शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: पनवेल , गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (07:53 IST)

Property auction of Karnala Bankकर्नाळा बँकेच्या मालमत्ता लिलावप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे बैठक

property auction of Karnala Bankकर्नाळा नागरी सहकारी बँक अवसायनात निघाल्यानंतर आता जप्त मालमत्तांचा लिलाव करून पाच लाखांवरील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्याच्या प्रयत्नांतून पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी (ता. 5) दुपारी 1 वाजता त्यांच्या कार्यलयात बैठक बोलाविली आहे.
 
साडेपाचशे कोटींच्या घोटाळ्यातून कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडीत निघाली आणि ठेवीदार देशोधडीला लागले होते. बँकेचा व्यावसायीक परवाना रद्द केल्यानंतर आणि विम्यापोटी 367 कोटींचे जवळपास 38 हजार ठेवीदारांना वाटप करण्यात आले आहेत. आत पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवीदारांचा प्रश्नावर लढा सुरु आहे.
 
अध्यक्ष विवेकानंद पाटील, चिरंजीव अभिजित पाटील व इतर संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावात काढून त्यातून येणार्‍या रकमेतून शेतकरी कामगार पक्षाचे ठेवीदार असलेले कार्यकर्ते, इतर ठेवीदार, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समिती, गृहनिर्माण सोसायटींच्या ठेवी परत कराव्यात अशा मागणीचे निवेदन कांतीलाल कडू यांनी डॉ. म्हसे यांना दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी सविस्तर बैठकीचे आयोजन डॉ. म्हसे यांनी केले आहे.
 
या बैठकीला कांतीलाल कडू यांच्यासह विशेष गुन्हे अन्वेषण पुणे शाखेच्या उपअधीक्षक, कोकण विभागीय सहकारी संस्थेचे सह. निबंधक, सहकारी उपनिबंधक ठाणे जिल्हा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पनवेल, पनवेल सह निबंधक, सहकारी संस्था, अवसायक व मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नाळा बँक, मलमत्ता संरक्षक तथा प्रांत अधिकारी पनवेल आदी संबंधितांना या बैठकीला उपस्थित राहण्यास सुचविले आहे.