गृहिणींचे बजेट कोलमडले ! मसाल्याच्या मिरचीचा वाढला ठसका,दरात जवळपास दुपटीने वाढ
Increase in price of masalaदेशात टोमॅटोसह भाज्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. टोमॅटोचे दर 150 ते 160 रुपये किलोवर आले असताना भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच आता भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या मसाल्यांच्या किमतीही प्रचंड वाढू लागल्या आहेत. भारतीय स्वयंपाकघराची शान समजले जाणारे आणि जेवणाला चव देणाऱ्या मसाल्यांमुळे आता सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मसाला मंडईमध्ये मसाल्यांच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि गेल्या 15 दिवसांतच किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. येथील मसाल्यांचे दर पाहता अनेक मसाल्यांचे दर जवळपास दुपटीने वाढल्याची माहिती मिळत आहे.
मसाल्यांचे भाव का वाढले?
सध्या देशात मान्सून सुरु आहे. मात्र हे वर्ष अल निनो वर्ष असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या पिकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. यावेळी मसाल्यांच्या दरवाढीमागे पेरणी कमी आणि उत्पादन कमी हे कारण सांगितलं जात आहे. देशात मसाल्यांच्या किमती हळूहळू वाढल्याच्या बातम्या याआधीही आल्या असल्या, तरी अशावेळी अचानक एवढी वाढ का झाली आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
ताजे दर आणि जुने दर यांतील फरक
कश्मिरी मिरची जी आधी 300 ते 500 रुपये प्रति किलो दराने मिळायची आता ती 500 ते 700 रुपये प्रति किलो दराने मिळत आहे.
सध्या किरकोळ बाजारात जिरे 800 रुपये प्रति किलो दराने विकलं जातं आहे, तर याचा होलसेल रेट 550 ते 680 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे.
जेवणाची चव वाढवणारा गरम मसाल्याच्या किमतींमध्ये सध्या 72 ते 80 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हळदीचे दरही गगनाला भिडले असून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हळदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे.