गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:21 IST)

मराठा आरक्षण: मनोज जरांगेंचा उपचाराला नकार, सलाईन काढून टाकले

मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपचारांना नकार दिला आहे.
 
नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मध्यस्थीने डॉक्टरांनी बळजबरीने जरांगे यांना दोन सलाईन लावले मात्र नंतर जरांगे यांनी त्यांना लावण्यात आलेले सलाईन काढून टाकत उपचार घेण्यास आणखी नकार दिलाय.
 
तर, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी आज ( 14 फेब्रुवारी) मंत्रिमंडळाची बैठकी घेतली होती. या बैठकीत 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
 
जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी जमलेल्या मराठा आंदोलकांनी सकाळपासून आक्रोश सुरू केला. 'तुम्ही उपचार घ्या नंतर आपण सरकारशी लढू,' असं उपस्थितांनी सांगितल्यानंतर देखील जरांगे उपचार घ्यायला तयार नाहीत.
 
"मला सलाईन लावायचं असेल तर सरकारला धारेवर धरा, त्यांना सांगा आमचा माणूस मेला की तुम्ही मेले म्हणून समजा," असंही जरांगे यांनी उपस्थितांना सांगत सरकारला खडेबोल सुनावले.
 
"सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा सुपडा साफ करून टाकू,अशी धमकीही त्यांनी सरकारला देऊन टाकली आहे. मला गाडीत टाकून मुंबईला न्या ,फक्त एक जण सोबत द्या,बाकीचे सोबत आले तर सरकार त्यांना अडचणीत आणेल," असंही जरांगे म्हणाले.
 
या उपोषणाची मागणी नेमकी काय?
जानेवारी महिन्यात मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह नवी मुंबईत आले होते. तेव्हा सरकारतर्फे अधिसूचना काढून त्यांचं उपोषण आणि आंदोलनकर्ते माघारी परतले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळून आपला आनंद साजरा केला होता. पण त्यानंतर सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत.
 
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जात प्रमाणपत्रांचे वाटप व्हावे अशी मागणी मनोज जरांगे करत आहेत.
 
ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करुन त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.
 
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.
 
सगेसोयरे शब्दाची व्याख्या या अधिसूचनेत खालील प्रकारे दिली आहे.
 
(ज) (एक) सगेसोयरे — सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.
 
मागणी काय आणि अडचण कुठे?
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करताना मनोज जरांगे यांच्याकडून नोंदी सापडणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली.
 
त्याचबरोबर प्रामुख्यानं जरांगे पाटलांनी आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी सगेसोयरे शब्दाच्या समावेशासाठी जरांगे पाटील आग्रही होते.
 
पण सरकारनं काढलेल्या या अध्यादेशामध्ये सजातीय विवाह संबंधांमधून तयार होणाऱ्या नातेसंबंधांचाच समावेश सगेसोयरे यात केला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
 
आता कुणबी आणि बिगर कुणबी यांच्या विवाहाला सजातीय म्हणायचे का? तसं असेल तरच त्यांना याचा फायदा मिळू शकणार आहे.
 
त्याचबरोबर अध्यादेशानुसार, "मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल," असं म्हटलं आहे.