शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (09:35 IST)

शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर राजीनामा सत्र सुरु

congress
धुळे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेससाठी सोडण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री शोभा बच्छाव यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलं. मात्र, शोभा बच्छाव यांचं नाव जाहीर होतात काँग्रेसमधीलच पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांना कडाडून विरोध केला जात  आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
 
गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शाम सनेर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शाम सनेर यांचा कंठ दाटून आला होता. पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राजीनामा दिला असून पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया शाम सनेर यांनी व्यक्त केली आहे.
 
दरम्यान,  डॉ. शोभा बच्छाव यांचं धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून नाव जाहीर होताच धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजेंद्र पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर तिकीट वाटपामध्ये घोळ झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला असून लवकरच काँग्रेसमधील इतरही पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
 
सकाळीच काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी देखील आपला राजीनामा तयार करून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवला आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र चालू झालं असून विजेंद्र पाटील यांच्या पाठोपाठ लोकसभा मतदारसंघ समन्वयक कुलदीप निकम यांनी देखील राजीनामा दिला आहे. याच पाठोपाठ सोनू झालसे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर अजून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा  रंगत आहेत
 
दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने नाशिक काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी देखील बंड केलं आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor