मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (11:44 IST)

बाळापूर किल्ला

बाळापूर किल्ला हा महाराष्ट्राच्या विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध शेगाव येथून 19 किमी अंतरावर हे बाळापूर गाव आहे. 33 फूट उंच या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
 
हा किल्ला औरंगजेब बादशहाचा दुसरा शहजादा आज्जमशहाने सन 1721 साली बांधायला सुरुवात केली होती. पुढे त्याचे बांधकाम इस्माईल खान या अचलपूरच्या नवाबाने सन 1757 मध्ये पूर्ण केले.
 
बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून याला जागोजाग बलदंड बुरूज बांधलेले आहे. बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून असून याला तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा उत्तराभिमुख असून चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. तर आत गेल्यावर पश्चिमेकडे दुसरा दरवाजा आहे. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. 
 
किल्ल्यातील इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत. तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या असून येथून रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारणे अद्भूत वाटतं. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदी दिसून येते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.
 
किल्ल्याच्या शेजारीच बालादेवीचे प्राचीन देऊळ आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री बघण्यासारखी आहे.
 
मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.