शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 20 मार्च 2017 (10:42 IST)

टाटा मोटर्सच्या कामगारांचा जेवणावर बहिष्कार

टाटा मोटर्समध्ये वेतनवाढ करारावरून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात नव्याने संघर्ष सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवणावर बहिष्कार टाकून कामगारांनीही संघटनेच्या आंदोलनाला बळ दिले. जेआरडी टाटा यांच्या पुतळ्याजवळ बसून कामगार नेत्यांनी दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच ठेवल्याने वेतनवाढीचा विषय चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. त्यामुळे निर्णयाकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
 
उद्योगनगरीचा कणा समजल्या जाणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीत दोन वर्षांपासून वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे. सातत्याने प्रयत्न करूनही तो सुटू शकलेला नाही. काही मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा होत असली तरी निश्चित पगार, त्यासाठीचे टप्पे आणि ब्लॉक क्लोजरचे सूत्र आदी मुद्दय़ांवर एकमत होत नाही. यासंदर्भात कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापनांत मुंबईत झालेल्या वाटाघाटी फिसकटल्याने गुरूवारपासून आंदोलन सुरू झाले. टाटा यांच्या पुतळ्याजवळच त्यांनी ठिय्या मांडला. दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करून कामगार प्रतिनिधींनी आंदोलन सुरूच ठेवले. कामगारांनीही जेवणावर बहिष्कार टाकून त्यांना पािठबा दिला. त्यानंतर, व्यवस्थापनाने आंदोलक कामगार प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून घेतले. तथापि, समाधानकारक चर्चा होऊ शकली नाही. सायंकाळी सहानंतर पुन्हा बैठक सुरू झाली, उशिरापर्यंत चर्चा सुरूच होती. बैठकीत नेमके काय सुरू आहे, याची उत्सुकता कामगार वर्गात होती.
 
वेतनवाढीवरून तीव्र संघर्ष सुरू असल्याने कंपनीत अस्वस्थता आहे. ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. कंपनीतील अंतर्गत घडामोडींमुळे मिस्त्री पायउतार झाले आणि रतन टाटा यांच्याकडे पुन्हा सत्रे आली. टाटांमुळे कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आता तिढा सुटेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. व्यवस्थापन आडमुठेपणाने वागत असल्याचे व कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा कामगार नेत्यांचा आरोप आहे. तर, आम्ही तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असून कामगारांनी दोन पावले मागे आले पाहिजे, असे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दोहोंकडून आग्रही भूमिका मांडली जात असल्याने पेच कायम आहे. वाटाघाटीत काही मुद्दय़ांवर समाधानकारक तोडगा निघाला होता. मात्र, चर्चेची गाडी शेवटाकडे जात नव्हती. आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली असली तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. टाटा मोटर्समध्ये नेमका काय निर्णय होतो, याकडे उद्योगनगरीचे लक्ष लागले आहे.