अश्वत्थामा जिवंत आहे काय?
असीरगड. रहस्याने वेढलेला किल्ला. महाभारतातला चिरंजीव अश्वत्थामा म्हणे येथे पूजेसाठी येथे येतो. हे खरे की खोटे? या रहस्यावरचा पडदा बाजूला करण्यासाठी थेट तेथे जाण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून हा किल्ला वीस किलोमीटरवर आहे. किल्ला चढण्यापूर्वी अनेकांकडून त्याच्याविषयीची माहिती गोळा केली. अर्थात प्रत्येकाने सांगितलेली माहिती त्याच्याविषयीचे गूढ वाढविणारीच होती. एकाने सांगितले, त्यांच्या आजोबांनी म्हणे अनेकदा अश्वत्थामाला बघितले होते.दुसरा म्हणे, एकदा मासे पकडायला तो किल्ल्यावर असणाऱ्या तलावात गेला. पण तिथे त्याला कुणीतरी धक्का दिला. त्या व्यक्तीला कदाचित याचे येणे आवडले नसावे. त्यावरून त्याचा निष्कर्ष की तो अश्वत्थामाच होता. काहींचे म्हणणे होते, की अश्वत्थामाला पाहिल्यावर मानसिक संतुलन बिघडते.
या दंतकथा ऐकल्यानंतर अखेरीस किल्ल्याच्या दिशेने मोर्चा वळवला. विजेच्या प्रकाशाने शहरातल्या रात्री झळाळून निघत असताना येथे कोरडाठाक अंधार असतो. संध्याकाळचे सहा वाजले की अंधार किल्ल्यासह परिसराला कवेत घेतो. आणि रहस्य, गूढ या किल्ल्याभोवती दाटायला सुरवात होते.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...
किल्ल्यावर चढताना सोबतीला काही गावकरीही होते. सरपंच हारून बेग, गाईड मुकेश गढवाल आणि दोनतीन ग्रामस्थही बरोबर होते. घड्याळाचा काटा सहावर पोहोचला तेव्हा आम्ही किल्ल्याच्या बाहेरच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलो होतो. दरवाजा उघडा होता. आम्ही आत शिरलो, पण वनस्पती आणि वेलींनी आमचा रस्ता अडवला. त्यांना दूर करून पुढे पाऊल टाकतो, तोच अनेक कबरी दिसल्या. गाईड मुकेशने तातडीने खुलासा केला, इंग्रज सैनिकांच्या या कबरी आहेत. तेथून पुढे गेल्यानंतर एक तलाव दिसला. हाच तो तलाव. येथेच अंघोळ करून अश्वत्थामा शिव मंदिरात पूजेसाठी जातो. मुकेशने सांगितले. पण काहींच्या म्हणण्यानुसार अश्वत्थामा उतालवी नदीत अंघोळ करून येथे येतो, ही माहितीही त्याने पुरवली. पावसाळ्याचे पाणी साचून हा तलाव भरतो. आश्चर्य म्हणजे उन्हाळ्यातही तो आटत नाही. पण तलावातले पाणी हिरवेगार होते.