मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

महाराष्ट्राची अस्मिता किल्ले रायगड

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ. गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले होते. हे सारेच्या सारे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्ल्यांसाठी आहे. तथापि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले रायगडला तर ते तंतोतंत लागू पडते.
 
रायगड-अलिबाग जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि नवप्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपतींचे गुणगाण गातात. अगदी दोन दिवसाची सुट्टी लक्षात घेऊन आपण गडकिल्ले रायगडवर जाऊन याची देही याची डोळा महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवू शकतो. त्यासाठीची ही थोडक्यात माहिती... 
 
महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग-रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे. 6 जून 1674 रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले.
 
महाड या शहरापासून अवघ्या 24 कि.मी. अंतरावर पाचाड हे गाव आहे. या गावात राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधी हे पवित्र तिर्थस्थळ आहे. येथील दर्शनाने मन शांत होऊन किल्ला रोहणास सुरूवात करता येते. पाचाडच्या चित्त दरवाज्यापासून 3 कि.मी. अंतरावर रायगड किल्ला आहे. रायगडावर चढण्यासाठी 1450 पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात. तथापि सध्या रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’ची व्यवस्था झाली आहे.
 
रायगडावर पाहण्यासारखी बरीच स्थळे आहेत. त्यात होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघ दरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे आहेत. महाराजांच्या होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारुची कोठारे अशीही अनेक स्थळे नजरेत व हृदयात साठवण्यासारखी आहेत.
 
राजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.
 
हिरोजी इंदुलकर यांना रायगडावर राजधानी करण्यासाठी बांधकाम करण्यास महाराजांकडून आदेश प्राप्त झाला आणि आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने याबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारल्या.
 
किल्ल्यावर जाण्यासाठी चढण सुरू करताच काही वेळात उजव्या बाजूस खुबलढा बुरुज लागतो. पायथ्यांच्या खिंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बुरुजाची जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून पुढे जाताना डाव्या बाजूस उंच कडा दिसतो ते टकमक टोक आणि उजव्या बाजूस हिरकणी टोक दिसते. महाद्वाराकडे जाण्यासाठी दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते. मात्र उंच चढण व उंच पायऱ्या यामुळे ही वाट परीक्षा पहाते. दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या या महाद्वाराची बांधणी अतिशय मजबूत आहे. काळ्या दगडांची ही सुबक बांधणी आतल्या अंगास पहारेकऱ्यांच्या देवड्यांनी युक्त आहे. दरवाज्याच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतिक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी कोरलेले आहेत. पुढे गेल्यावर आपणास एक तलाव दिसतो हाच तो हत्ती तलाव. तेथून काही अंतरावर आणखी एक भव्य भव्य असा गंगासागर तलाव दिसतो. एका बाजूने चिरेबंदी दगडी बांधणीने बंदिस्त केलेला हा तलाव आजही रायगडावरील पाणीपुरवठयाचे काम करतो. पुढे महाराजांचा राजवाडा, राणीवसा ओलांडून आपण सिंहासनाच्या चौथऱ्यापाशी येतो. येथे धातूच्या सुंदर नक्षीकामाने मढविलेली मेघडंबरी आहे. येथेच समोरील बाजूस नगारखान्याची इमारत असून सिंहासन ते नगारखाना जवळपास 160 फुटाचे अंतर आहे. मात्र नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ उभे राहिल्यासही स्पष्ट ऐकू येते.
 
पुढे होळीचा माळ तसेच तेथे असलेला शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा, माळाच्या डाव्या बाजूस असलेले शिकाई मंदिर, पुढे बाजारपेठ आणि जगदीश्वराचे मंदिर, दरम्यान डावीकडे असलेले टकमक टोक शिववैभवाची साक्ष देत शिवभक्तांना प्रेरणा देत उभे आहेत. जगदीश्वराच्या पुढील बाजूस छत्रपतींची समाधी आहे. आलेला प्रत्येक शिवभक्त हा येथे नतमस्तकच होतो आणि शिवसमाधीचे तेजस्वी स्वरुप नजरेत भरुन पावतो.
 
कसे जाल- रायगड जिल्ह्यातील महाड हा महत्वपूर्ण असा तालुका आहे. साताऱ्याहून महाबळेश्वरमार्गे महाडला जाता येते. पुण्याहून भोरमार्गे महाडला एसटीची सोय आहे. मुंबई-गोवा मार्गावरील पोलादपूर येथून महाडला जाता येते. महाडहून पाचाड या गावातून आपण पुढे रायगडाच्या पायथ्याशी येतो.
 
सोयी- गडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाची निवासस्थाने आहेत. शिवाय खाजगी हॉटेलमध्येही निवासाची सोय होऊ शकते. शिवभक्तांनी दोन दिवसांचा वेळ काढून रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यास हरकत नाही.