मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (10:42 IST)

जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींना विचारलं की ‘तुमचा खर्च कसा चालणार?’

रेहान फझल
25 जून 1975 रोजी रात्री दीड वाजताची वेळ होती. गांधी पीस फाउंडेशनचे सचिव राधाकृष्ण यांचे पुत्र चंद्रहर बाहेर मोकळ्या हवेत झोपलेले होते. अचानक ते उठून आत आले आणि त्यांनी आपल्या वडिलांना जागं केलं, ते दबक्या आवाजात म्हणाले, "पोलीस अटक वॉरंट घेऊन आले आहेत."
 
राधाकृष्ण बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं, तर खरोखरच पोलीस आलेले होते. पोलिसांनी जेपींचं अटक वॉरंट दाखवलं.
 
राधाकृष्ण यांनी पोलिसांना थोडी वाट पाहायची विनंती केली. जेपींना पटण्याला जाण्यासाठी विमान पकडायचं असल्यानं असंही ते लवकरच उठतील, असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं.
 
पोलिसांनी त्यांची विनंती मान्य केली. या काळात राधाकृष्णांनी हालचाली सुरू केल्या. जेपींच्या अटकेची बातमी ज्यांना ज्यांना सांगणं शक्य आहे त्यांना त्यांना ती सांगावी, असे आदेश त्यांनी आपल्या टेलिफोन ऑपरेटरला दिले.
 
त्यांनी जेव्हा मोरारजी देसाईंना फोन केला, तेव्हा कळलं पोलीस त्यांच्याही घरी पोहोचलेले आहेत.
 
तीन वाजता पोलिसांनी राधाकृष्ण यांचा दरवाजा परत एकदा वाजवला. ते म्हणाले, "जेपी पोलीस स्टेशनमध्ये का पोहोचलेले नाहीत, अशी विचारणा करणारे संदेश सातत्याने वायरलेसवरून येत आहेत. तुम्ही जरा जेपींना उठवा."
 
चंद्रशेखर टॅक्सीतून पोहोचले
राधाकृष्ण हलक्या पावलांनी जेपींच्या खोलीत गेले. जेपी गाढ झोपले होते. त्यांनी जेपींना हलवलं आणि जागं केलं. त्यांना पोलीस आल्याची बातमी दिली. तोपर्यंत एक पोलीस अधिकारी आत आले.
 
ते म्हणाले, "सॉरी सर, पण तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन यायचे आदेश आहेत."
 
त्यावर जेपी म्हणाले की, "मला अर्धा तास द्या. मी तयार होऊन येतो."
 
राधाकृष्ण घाबरले होते, त्यांना जास्तीत जास्त वेळ काढायचा होता. कारण जेपी तिथे पोहोचायच्या आत कुणीतरी ओळखीचं तिथे आधी पोचायला हवं होतं. जेपी तयार झाले तेव्हा राधाकृष्ण म्हणाले, की "जरा थांबा आणि एक कप चहा घेऊन जा तुम्ही."
 
त्यात दहा मिनिटं गेली. मग जेपीच म्हणाले, "आता उशीर कशाला करायचा. चला निघू या."
जेपी पोलिसांच्या कारमध्ये बसले न बसले तोच तिथे एक अत्यंत वेगात आलेली टॅक्सी करकचून ब्रेक लावून थांबली, त्यातून उडी मारून चंद्रशेखर उतरले. पण तोपर्यंत जेपींची कार पुढे गेली होती.
 
विनाशकाले विपरीत बुद्धी
जेपींना संसदमार्गावरून पोलीस स्टेशनला नेत होते. राधाकृष्ण आणि चंद्रशेखर एका कारमधून त्यांच्या मागे निघाले.
 
जेपींना एका खुर्चीत बसवल्यावर पोलीस अधीक्षक दुसऱ्या खोलीत गेले. थोड्या वेळानं ते बाहेर आले आणि त्यांनी चंद्रशेखरना एका कोपऱ्यात नेलं, ते म्हणाले की, "सर पोलिसांचा एक गट तुम्हाला आणण्यासाठी तुमच्या घरी गेलाय."
 
चंद्रशेखर हसले आणि म्हणाले, "मी आलोच आहे आता इकडे. मग इथेच अटक करून टाका मला." पोलिसांनी तेच केलं.
 
राधाकृष्ण जेपींना म्हणाले, "तुम्हाला लोकांना काही संदेश द्यायचाय का?"
 
जेपी अर्ध्या सेकंदात उत्तरले आणि ते राधाकृष्णांच्या डोळ्यात पाहात म्हणाले, "विनाशकाले विपरीत बुद्धीस."
 
भुवनेश्वरमधल्या भाषणामुळे अंतर वाढवलं
प्रख्यात पत्रकार आणि जेपी आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे राम बहादूर राय म्हणाले की, जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यातलं नातं तर काका आणि पुतणीचं होतं. परंतु जेपींनी जेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला तेव्हा इंदिरा गांधी यांच्या एका प्रतिक्रियेमुळे त्यांच्यातले संबंध बिघडले.
1 एप्रिल 1974 रोजी इंदिरा गांधींनी भुवनेश्वरमध्ये एक विधान केलं होतं, की जे मोठ्या भांडवलदारांच्या पैशांवर भरभराट करतात त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.
 
राय सांगतात की, "या विधानामुळे जेपी दुखावले. जेपींनी हे विधान ऐकल्यावर पुढचे पंधरा-वीस दिवस काहीही काम केलं नाही, मी स्वतः त्यांची अवस्था पाहिलेली आहे. या घटनेनंतर त्यांच्या शेती आणि इतर पर्यायी उत्पन्नांचे विवरणपत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना आणि इंदिरा गांधींना पाठवून दिले."
 
'माय डिअर इंदू'
जेपींचे आणखी एक निकटवर्ती रजी अहमद सांगतात की, "जयप्रकाश यांचं आनंद भवनात प्रशिक्षण झालं होतं. इंदिरा गांधी तेव्हा अगदी लहान होत्या. नेहरू आणि जेपींचा त्याकाळातला पत्रव्यवहार पाहिला तर लक्षात येईल, की ते नेहरूंना 'माय डिअर भाई' म्हणून संबोधत आहेत."
 
"जेपींनी इंदिरांना जितकी पत्रं लिहिली आहेत, त्यातही जेपींनी त्यांना 'माय डिअर इंदू' असंच संबोधलं आहे. मात्र तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात त्यांनी इंदिरा गांधींना पहिल्यांदाच `माय डिअर प्रायमिनिस्टर' असं संबोधलं होतं."
 
प्रभावती आणि कमला नेहरू यांची मैत्री
राम बहादूर पुढे सांगतात की, प्रभावती देवींच्या मृत्यूमुळे जेपी आणि इंदिरा यांच्यातलं अंतर वाढलं.
 
त्यांच्या मते, "प्रभावती या जेपी आणि इंदिरा यांच्यातला महत्त्वाचा दुवा होत्या. इंदिरा गांधींच्या आईशी प्रभावतींचे सलोख्याचे संबंध होते, त्यामुळे इंदिरा गांधीसुद्धा प्रभावतींना मान द्यायच्या. कमला नेहरू आपल्या कठीण प्रसंगांत प्रभावतींकडेच जायच्या."
 
"इतकेच नाही तर फिरोज गांधी यांच्याशी नातं बिघडलं तेव्हा इंदिरा गांधींना प्रभावतींशिवाय आईसमान अन्य पर्याय नव्हता. जेपी आणि इंदिरा यांच्यातील नातेसंबंध त्यांनीच सांभाळले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही."
 
इंदिरा गांधी चर्चेसाठी तयार होत्या
इंदिरा गांधींनी जेपींशी बोलून आपसातले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला.
 
पूर्व प्रधानमंत्री चंद्रशेखर त्यांच्या 'जिंदगी का कारवाँ' या आत्मकथेत लिहितात, "मी जेपींना भेटायला वेल्लूरला जातो आहे, असं मी इंदिरांना सांगितलं. ते काय बोलतील ते माहीत नाही. तुमची भूमिका काय आहे? तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात का की फक्त वादच होणार आहेत? इंदिरा म्हणाल्या, की तुम्ही त्यांच्याशी बोला. जेपींना वाटत असेल तर मी बोलेन त्यांच्याशी."
इंदिरा-जयप्रकाश यांच्यातील चर्चा
केवळ चंद्रशेखरच नाही तर अन्य प्रकारेही जेपी आणि इंदिरा यांच्यात चर्चा होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अचानक 29 ऑक्टोबर 1974 रोजी जेपी दिल्लीला आले आणि गांधी पीस फाउंडेशनमध्ये उतरले.
 
चंद्रशेखर त्यांना तिथे भेटायला गेले, ते लिहितात की, "मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण मला या विषयावर कुणाशीही आणि खासकरून तुमच्याशी बोलायचं नाही असं सांगण्यात आलंय, असं जेपी भोजपुरीमध्ये म्हणाले. जेपी त्यांना म्हणाले की, मला आज इथे बिहार आंदोलनाबाबत बोलण्यासाठी बोलवलं आहे. त्यासाठी मला एक ड्राफ्ट पाठवला त्यांनी. त्या आधारावर तिला माझ्याशी बोलायचं आहे."
 
"जेपींनी मला ड्राफ्ट दाखवला. मी तो वाचला आणि त्यांना म्हणालो, हे ठीक आहे. तुम्ही या आधारावर तडजोड करून टाका. त्यावर जेपी म्हणाले की, तुमचे आणि इंदिराचे संबंध चांगले आहेत. मग त्यांनी तुमच्यापासून ही गोष्ट लपवावी असं का सांगितलं असावं.
 
"मी त्यांना विचारलं की, हा ड्राफ्ट तुमच्याकडे कोण घेऊन आलं होतं. त्यांनी जरा चाचरतच उत्तर दिलं मला, की श्याम बाबू आणि दिनेश सिंह हा ड्राफ्ट घेऊन आलेले. ते ऐकून मी लगेचच त्यांना म्हटलं, या आधारावर तुमच्याशी तडजोड केली जाणार नाहीये. तुमच्याशी केवळ चर्चा होत आहे, हे दाखवणं इतकंच या ड्राफ्टचं प्रयोजन आहे."
'जयप्रकाशजी, देशाचा काही विचार करा'
 
1 नोव्हेंबर 1974 रोजी जेपी रात्री नऊ वाजता इंदिरांना भेटायला त्यांच्या 1, सफदरजंग रोड इथल्या घरी गेले होते. राम बहादूर राय सांगतात की, "त्यांना सांगून ठेवलं होतं की, ही चर्चा फक्त तुमच्यात आणि इंदिरामध्ये झाली पाहिजे. जेपी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा जेपींना तिथे बाबू जगजीवन बसलेले दिसले, त्यामुळे जेपी कमालीचे हैराण झाले होते."
 
"इंदिरा गांधी काहीच बोलत नव्हत्या. सर्व चर्चेत जगजीवन राम बोलत होते. बिहार विधानसभेचं विघटन करण्याची मागणी न्याय्य असल्याचं जेपी आवर्जून सांगत होते. त्यावर तुम्ही विचार करायला हवा असंही सांगत होते. ही चर्चा संपुष्टात येतानाच इंदिरा गांधी केवळ एकच वाक्य म्हणाल्या, तुम्ही देशाचा काही विचार करा."
 
"हे विधान जेपींना जिव्हारी लागलं. जेपी म्हणाले, 'इंदू, मी देशाशिवाय दुसऱ्या कशाचा विचार केलाय का?' यानंतर जेपींना जे कुणी भेटत होतं त्याला जेपी 'इंदिरानं माझा अपमान केला' हेच सांगू लागले. आता इंदिराशी माझा सामना थेट निवडणुकीच्या मैदानातच होईल, असंही त्यांनी सांगायला सुरुवात केली होती."
 
कमला नेहरूंनी लिहिलेली पत्रं परत पाठवली
1 सफदरजंग रोडवरून निघण्यापूर्वी जेपींनी इंदिरांना 'एक मिनिट एकांतात बोलायचंय', असं सांगितलं.
 
त्यावेळी त्यांनी काही पिवळ्या पडलेल्या पत्रांचं बंडल इंदिरांच्या हातात दिलं. ही पत्र इंदिरा गांधीच्या आई कमला नेहरूंनी जेपींच्या पत्नी प्रभावती देवींना वीस ते तीसच्या दशकांत लिहिली होती. या काळात दोघींचे पती स्वातंत्र्यासाठी लढाई लढत होते.
 
कमला यांची प्रभावती देवी ही अनेक गुप्त गोष्टींची देवाणघेवाण करता येईल, अशी एकमेव मैत्रीण होती. नेहरू कुटुंबाकडून त्यांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीविषयी त्या प्रभावतींशी चर्चा करू शकत होत्या.
 
जेपींच्या या कृतीनं इंदिरा गांधी थोड्या भावूक जरूर झाल्या, परंतु तोपर्यंत त्या दोघांमधलं अंतर इतकं वाढलं होतं की ते संपवणं कठीण होतं.
 
दोघांचा अहंकार मोठा
इंदिरा गांधींचे सचिव पीएन धर त्यांच्या 'इंदिरा गांधी, द इमर्जन्सी अँड इंडियन डेमोक्रसी' या पुस्तकात लिहितात की "आमच्यात आणि जेपींमध्ये मध्यस्थी करत असलेले गांधी पीस फाउंडेशनचे सुगत दासगुप्तांनी मला सांगितले की, धोरणात्मक बाबी इतक्या महत्त्वाच्या नाहीत, माझा सल्ला ऐकाल तर त्यांना थोडा मान द्या."
 
धर आणखी लिहितात की, "जेपींना वाटत होतं की पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्याशी नेहरू आणि गांधी यांच्यात जसे संबंध होते तसेच संबंध प्रस्थापित करतील. इंदिरा गांधी जेपींचा एक व्यक्ती म्हणून जरूर आदर करायच्या, परंतु त्यांच्या विचारांशी त्या सुरुवातीपासून सहमत नव्हत्या."
 
"त्यांच्यादृष्टीनं जेपी म्हणजे अव्यवहारिक गोष्टींना महत्त्व देणारी व्यक्ती होते. एकमेकांबद्दल अशी मतं असणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये एकमेकांप्रति राजकीय तडजोड होणं असंभव होतं. खरं तर दोघांचाही अहंकार फारच मोठा होता, आणि त्या दोघांमध्ये ठिणग्या पडण्याशिवाय अन्य पर्याय पण उपलब्ध नव्हता."
इंदिरांनी दिलेले पैसे परत केले
आणखी एका घटनेने इंदिरा आणि जेपींमधले संबंध बिघडले. जेपींना तुरुंगातून सोडल्यानंतर गांधी पीस फाउंडेशनचे प्रमुख राधाकृष्ण यांनी लोकांना आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना जेपींसाठी डायलिसिस मशीन खरेदी करण्यासाठी योगदान करण्याचं आवाहन केलं.
 
पीएन धर लिहितात की, "राधाकृष्णांच्या सल्ल्यावरून माझ्या पाठिंब्यानं इंदिरा गांधींनी डायलिसिस मशीन खरेदीसाठी मोठी रक्कम पाठवली. राधाकृष्ण यांनी जेपींच्या सहमतीनं त्याची पोचपावतीही पाठवली होती."
 
"परंतु इंदिरा गांधींनी घेतलेला पुढाकार जेपी कँपातल्या अनेक कट्टरतावादी लोकांना आवडला नाही आणि शेवटी जेपींना ती रक्कम इंदिरा गांधींना परत करावी लागली. जेपींच्या या कृतीमुळे इंदिरा आणि जेपी यांच्या विरोधकांना विरोध करण्यासाठी एक नवीन विषय मिळाला."
 
"जेपी आपल्या कंपूतल्या कट्टरवादींचा विरोध करू शकत नव्हते असे म्हणतात. तसंच दुसऱ्या गंभीर प्रकरणांत त्यांनी काही धाडसी पावलं उचलण्याची आशाही ठेवता येत नव्हती."
 
सूडबुद्धीच्या राजकारणाला विरोध
मार्च 1977मध्ये जनता पार्टीच्या विजयानंतर सरकार बनवण्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा इंदिरा गांधींना एका भीतीनं ग्रासलेलं होतं. संजीव गांधींनी जबरदस्ती नसबंदी कार्यक्रम राबवला होता, या कार्यक्रमात सहभागी व्हावं लागलेली लोकं संजय गांधींना पकडून तुर्कमान गेटला घेऊन जातील आणि जबरदस्ती त्यांची नसबंदी करतील अशी भीती इंदिरा गांधींना वाटत होती.
 
इंदिरा गांधींचे मित्र पुपुल जयकर यांनी विदेश सचिव जगत मेहता यांना फोन करून इंदिरा गांधीना वाटणाऱ्या भीतीची माहिती दिली.
 
जगत मेहता यांनी ही गोष्ट ख्यातनाम स्वातंत्र्य सेनानी आणि योजना आयोग आणि दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त बनलेले लक्ष्मीचंद जैन यांना सांगितली तेव्हा ते जेपींकडे गेले.
 
लक्ष्मीचंद जैन `Civil Disobedience: Two Freedom Struggles, One Life' या आपल्या आत्मकथेत लिहितात, "ही बाब ऐकून जेपी खूप हैराण झाले. त्यांनी इंदिरा गांधींना जाऊन भेटायचं आणि त्यांना धीर द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते इंदिरा गांधींना भेटले आणि त्यांच्याबरोबर चहा प्यायला."
 
राम बहादूर राय म्हणतात की, इंदिरा गांधींचं राजकीय जीवन अजून संपलेलं नाही, असं जाहीर वक्तव्य जेपींनी केलं. सूडाचं राजकारण करू नये असा संकेत त्यांनी यातून जनता पार्टीला दिला होता.
जेपींचा हा संकेत त्या लोकांनी अर्थातच जुमानला नाही. राय सांगतात, "जेपींनी इंदिरा गांधींना आता तू पंतप्रधान राहिलेली नाहीस तर तू तुझा खर्च कसा चालवणार असाही प्रश्न केला होता."
 
यावर इंदिरा गांधी उत्तरल्या होत्या की, नेहरूंच्या पुस्तकांची रॉयल्टी त्यांना पुरणार आहे.
 
यावेळी जेपींनी त्यांना कुठल्याही प्रकारचा घटना घडणार नाही असा धीरही दिला, आणि याविषयी ते मोरारजी देसाई आणि चरण सिंह यांच्याशी बातचीतही केली.
 
पाटण्यात अंतिम मुलाखत
 
काही दिवसातच जेपी यांचं जनता पार्टीवरूनही मन उडालं. ते पटण्यात असताना आजारी पडले, त्यावेळेस जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांची विचारपूसही केली नाही.
 
कुलदीप नय्यर सांगतात की, त्यांनी मोरारजींना जेपींना भेटायला पटण्याला जाण्याचा सल्ला दिला, त्यावर मोरारजी उसळून म्हणाले, "मी गांधींना कधी भेटायला गेलो नाही, तर जेपी काय चीज आहेत."
 
इंदिरा गांधींनी मात्र नेमकी उलट कृती केली. बेलचीवरून परतताना त्या पाटण्याला थांबवल्या आणि जेपींना भेटायला गेल्या.
 
रजी अहमद सांगतात की, जेपींच्या शेवटच्या दिवसांत दोघांमधलं नातं पुन्हा एकदा रुळावर आलं होतं.
 
परंतु इंदिरांनी जेपींची घेतलेली ही भेट म्हणजे इंदिरांच्या राजकारणाचा एक भाग होती आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या, असं राजकीय टीकाकार सांगतात.