गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बाबा आमटे
Written By

महामानव : बाबा आमटे

बाबांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते. श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. सहाजिकच बाबांचे लहानपणही अतिशय ऐश्वर्यात गेले. बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि तो हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे, बाबांच्या कुटुंबाची स्थिती सांगायला एवढी एक बाब पुरेशी आहे. 
 
बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे. अनेक नियतकालिकांसाठी ते त्या काळी चित्रपटांचे परीक्षण लिहित असत. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. पुढे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या कामात पहिली मदत नोर्मा शेअरर हिचीच मिळाली होती, हे उल्लेखनीय. बाबांना लहानपणी कार चालवात यायला लागली तेव्हा एक स्वतंत्र स्पोर्ट्स कार देण्यात आली. पण बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बालपण ऐश्वर्यात गेले असले तरी त्या वयातही त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. त्यामुळे खेळण्यात त्यांचे अनेक मित्र खालच्या जातीचे होते. त्यांच्याशी न खेळण्यावर त्यांना बंधने घालण्यात येई. पण ती न जुमानता बाबा त्यांच्यात मिसळत असत. 
 
कॉलेजच्या दिवसात बाबांनी अख्ख्या भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनी प्रभावित झालेल्या बाबांनी त्यांच्या शांतीनिकेतनलाही भेट दिली. टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता. तितकाच प्रभाव वर्ध्याजवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या महात्मा गांधींचाही होता. मार्क्स व माओ यांच्या विचारांनीही बाबांना आकर्षिले होते. पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही देशातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही. साने गुरूजींचाही बाबांवर बराच प्रभाव पडला होता. 
 
अशा वातवरणातूनच मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली. ती दणकून चालायलाही लागली. त्याचवेळी आठवड्याअखेरीस ते आपली शेती बघायचे. शेती तरी किती? तब्बल साडेचारशे एकर. वरोराजवळ गोराजा येथे ही शेती होती. त्यांनी मग शेती करता करता शेतकर्‍यांना संघटीत करायला सुरवात केली. सहकाराचा मूलमंत्र शेतकर्‍यांत रूजवायला सुरवात केली. याची परिणती अशी झाली की बाबांनी वरोराचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लबमध्ये जाणे, शिकारीला जाणे, टेनिस आणि ब्रिज खेळणे हेही सुरू होते. पैसा प्रचंड मिळत होता. पण एवढे सगळे असूनही बाबा आतमधून तितके सुखी नव्हते. आयुष्याला काही तरी हेतू असावा असे त्यांना वाटत असे. 
 
त्याचवेळी कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते. खोटेपणाल करून पैसे मिळविणे बाबांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरवात केली. हरीजनांना बर्‍याच लांबून पाणी आणावे लागत असे. बाबांनी उच्चवर्णीयांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर खुली केली. त्यानंतर १९४२ चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि बाबा त्यात उतरले. त्यांनी वकिलांना संघटीत करून अटक केलेल्या नेत्यांना सोडविण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यापायी ते तुरूंगातही गेले. 
 
पुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागले. याच काळात त्यांनी केस वाढविले. एखाद्या विरक्त साधूसारखे दिसू लागले. एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना त्यांनी इंदूला (साधनाताई) पाहिले आणि त्यांचे मनोमन प्रेम बसले. पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली. पण विशेष म्हणजे साधनाताईंनाही बाबा आवडले. मग त्यांना घरच्या विरोधाला पत्करून लग्न करण्याचे ठरविले. 
 
लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हातपाय झडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणून पाहिला आणि ते भयंकर घाबरले. पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली. पण तो जगला नाही. पुढचे सहा महिने याच उलघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरविले आणि पत्नी साधनानेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले. 
 
तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या रहाण्याची सोय केली. त्यांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. त्यासाठी ते कुष्ठरोग्यांवरील उपचारही शिकून आले. आनंदवनात कोणतीही सोय नव्हती. त्यांनी या उजाड परिसराचे नंदवन केले. आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी तेथे शेती सुरू केली. आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी कुष्ठरोग्यांसाठी एक उदाहरण ठरले. 
 
पुढे बाबांनी एवढं उभारल्यानंतरही ते शांत बसले नाही. ऐंशीच्या दशकात संपूर्ण भारत अतिरेक्यांच्या कारवाया, फूटीच्या धमक्या अशा बाबींनी ग्रस्त असताना बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरव गुजरातपासून अरूणाचल प्रदेशापर्यंत भारत जोडो नावाची यात्रा काढली. शांतता निर्माण करणे व पर्यावरणाबद्दल जागृती हे या यात्रेचे मुख्य हेतू होते. १९९० मध्ये बाबांनी आनंदवन सोडले आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन रहायला लागले. नर्मदा आंदोलनाला बळ देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. 
 
बाबांना अनेक मानसन्मान मिळाले. पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता पारितोषिक, रॅमन मगसेसे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.