शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

नात्यांचा पतंग उंच विहरू द्या!

WD
आपल्या उत्सवप्रिय देशात प्रत्येक सणाची एक खासीयत आहे. कोणत्याही सणाचं नाव घेतलं की त्याच्याशी निगडीत गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. मकर संक्रांत म्हणताच तिळगूळ, गव्हाची खिचडी, तीळ घातलेली भाकरी हा स्वाद जिभेवर तरळू लागतो. यासोबतच आकाशाला गवसणी घालणारे रंगीबेरंगी पतंग डोळ्यांसमोर तरंगू लागतात. या पतंगांचा आपल्या जीवनातील नात्यांशी घनिष्ट संबंध आहे. आपले जीवन कसे असावे हे पतंगापासून शिकावे. ते खूप काही सांगते व शिकवून जाते.

* आपल्या जीवनातही पतंगांप्रमाणेच विविध रंग असतात. आनंद-दु:ख, राग-लोभ, हताशा-निराशा, काही मिळविणे-काही गमावणे, आश्चर्य- भिती असे कितीतरी.
* पतंगाप्रमाणेच आपणही जीवनात आकाशाला गवसणी घालण्याचा व खूप उंच जाण्याचे स्वप्न पाहत असतो.
* ज्याप्रमाणे काचेचा चुरा व डिंक याने बनविलेला मांजा सहजा-सहजी तुटत नाही त्याचप्रमाणे प्रेम व विश्वासाच्या पक्क्या धाग्यांनी नाती मजबूत होतात.
* धाग्याशिवाय पतंग अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे जीवनाची नाती एक दुसर्‍यांच्या सहकार्याशिवाय अपूर्ण आहेत.
* एकट्यानेच पतंग उडविणे फारच अवघड जाते. शेवटी पतंग उंच जावा असे वाटत असेल तर मांज्याची रिळे धरण्यासाठी व ढिल देण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावीच लागते.
*पतंग हवेच्या रोखानेच उडतो आपणही अनुकूल दिशा ओळखूनच जीवन जगलो तर ते अधिक सोपे होते.
* पतंगाला गाठ पडली तर तो कापला जातो. नात्यातही संशयाच्या, गैरसमजूतीच्या, रागाच्या निरगाठी पडल्या तर त्या सुटत नाही. उलट नाती तुटण्याचीच शक्यता असते.
* पतंगाला असलेल्या शेपटीने त्याचा तोल सांभाळला जातो. जीवनातही धैर्य हेच काम करते. आपल्यात जेवढे धैर्य असेल तेवढा नात्यांत तोलही सांभाळला जातो.
* कधी-कधी पतंगाला ढिल द्यावी लागते. जीवनातही नेहमी ओढाताण न राहू देता ढिल देत राहा म्हणजे जीवन खाली-वर असे न रहाता एकाच तालात चालत रहाते.
* पतंग उडविताना बर्‍याचदा हात कापला जातो. जीवनातही आनंदाच्या उड्डाणासोबतच दु:खाने आपण घायाळ होतो.
* मांजा पकडणारा व पतंग उडविणारा यांच्यात व्यवस्थित ताळमेळ असावा लागतो. हाच ताळमेळ नात्यातही उपयुक्त ठरतो.
* पतंग कितीही उंच उडाला तरीही मांज्याचा रिळ जमिनीवरच राहतो. याप्रमाणेच आपण जीवनात कितीही यशस्वी झालो तरी पाय जमिनीवरच असायला हवे.
* कधी-कधी पतंग कापलीही जाते. म्हणजेच जीवनात आपण अयशस्वीही होऊ शकतो. पण त्याने घाबरून न जाता नवा पतंग घेऊन त्याला उडविण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आयुष्यात अपयश आले तरी ते झटकून नव्याने प्रयत्न करा.

मकर संक्रांतीचा शुभेच्छा...