शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (09:01 IST)

TCS 18 महिन्यांच्या 'वर्क फ्रॉम होम' नंतर पुन्हा सुरु करणार कार्यालयं

- निखिल इनामदार
कोव्हिडच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी भारतात टाळेबंदी लावण्यात आली आणि पाच लाखांहून अधिक कर्मचारी असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपनीची कार्यालयं बंद झाली.
 
आता 18 महिने दूरस्थ पद्धतीने काम चालवल्यानंतर देशातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वाधिक कर्मचारीवर्ग राखणाऱ्या या कंपनीची कार्यालयं पुन्हा सुरू होत आहेत. कार्यालयीन वातावरणामुळे जोपासल्या जाणाऱ्या सामाजिक भांडवलाची 'भरपाई' करण्याची ही वेळ आहे, असं कंपनीचे मुख्य कार्यवाहक अधिकारी एन. जी. सुब्रमण्यम यांनी बीबीसीला सांगितलं.
 
टीसीएसच्या भारतातील कर्मचारीवर्गापैकी सुमारे 90 टक्के जणांना कोव्हिड प्रतिबंधक लशीचा किमान पहिला डोस तरी मिळालेला आहे. गेल्या महिन्यात भारतातील लसीकरणाला वेग मिळाला. देशातील लसीकरणास पात्र असणाऱ्यांपैकी अर्ध्या लोकसंख्येचं अंशतः लसीकरण झालं आहे.
 
"सुमारे 50 टक्के लोक कामावर येण्यासाठी उत्सुक आहेत, हा आम्हाला मिळालेला मोठाच प्रतिसाद आहे," असं सुब्रमण्यम म्हणाले.
 
कोव्हिडची रुग्णसंख्या घटते आहे, त्यामुळे निर्बंधही शिथील होत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्फोसिस व विप्रो यांसह अनेक मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना कर्मचारी पुन्हा कार्यालयात येऊ शकतील अशी आशा आहे. याची अंमलबजावणी कशी होईल, याचा कोणालाच सध्या तरी अंदाज नाही.
पण सुरुवातीला किमान 80-90 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची टीसीएसची योजना आहे. त्यानंतर 2025 सालपर्यंत कामाची संमिश्र पद्धती प्रस्थापित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यानुसार अंतिमतः केवळ 25 टक्के कर्मचारीवर्ग कार्यालयातून काम करेल.
 
भारतात कोव्हिडची तिसरी लाट येईल की नाही, यावर बरंच काही अवलंबून आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे: संमिश्र किंवा लवचिक स्वरूपाच्या कार्यपद्धती आता कायम राहतील. कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना कामाची मुभा देणारं प्रारूप स्वीकारावं लागेल.
 
याचे भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपन्यांवर दूरगामी परिणाम होणार आहेत, इतकंच नव्हे तर या क्षेत्राला पूरक भूमिका निभावणाऱ्या स्थावर मालमत्ता क्षेत्रापासून ते हॉस्पिटॅलिटी क्षेत्रापर्यंत याचे परिणाम दिसतील.
 
अप्रत्यक्ष परिणाम
भारतातील संघटित खाजगी श्रमशक्ती 1 कोटी 20 लाख ते 1 कोटी 30 लाख या दरम्यान आहे, त्यातील 25 टक्के लोक माहिती-तंत्रज्ञान (आयटी: इन्फर्मेशन-टेक्नॉलॉजी) उद्योगामध्ये काम करतात. बंगळुरू, हैदराबाद व पुणे यांसारख्या शहरांमध्ये या उद्योगाने आर्थिक वाढीला चालना दिली. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो व इतर आयटी कंपन्यांनी वरील तीन शहरांमध्ये मोठी कार्यालयं उभारली आहेत.
 
एकट्या टीसीएसची 50 देशांमध्ये 250 ठिकाणी कार्यालयं आहेत. संमिश्र कार्यपद्धती स्वीकारल्याने विविध पायाभूत घटकांमध्ये कोणते बदल होतील, याचा तपास आपण अजून केलेला नाही, असं टीसीएसचे प्रतिनिधी सांगतात. कार्यालयीन इमारतींसारख्या भौतिक मालमत्तांचं काय करायचं, आणि कायमस्वरूपी घरून काम करण्याचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचारीवर्गाच्या पगारामध्ये कपात करायची का, या बाबींचा विचार अजून झालेला नाही.
 
पण स्थावर मालमत्ता क्षेत्रांसारख्या व्यवसायांसमोर दूरस्थ कार्यपद्धतीमुळे गंभीर धोके उद्भवण्याची शक्यता आहे.
 
भारतातील कार्यालयीन जागांच्या भाडेकरांपैकी 40 टक्के करार आयटी सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी केलेले आहेत. दूरस्थ कार्यपद्धतीमुळे नवीन व्यावसायिक जागांची मागणी कमी होईल, असं 'इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च' या संस्थेने म्हटलं आहे.
 
कंपन्यांची कार्यालयं बंद झाली, तर त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्न व पेय, हॉस्पिटॅलिटी, किरकोळ विक्री व देखभाल या क्षेत्रांवरही विपरित परिणाम होईल. या सर्व क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअर उद्योगामुळे प्रचंड अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला होता.
 
"आमच्या धंद्यात 50 टक्क्यांची घट होईल, असा माझा अंदाज आहे," असं 'रमा हॉस्पिटॅलिटी'चे व्यवस्थापकीय भागीदार राहुल बोहरा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. कोरोनाची साथ येण्यापूर्वी बोहरा महाराष्ट्रातील सर्व आयटी पार्कच्या परिसरांमध्ये अन्नविक्री केंद्रं चालवत होते.
 
कोव्हिडपूर्व काळात रमा हॉस्पिटॅलिटीतर्फे सेवा पुरवल्या जाणाऱ्या सर्वांत लहान आयटी पार्कमध्येही 40 हजारांपर्यंत लोक कार्यरत होते, असं बोहरा सांगतात.
 
"पण आता कर्मचारी हळूहळू परत येत असले, तरी आठवड्याचे दोन वा तीन दिवस आळीपाळीने काम सुरू आहे."
'क्लाउड-शोअरिंग ही भविष्यातील वाट असेल'
परदेशातून भारतात येणाऱ्या कामामध्येही या साथीमुळे बरेच मूलभूत बदल होणार आहेत.
 
1990-2000 च्या दशकांमध्ये जागतिक कंपन्यांनी 'बॅक ऑफिस' पातळीवरचं काम बंगळुरूसारख्या शहरांकडे वळतं केलं. या ठिकाणी कमी खर्चात तंत्रज्ञानविषयक कर्मचारी उपलब्ध असल्यामुळे कंपन्यांना ही व्यवस्था लाभदायक ठरत होती.
 
पण दूरस्थ कामाच्या पद्धतीमुळे सॉफ्टवेअर सेवांची भविष्यातील वाट ऑफशोअरिंगची (काम परदेशातून करवून घेणं) नसेल, तर 'क्लाउड-शोअरिंग'ची असेल, असं टीसीएसच्या सुब्रमण्यम यांना वाटतं.
 
कोव्हिडमुळे टीसीएसला जगभरातील विविध देशांमधल्या गुणवान व्यक्तींना शोधून त्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कामावर घेणं भाग पडलं.
 
कर्मचाऱ्यांना कुठूनही आणि कोणत्याही वेळी काम करता यील, यासाठी इंटरनेटच्या आधारे जगातील सर्वांत मोठी वितरित गुणवत्ता बाजारपेठ निर्माण करण्याची या कंपनीची योजना आहे.
 
"जगभरात पसरलेला अदलाबदलयोग्य गुणवत्तेचा साठा निर्माण करण्याचा आमचा विचार आहे. याला 'टॅलेन्ट क्लाउड' असं म्हणता येईल," असं सुब्रमण्यम म्हणाले.
 
"कामाचा काही भाग एका विशिष्ट ठिकाणी केला जाईल, पण बहुतांश काम लोकांना एका ठिकाणी प्रत्यक्ष एकत्र न आणताही करता येईल," असं त्यांनी सांगितलं.
 
पण कंपनीच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठांमध्ये लोकांना प्रत्यक्ष भरती करून घेण्यासाठी गुंतवणूक केली जाईल, असं टीसीएसकडून सांगण्यात आलं.
 
युनायटेड किंगडममध्ये (युके) टीसीएसचे 18 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत आणि या वर्षी टीसीएस ही युकेमधील सर्वांत मोठी आयटी सेवा कंपनी झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे. शिवाय, येत्या वर्षभरात युकेमध्ये आणखी 1500 लोकांची भरती करण्याची योजना आहे- यामध्ये स्थानिक विद्यापीठांमधील 500 पदवीधरांचा समावेश असेल.
 
अमेरिकेमध्ये पाच हजार नोकऱ्या निर्माण करणार असल्याचंही या कंपनीने सांगितलं. चालू वर्षामध्ये टीसीएस अमेरिकेत वाढीव गुंतवणूक करणार आहे.
 
टीसीएस जिथे कार्यरत असेल तिथल्या बाजारपेठेशी बांधिलकी मानत असल्याचं सुब्रमण्यम सांगतात.
 
"क्लाउडवर कुठेतरी बसून पुरत नाही... स्थानिक पातळीवरही उपस्थिती गरजेची असते, स्थानिक पातळीवर कंपनीचं दिसणंही आवश्यक असतं," असं ते म्हणतात.