शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By

ते महात्मा गांधी जे गोडसे संप्रदायाला कधीच उमगले नाहीत

gandhi jayanti
राजीव रंजन गिरी
15 ऑगस्ट 1947च्या काही महिने आधीच नियतीशी कराराच्या दिवसाची जाणीव होऊ लागली होती. या दिवसाच्या निश्चिततेमागे एक कमतरता होती. ही कमतरता होती सतत अस्वस्थ करत होती.
 
दशकांच्या संघर्षानंतर ब्रिटिश राज संपणार होतं. अशा वेळी आनंदाच्या ज्या वातावरणाची कल्पना केली जात होती ते वातावरण निर्भेळ नव्हतं. याचं कारण होतं स्वातंत्र्याच्या आनंदासोबत आलेलं फाळणीचं दुःख.
 
द्वेषाची ही आग धगधगत होती आणि दुःखाची तीव्रता कमी होत नव्हती. लोक या आगीत होरपळत होते.
 
सत्तेच्या हस्तांतरणानं काही लोकांनी थोडा सुस्कारा सोडला होता. पण त्या लोकांमध्ये महात्मा गांधींचा समावेश नव्हता. 78 वर्षांचे गांधी आणि तेवढेच पावसाळे पाहिलेलं त्यांचं मन आणि मेंदू आधीपेक्षा जास्त अनुभवी, ज्ञानी आणि कणखर बनलं होतं.
 
हे साहजिकच होत पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं.
 
मनाच्या दृढनिश्चयाला साथ देण्यास शरीर नकार देत होतं. पण समोर आलेल्या संकटांच्या पहाडासमोर गांधी सदैव ताठ उभे राहून सामना करायचे.
 
म्हणूनच ऑगस्ट 1947च्या काही महिने आधीपासून ते जानेवारी 1948पर्यंत ते सतत प्रवास करत होते. जिथं हिंसा सुरू होती तिथं गांधी पोहोचायचे आणि तिथं जाऊन लोकांचं दुःख समजून घ्यायचे. ते प्रार्थना आणि भाषणांतून द्वेषाची आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. भविष्यात आपुलकी टिकून राहावी म्हणून मार्गही सांगायचे.
 
जहालमतवाद आणि वेडेपणापासून दूर मानवतेचा मार्ग दाखवण्यासाठी ते प्राणपणानं प्रयत्न करत होते. त्यांना अनेक ठिकाणांहून बोलवणं येत होतं.
 
संकटातील लोकांना त्यांचा आधार होता. पण त्यांना सदेह सगळीकडे पोहोचणं शक्य नव्हतं. म्हणून एका जागी थांबून ते दुसऱ्या ठिकाणी शांतीचा संदेश पाठवायचे.
 
पण परिस्थिती अक्राळ-विक्राळ आणि किचकट झालेली होती. अखंड भारताचा व्यासही मोठा होता. कराचीमधल्या घटनांचे पडसाद बिहारमध्ये आणि नोआखलीतल्या घटनांचे पडसाद तत्कालीन कलकत्त्यात उमटत होते. अनेक ठिकाणी विनाश दिसत होता आणि आग सगळीकडेच धगधगत होती.
 
गांधींबद्दल अनेकांना तक्रार होती. आग लावणारे, त्यात जळणारे आणि या आगीवर हात शेकणारे, अशा सगळ्यांना गांधींबद्दल नाराजी होती. कारण त्यांच्याकडून लोकांना अपेक्षाही होत्या. कत्तल हिंदूंची असो किंवा मुसलमानांची किंवा शिखांची, गांधींसाठी ते त्यांच्या शरीराचा एखादा भाग जळण्यासारखं वाटतं होतं.
 
हे सगळं ते स्वतःचं अपयश मानत होते. त्यांच्या स्वप्नांची खरी स्थिती त्यांना व्यथित करत होती. त्यांना वामनासारखा दोन तीन पावलांत अखंड भारत व्यापायचा होता. पण तसं तरी त्यांना कुठं शक्य होतं? आणि तसं ते करूही कुठं शकले? त्यांची हीच नियती होती. शोकांत नियती!
 
15 ऑगस्टला मध्यरात्री जल्लोषात बुडालेली दिल्ली भारताचा जयजयकार करत होती. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची नीती, प्रवृत्ती आणि नेतृत्व ठरवणारे गांधी त्यांचे उत्तराधिकारी असणाऱ्या देशाच्या भावी शिल्पकारांना आशीर्वाद देण्यासाठी या जल्लोषाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
 
ते होते दिल्लीपासून दूरवर असलेल्या कलकत्तामध्ये, तिथल्या हैदरी महलमध्ये.
 
नोआखलीमध्ये अल्पसंख्याक हिंदूचं भीषण हत्याकांड झालं होतं गांधी तिथं निघाले होते. त्यांना दोन तीन दिवस कलकत्त्यात थांबावं लागलं होतं. इथं अल्पसंख्याक मुसलमान दहशतीमध्ये होते.
 
नोआखलीतील आग थांबवण्यासाठी त्यांना कलकत्त्यात थांबणं आवश्यक वाटत होतं. तिथल्या मुसलमानांना असुरक्षित सोडून कोणत्या तोंडानं नोआखलीतील हिंदूच्या सुरक्षेसाठी आवाहन करणार, असं त्यांना वाटत होतं.
 
इथं अल्पसंख्याकाचं संरक्षण हा गांधींसाठी धर्म बनला होता. नोआखली इथं अल्पसंख्याकाच्या प्राणाची रक्षा करता यावी यासाठीचं नैतिक बळ ते मिळवत होते.
 
कलकत्त्यात राहण्यासाठी त्यांनी एका विधवा मुस्लीम महिलेचं जीर्ण घर निवडलं होतं. इथं हिंदू बहुसंख्य होते आणि एका गरीब मुस्लीम समुदायाची लहान वस्ती होती. इथं लूटमार आणि जाळपोळीचं सत्र सुरू होतं. परिस्थिती अशी होती की आपलं दुःख सांगण्यासाठी इथं कुणी नव्हतं.
 
याच हैदरी महालमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. पण त्यांची अशीही अट होती की सुहारावर्दी यांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. सुहारावर्दी तेच होते ज्यांनी 'थेट कारवाई'मध्ये अनेक हिंदूंचं शिरकाण केलं होतं आणि अनेक हिंदूंना बेघर केलं होतं. हिंदूंच्या द्वेषाबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या सुहारावर्दी गुन्हे कबूल करून शांतीसाठी आले होते.
 
गांधींची आणखी एक अट होती - कलकत्त्यातल्या मुस्लीम लीगच्या कट्टर नेत्यांनी नोआखलीत त्यांच्या लोकांना तार पाठवून त्यांना हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगावं. शिवाय कार्यकत्यांना पाठवून शांततेसाठी सार्थक प्रयत्न करावेत.
 
गांधी हिंदूंचे शत्रू होते?
गांधीच्या या अटी मान्य झाल्या. ते कलकत्ताकरांना त्यांचे विचार सांगत राहिले. पण हिंदू महासभेशी संबंधित युवकांमध्ये नाराजी कायम होती. ते गांधींना फक्त मुस्लिमांचे हितकर्ते मानत होते. ते सांगत विचारत होते, की जेव्हा हिंदू संकटात होते तेव्हा तुम्ही का आला नाहीत? जिथून हिंदू पलायन करत आहेत, तिथं का गेला नाही?
 
असे लोक गांधींना 'हिंदूंचा शत्रू' म्हणत आरडाओरडा करत होते, त्याच गांधींना जे जन्मानं, संस्कारांनं, जीवनशैलीनं, आस्थेनं आणि धर्मानं पूर्णपणे हिंदू होते.
 
गांधीना लोकांचं हे असं म्हणणं गंभीर जखमांप्रमाणे दुखायचं.
 
गांधी 15 ऑगस्टला महान दिवस मानत होते. लोकांनी उपवास, प्रार्थना आणि प्रायश्चित्त करून या दिवसाचं स्वागत करावं, असं आवाहन करत होते. त्यांनी या दिवसाचं स्वागत असंच केलं होतं.
 
कलकत्त्यामध्ये गांधी यशस्वी ठरले होते. शांततेचं वातावरण बनलं होतं. गांधींच्या आदर्शांचा परिणाम सैन्याच्या शक्तिपेक्षा प्रभावी ठरला होता. म्हणूनच शेवटचे व्हॉईसरॉय आणि पहिले गव्हर्नर जनरल माऊंटबॅटन यांनी तार पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी म्हटलं होतं, "पंजाबमध्ये आमच्याकडे 55 हजार सैनिक आहेत पण दंगे नियंत्रणात नाहीत. पण बंगालमध्ये आमच्याकडे एकच माणूस आहे आणि तिथं शांतता आहे."
 
नोआखलीच्या यात्रेतून काही दिवस काढून ते कलकत्त्यात काही दिवस थांबले होते. पण तिथं त्यांना महिनाभर थांबावं लागलं. स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर आणि ठिणगीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या शहरानं गांधींना जाऊ दिलं नाही. गांधींनी या स्फोटकांच्या ज्वलनशीलतेला निस्तेज केलं होतं आणि ठिणगीही विझवली होती.
 
सुहरावर्दींची प्रतिज्ञा आणि नवे आदर्श ऐकूण लोकांना आश्चर्य वाटत होतं. अनेक दंगलखोर हिंदू युवकसुद्धा प्रायश्चित्त करत होते.
 
दिल्ली गांधींना बोलावत होती
दिल्लीत आता जल्लोषाचं वातावरण संपलं होतं आणि दिल्लीला आता गांधींची गरज होती, ती गांधींना बोलावत होती. कलकत्त्यातल्या गांधींनी दिल्लीला प्रभावित केलं होतं. दिल्ली महात्म्याची अधीरतेनं प्रतीक्षा करत होती.
 
गांधी 9 सप्टेंबरला बेलूरमार्गे रेल्वेनं दिल्लीला पोहोचले. पण ही सकाळ नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. चहुबाजूंना स्मशानशांतता होती. सगळ्या औपचारिकतांमध्येही तिथला गोंधळ लपत नव्हता.
 
गांधींना स्टेशनवर घेण्यासाठी सरदार पटेल आले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं. गांधींना अपेक्षित असलेले बरेच लोक अनुपस्थित होते. या एका कारणानं गांधींची चिंता वाढवली होती.
 
कारमध्ये बसताच सरदार पटेल यांनी मौन सोडलं. ते म्हणाले, "गेली 5 दिवस दिल्लीत दंगली सुरू आहेत. दिल्ली प्रेतांचं शहर बनलं आहे."
 
गांधींना त्यांचं आवडतं स्थळ वाल्मिकी वस्तीत नेण्यात आलं नाही. त्यांच्या थांबण्याची व्यवस्था बिर्ला भवनमध्ये करण्यात आली होती. गांधींची कार तिथं पोहोचलीच होती की पंतप्रधान नेहरू तिथं पोहचले. हा योगायोग नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचा टवटवीतपणा गायब झाला होता. चेहऱ्यावरील सुरकुत्या जास्तच वाढल्या होत्या.
 
ते रागानं लालेलाल झाले होते. एका श्वासातचं त्यांनी 'बापूं'ना सारं काही सांगून टाकलं. लूटमार, कत्तली, कर्फ्यू यांची माहिती दिली. खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत नव्हत्या. सर्वसामान्य नागरिकांची दुदर्शा झाली होती. अशा स्थितीमध्ये पाकिस्तानला तिथल्या नागरिकांचं संरक्षण करा, असं सांगायचं तरी कसं, असा प्रश्न होता.
 
एक प्रसिद्ध सर्जन डॉ. जोशी यांचं उदाहरण देण्यात आलं. हिंदू-मुसलमान असा कोणताही भेद न करता सर्वांची समान सेवा करणाऱ्या डॉ. जोशी यांना एका मुस्लीम घरातून गोळी मारण्यात आली होती आणि त्यात त्यांचा जीव गेला होता.
 
शांततेसाठी सर्व प्रयत्न सुरू होते. गांधींचे लोक आणि सरकार दोन्ही यासाठी प्रयत्न करत होते. दररोज होणाऱ्या प्रार्थना सभांमधून गांधी त्यांचे विचार ठेवत होते. रेडिओवर यांचं प्रसारणही होत होतं. पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदू आणि शिखांची संख्या कमी होत नव्हती. लोकांना खुनाचा बदला खुनानेच हवा होता.
 
गांधींच्या या गोष्टी त्यांना पसंत नव्हत्या. ते हेही पाहत नव्हते की, हा माणूस पाकिस्तानवर नैतिक दबाव निर्माण करत आहे. आपल्या नागरिकांचं संरक्षण करणार, या वचनाची महंमद अली जिन्ना यांना ते आठवण करून देत होते.
 
'भारत आणि पाकिस्तानने वचन पाळावं'
ते भारतालाही त्याच्या वचनांची आठवण करून देत होते. या वचनांच्या पूर्ततेमध्ये त्यांना नैतिक बळ वाढत असल्याचं दिसत होतं. ते रोज नियोजन करत आणि त्यांची अंमलबजावणीसुद्धा करत होते. भारत किंवा पाकिस्तानने आपलं कोणतंही वचन मोडू नये, असं त्यांना वाटत होतं.
 
55 कोटी लोकांना ते याच विश्वासाचा एक दुवा मानत होते.
 
विश्वास आणि वचनांच्या पूर्ततेसाठी कुणाच्याही विरोधात जायला ते तयार होते, अगदी स्वतःच्या विरोधातही. या आत्मबळातून त्यांना नैतिक बळ मिळत होतं. त्यांना पाकिस्तानलाही जायचं होतं.
 
हिंदू महासभेच्या विचारांना शांततेचे हे प्रयत्न पसंत नव्हते. या कट्टर लोकांनी गांधीच्या उपोषणात आत्मशुद्धीचे प्रयत्न दिसत नव्हते. जेव्हा जगभर गांधींचा जयजयकार होत होता, तेव्हा हे लोक गांधी मुर्दाबादच्या घोषणा देत होते.
 
पृथ्वीच्या पाठीवरील सर्वोत्तम बुद्धिमत्तेनं ज्यांचा अभिमान बाळगला आणि ज्यांच्या आत्मिक बळाचं कौतुक केलं, अशा व्यक्तीला नथुराम गोडसेचा वैचारिक संप्रदाय समजू शकला नाही, यात आश्चर्य काय?