आहेत.
 
सिंचनाचा मुद्दा, दळण-वळणासाठी रेल्वे थांब्यांचा मुद्दा, प्रक्रिया उद्योग अशा अनेक समस्यांवर राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं मत याठिकाणाहून समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
उद्योगधंद्यांचा अभाव आणि परिणामी तरुणांमध्ये असलेली बेरोजगारी हाही मुद्दा या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय आहे. ग्रामीण भागातील मतदारांची संख्या पाहता हे मुद्दे निवडणुकीवर परिणाम करणारे ठरू शकतात.
असं असलं तरी बहुतांश निकाल हे राजकीय समीकरणं आणि नेत्यांचा प्रभाव यावर अवलंबून असतात. तसा विचार करता मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघावर प्रभाव असलेला पाहायला मिळतो. भाजपची पक्षबांधणी आणि महाजनांच्या नेतृत्वाखाली भाजपचं काम यावर त्यांची भिस्त असल्याचं पाहायला मिळतं.
 
एकनाथ खडसे यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये वर्चस्व असलं तरी, ते तेवढ्या सक्रियपणे मैदानात उतरले नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. खडसे शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत असूनही इथं शरद पवार गटानं त्यांच्याकडं उमेदवार नसल्याची भूमिका घेतली. यातच सगळंकाही आलं आहे.
 
दुसरीकडं शिंदे गट भाजपबरोबर असला तरी त्यांच्यात काही प्रमाणात नाराजी आहेच. विधानसभेला भाजप शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देते. त्याचा राग शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात पाहायला मिळतो. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सोबत आल्यानं महायुतीची शक्ती वाढल्याचंही चित्र आहेच.
 
एकूणच उन्मेष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी भाजपसाठी धोकादायक ठरणार का? यावरच या मतदारसंघाचं भवितव्य बऱ्याच अंशी अवलंबून असणार आहे. त्यामुळं सगळ्यांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडं लागलेल्या आहेत.
 
Published By- Priya Dixit