दिंडोरीत होणार राज्यातील पहिले ट्रायबल इंडस्ट्रीअल क्लस्टर; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांना यश
अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार, दिंडोरी तालुक्यातील मौजे जांबूटके येथे महाराष्ट्रातील पहिल्या ट्रायबल इंडस्ट्रीअल क्लस्टर निर्माण करण्यासाठी शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. त्यासाठी जांबूटके येथील 31.51 हेक्टर सरकारी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे मानले जाते.
यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या उच्चाधिकार समितीची विधानसभा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. याबैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जांबूटके येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांच्यासह भूनिवड समितीने 31.51 हेक्टर सरकारी क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यात आली होती.
भूनिवड समितीच्या पाहणी अहवालानुसार, प्रस्तावित ट्रायबल इंडस्ट्रीसाठी निवडण्यात आलेले क्षेत्र वाघाड धरणाजवळ असल्याने तेथून पाणीपुरवठा करता येणे शक्य होईल. तसेच नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्ग 848 देखील दिंडोरी व अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रापासून जवळ आहेत. हा प्रस्तावित प्रकल्प आदिवासी बहुल भागात असल्याने महामंडळाच्या समन्यायी औद्योगिक विकासाच्या धोरणास अनुकूल असून त्यामुळे रोजगार निर्मीतीला चालना मिळून मागास घटकांना विकासाची संधी उपलब्ध होणार आहे. दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात भूखडांना चांगली मागणी असल्याने प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र विकासित करणे महामंडळासाठी हितावह असल्याचेही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.