शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

तिहेरी जाणिवेचा एकच 'गंध' !

PRPR
मराठी चित्रपट आता नवनवे आयाम, नवे विषय हाताळतोय. नव्या जुन्या पिढीची एकात्म साथ यांमुळे अनेक प्रयोग चित्रपटात होऊ लागलेत. त्याच्याच पुढचं एक पाऊल म्हणजे गंध हा मराठी चित्रपट. 'फ्लॅशबल्बस् व्हेंचर' ही तीन ध्येयवेड्या तरुणांची संस्था आपली पहिली मराठी निर्मिती गंध घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

कुठलाही चि‍त्रपट ध्वनी, प्रकाश, रंग, आकार इ. यांचा दृकश्राव्य अनुभव देतो पण गंधाचा - वासाचा अनुभव मिळत नाही. तो अनुभव हा चित्रपट देणार आहे. सुंगंधाचा दरवळ घेऊन येणरा गंध हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

गंध हा चित्रपट अनेक दृष्टीने मराठी चित्रपटांची चाकोरी मोडणारा आहे. एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा या निमित्ताने पाहावयास मिळणार आहेत. मराठीत असा प्रयत्न प्रथमच होत आहे. गंध या एकमेव मध्यवर्ती सुत्रानं बांधलेल्या तीन वेगवेगळ्या अवकाशात घडणार्‍या या कथा तेवढ्याच तरलतेने उलगडत जाणार्‍या आहेत.

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी, अमृता सुभाष, नीना कुलकर्णी या प्रतिभावान कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवुड स्टार आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करतोय.

PR
गंध ही मध्यवर्ती कल्पना असलेल्या या चित्रपटाचं शिवधनुष्य 'फ्लॅशबल्बस् व्हेंचर' या संस्थेने उचलले आहे. प्रीतम भंडारी, राजेश गोयल आणि संदीप कांकरिया या तीन मित्रांची 'फ्लॅशबल्बस् व्हेंचर' ही नव्या युगाचा मंत्र जपणारी संस्था सतत नवनवी आव्हाने स्वीकारुन ती उत्तमरितीने पेलत आली आहे. कॉलेजपासून एकत्र असलेले हे तिघे मित्र आज विविध क्षेत्रात उद्योजक म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांचा जिवलग स्नेह आणि एकत्र येऊन एक उत्तम कलाकृती देण्याचा सच्चा ध्यास यांमुळे त्यांनी नव्या जनरेशनचा जागतिक दर्जाचा मराठी चित्रपट निर्माण करण्याचे ठरविले.

सतत आव्हानांशी खेळणार्‍या या शिलेदारांनी गंधचा वेगळा कन्सेप्ट आव्हान म्हणूनच स्वीकारलाय. मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून देणं, अधिक उंचीवर नेणं हे आमचं ध्येय असून गंध द्वारे आम्ही मराठी चित्रपट नव्या युगाशी, या शतकाशी रिलेट करू पाहत आहोत अशी माहिती निर्मात्यांनी दिली.

PR
गंध या चित्रपटाचं दिग्दर्शन करताहेत सचिन कुंडलकर. रेस्टॉरेंट, निरोप या नव्या जाणिवांच्या चित्रपटांचे संवेदनशील दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकर परिचित आहेत. अनेक नाटकांच्या, एकांकिकांच्या लेखनाचा अनुभव गाठीशी असलेल्या कुंडलकर यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद लिहिले आहेत. तसेच अर्चना कुंडलकर यांच्या साथीने कथालेखन केले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट एक नवा अनुभव असतो. तीन कथांच्या त्रिज्येचा गंध हा एक बिंदू अधोरेखीत करणारा हा चित्रपट त्यांचा वेगळ्या दिग्दर्शन शैलीचा अविष्कार ठरेल, अशी आशा आहे.

गंध च्या निमित्ताने एक निराळ्या अनुभूतीचा प्रेक्षक आस्वाद घेऊ शकतील असा विश्वास कार्यकारी निर्माते रणजित गुगळे यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाची घोषणा प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, निर्माते व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकतीच पुण्यात करण्यात आली. येत्या काही दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरू होणार असून लवकरात लवकर हा जगावेगळा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या करीता आम्ही प्रयत्नशील आहोत असे निर्मात्या त्रयींनी या प्रसंगी सांगितले.