सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By अक्षेश सावलिया|

रूपाल पल्लीत वाहते तुपाची नदी

रामराज्यात तुपाची नदी वाहायची हे आतापर्यंत आपण आजी आजोबांच्या गोष्टीत
ऐकत आलो आहोत. पण कलियुगातही अशी तुपाची नदी वाहते असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल?

WDWD
मग चला गुजरातमधील रूपाल नावाच्या गावाला. या गावात पल्ली नावाच्या देवतेचे मंदिर आहे. या देवीला दरवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तुपाचा अभिषेक केला जातो. या प्रथेमागचे इंगित जाणून घेण्यासाठी आम्ही यावेळी श्रध्दा व अंधश्रध्दा या सदरासाठी या गावाचा दौरा केला. आम्ही भेट दिली त्या दिवशीच भाविकांनी पल्ली मातेला सहा लाख किलोपेक्षा जास्त तुपाने अभिषेक केला. म्हणजे जवळपास दहा कोटी रूपयांचे तूप अक्षरशः वाया गेले.

WDWD
रूपाल गावात दरवर्षी नवरात्रौत्सवात नवव्या दिवशी आदिशक्ती वरदायनी देवीची यात्रा भरते. त्यासाठी लाखो भाविक येतात. देवीला तुपाने अभिषेक घालतात. असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल, अशी त्यांची श्रध्दा असते.

आम्ही रूपाल गावात गावात पोहोचलो तेव्हा जागोजागी भाविकांची गर्दी होती. गावातील सरपंचांशी बोलल्यानंतर कळले, की येथे जवळपास दहा लाख भाविक आले आहेत. गावातील प्रत्येक घरात वीस ते पंचवीस पाहुणे या यात्रेसाठी आलेले आहेत. आम्ही पोहोचलो तेव्हा, देवीला नैवेद्य दाखविण्यात येणार्‍या खिचडी तयार करण्याची वेळ झाली होती. यात्रेला 3.30 वाजता सुरूवात झाली. यात्रेदरम्यान 27 रस्त्यांवर बादल्या भरून तूप ठेवलेले होते. भाविक बादल्या भरून भरून पल्लीमातेला अभिषेक करत होते. वरदायिनी देवसंस्थेचे संचालक नितीनभाई पटेल यांनी सांगितले, की गेल्या वर्षी सव्वा चार लाख किलो तुपाचा अभिषेक करण्यात आला होता. या वर्षी हे प्रमाण वाढून सहा लाख किलो झाले आहे.

WDWD
देवीला तुपाचा अभिषेक केल्याने संकट दूर होऊन सुख प्राप्त होईल या भाबड्या श्रद्धेपायी लोक मोठ्या प्रमाणात मुलांना दर्शनासाठी घेऊन येतात. गावातील लग्न झालेल्या मुली व जावईही यादिवशी दर्शनासाठी येतात. देवीकडे आपण मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. पुत्ररत्नानाची अपेक्षा असणार्‍यांना पुत्राची प्राप्ती होते. ज्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतात ते देवीला तुपाचा अभिषेक करतात.

अभिषेक केल्यानंतर येथील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत तूप वाहू लागते. हे तूप फक्त वाल्मिकी समाजातील लोकच गोळा करतात. तूप गोळा केल्यानंतर ते साफ करून त्याची मिठाई तयार केली जाते आणि बाजारात विकली जाते.

पौराणिक कथेचा आधार रूपाल येथील यात्रेला पौराणिक कथेचा आधारही आहे. पांडवांनी द्रौपदीसोबत रूपाल गावापासून वनवासाची सुरवात केली होती. एक वर्षांच्या अज्ञातवासात आपण पकडले जाऊ नये यासाठी पांडवांनी वरदायिनी देवीची करूणा भाकली होती. एक वर्ष निर्वेधपणे पूर्ण झाल्यानंतर पांडवांनी सोन्याची पल्ली बनवून त्यावर शुध्द तुपाने अभिषेक केला होता. व यात्रा काढली होती.
WDWD
तेव्हापासून ही परंपरा आहे. पल्लीमातेला ज्या रथात बसविले जाते, तो वाणंगभारई सजवतात. कुंभार लोक मातीचे पाच कुंड तयार करून पल्ली यात्रा काढतात. पिंजर लोक कापूस तयार करून देतात व माळी समाजातील लोक पल्लीला फूल हारांनी सजवून हा रथ तयार करतात. प्रत्येक वर्षी देवीची नवीन पल्ली तयार केली जाते. पल्ली तयार करताना एकाही खिळ्याचा वापर केला जात नाही. प्रत्येक वर्षी यात्रेपूर्वी येथील बंधानी बंधू पाऊस कसा होईल या संदर्भात भविष्यवाणी करतात. यावर्षी शेतकर्‍यांसाठी हे वर्ष चांगले राहील व पाऊसही चांगला होईल, असे भविष्य वर्तवले आहे. मागील वर्षी बंधानी बंधूंनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती, असा लोकांचा विश्वास आहे.

WDWD
पण एकूणातच ही प्रथा म्हणजे अंधश्रद्धा आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. सुशिक्षित लोक या परंपरेच्या विरोधात आहेत. ''पल्ली परिवर्तन योजना'' चालवणारे लंकेश चक्रवर्ती या परंपरेचा विरोध करताना सांगतात, की पल्ली यात्रेत इतके तूप वाया घालविण्यापेक्षा थोड्या तुपाने देवीला अभिषेक करून उरलेल्या तुपाचा उपयोग सामाजिक कार्यात करावा. हे तूप कमी भावात विकून या पैशांचा उपयोग शाळा, कॉलेज, दवाखाने, रस्ते यांची निर्मिती करण्यासाठी व्हावा. परंतु, भाविकांचा चक्रवर्ती यांनाच विरोध आहे. त्यांना ते रावण म्हणून संबोधतात.

लंकेश चक्रवर्तींची भूमिका तर्काच्या कसोटीवर घासून बघितल्यास पटते. गौतम बुद्धांनीही म्हटले आहे, की धर्म आणि श्रध्देच्या बाबतीत लोक अत्यंत भावनाशील असतात. त्याची चिकित्सा ते कधीच करू इच्छित नाहीत. त्यांना वाटते, की शास्त्रात लिहिले तेच खरे असते. म्हणूनच आधी विचार करून मगच काय करायचे ते करा. वाचकांनीही या सार्‍याचा विचार करून या यात्रेकडे पहावे.