स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्यात भारत ७७ स्थानावर
स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावरून ७७ स्थानावर आला आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. या यादीत ब्रिटनचा पहिला क्रमांक आहे. मागील वर्षी या यादीमध्ये भारत ७४व्या क्रमांकावर होता. स्विस बँकांमध्ये परकीयांनी जमा केलेल्या पैशांपैकी केवळ ०.०६ टक्के भारतीयांचा वाटा आहे. त्याच वेळी २०१९ च्या अखेरीस या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणार्या यूके नागरिकांच्या एकूण ठेवींमध्ये २७ टक्के वाटा आहे.
एसएनबीच्या ताज्या आकडेवारीनुसार स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवी (भारतात असलेल्या शाखेतून ठेवींसह) २०१९ मध्ये ५.८ टक्के घसरून ८९.९ करोड स्विस फ्रेंक (६,६२५ कोटी) पर्यंत खाली आले आहे.बँकांनी एसएनबीला दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. या यादीत ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका दुसऱ्या, वेस्ट इंडीज तिसऱ्या, फ्रान्स चौथ्या आणि हाँगकाँग पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या पाच देशांमध्ये स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांच्या ५० टक्क्यांहून अधिक रक्कम आहे. पहिल्या दहा देशांमध्ये जर्मनी, लक्झेंबर्ग, बहामास, सिंगापूर आणि केमन बेटांचा समावेश आहे. केवळ २२ देश आहेत ज्यांचा स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या पैशात हिस्सा एक टक्का किंवा त्याहून अधिक आहे. यामध्ये चीन, जर्सी, रशिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, पनामा, इटली, सायप्रस, युएई, नेदरलँड्स, जपान आणि गुर्नेसी यांचा समावेश आहे.