1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (15:43 IST)

Paytm : कोणत्या चुकांमुळे पेटीएम डब्ब्यात जात आहे

paytm
आधी बायजूज आणि आता पेटीएम. भारतीय अर्थव्यवस्थेत उठून दिसणारे हे दोन स्टार्टअप अडचणीत का आले आहेत?पेटीएम ही अलीकडच्या काळातील भारतीय स्टार्ट-अप्स विश्वासतली सर्वांत मोठी यशोगाथा आहे, असं म्हटलं जायचं. पण आता त्यांची पेमेंट बँक बंद होणार आहे.
 
भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वेगावर स्वार झालेल्या या स्टार्ट अप्सची यशोगाथा आता कमकुवत होताना दिसतेय.
 
पेटीएमची पेमेंट बँक ही RBIच्या नियामक प्रकरणांमध्ये अडकली आहे.
 
मोठ्या प्रमाणात KYC उल्लंघन केल्यामुळे पेटीएमवर मनी लाँड्रिंगचा संशय निर्माण झाला आहे.
 
त्यामुळे RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बहुतांश कामकाजावर बंदी घातली आहे.
 
पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला 1 मार्च 2024 पासून नवीन ठेवी, निधी हस्तांतरण आणि नवीन ग्राहक घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
 
RBIने पेटीएमला त्यांच्या बँकेतील अनियमितता ओळखण्यासाठी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
पेटीएमच्या पेमेंट्स बँकेत अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. लाखो खात्यांची KYC म्हणजे ग्राहकांच्या ओळखपत्राची माहिती घेण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
 
लाखो बँक खात्यांचे पॅन प्रमाणीकरण अयशस्वी झालं होतं. हजारो खात्यांमध्ये एकच पॅन क्रमांक देण्यात आला होता.
 
पेटीएमला उतरती कळा का लागली?
पेटीएमने 2010 मध्ये आपले कार्य सुरू केलं. पण मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये देशात नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा पेटीएमची तुफान भरभराट झाली.
 
या काळात संपूर्ण देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या.
 
या काळात, पेटीएमची मूळ कंपनी वन-97 कम्युनिकेशनला कॅशलेस व्यवहारांच्या वाढीचा सर्वाधिक फायदा झाला.
 
'ATM नही Paytm करो' चा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात घुमू लागला.
 
मे 2016 मध्ये पेटीएम पेमेंट्स बँक सुरू झाली. तेव्हा पत्रकारांनी बँकेचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना विचारले की,
 
RBIच्या कठोर नियमांमुळे इतर कंपन्या आपले परवाने सरेंडर करत आहेत आणि या व्यवसायातून बाहेर पडत आहेत, तुम्ही याकडे कसं पाहता? तेव्हा ते म्हणाले होते की, "कंपन्यांनी अशाप्रकारे व्यवसायातून बाहेर पडणं हे आश्चर्यकारक आहे. पण आम्हाला कोणताही अडथळा येईपर्यंत पेटीएमचा प्रवास सुरू राहील."
 
पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला जानेवारी 2017 मध्ये परवाना मिळाला आणि त्याच वर्षी मे मध्ये त्यांनी काम सुरू केलं.
 
दरम्यान, चीनची टेक कंपनी अलीबाबा आणि जपानी गुंतवणूकदार कंपनी सॉफ्टबँक यांच्या फंडिंगमुळे, पेटीएमची मूळ कंपनी वन-97 कम्युनिकेशन आर्थिक क्षेत्रातील एक अतिशय शक्तिशाली कंपनी म्हणून उदयास आली होती.
 
पण सात वर्षांनंतर पेटीएमच्या नेत्रदीपक यशाच्या मार्गात मोठा अडथळा आला आहे.
 
खरंतर पेटीएमच्या समस्या 2022 मध्ये IPO ची सुरुवात झाल्यानंतरच सुरू झाल्या.
 
मार्च 2022 मध्ये, त्याचा IPO सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी, त्याच्या शेअर्सची किंमत 2150 रुपयांच्या लिस्टिंग किंमतीच्या एक चतुर्थांश इतकी घसरली होती.
 
त्यावेळीही RBIने आपल्या पेमेंट बँकेला तत्काळ नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोखलं होतं.
 
त्यादरम्यान असं सांगितलं जातं की पेमेंट्स बँकेने अली बाबा कंपनीला काही महत्त्वाची माहिती लीक केली होती.
 
त्यावेळी पेटीएममध्ये अलीबाबाची 27 टक्के भागीदारी होती. आता पुन्हा एकदा पेटीएमचे शेअर्स वेगाने घसरत आहेत.
 
सोमवारी (5 जानेवारी) पेटीएमच्या शेअर्सची किंमत 761 रुपयांवरून 438 रुपयांपर्यंत घसरली होती.
 
गेल्या तीन सत्रांमध्ये ही घसरण दिसून आली आहे. RBIच्या कारवाईनंतर पेटीएमची मूळ कंपनी वन-97 कम्युनिकेशन सतत 'संकट व्यवस्थापना'मध्ये गुंतलेली आहे.
 
कंपनीवर मनी लाँड्रिंगचे आरोप असल्याच्या बातम्या येत असून ईडी कंपनीची चौकशी करू शकते, असं बोललं जात आहे.
 
या दरम्यान, वन-97 कम्युनिकेशनने हे वृत्त निराधार असल्याचे म्हटलं आहे.
 
बायजुजचा उदय आणि ऱ्हास
EduTech कंपनी बायजू ही एकेकाळी भारतातील सर्वांत यशस्वी स्टार्ट-अप म्हणून गणली जात होती. आता ही कंपनी अनेक संकटांना सामोरी जात आहे.
 
पण आता कंपनीकडे रोख रक्कम नाही. ही कंपनी त्यांचा आर्थिक अहवाल सादर करण्यात उशीर करत आहे.
 
2022मध्ये कंपनीची किंमत 22 अब्ज डॉलर होती. पण त्याची किंमत 99 टक्क्यांनी कमी झाली.
 
2021-22 या आर्थिक वर्षात बायजूचं उत्पन्न 5298.43 कोटी रुपये होतं. पण तोटा 8245 कोटी रुपये होता. खर्च 94 टक्क्यांनी वाढून 13,668 कोटी रुपये झाला आहे.
 
कंपनी टिकली तरच गुंतवणूकदारांना पैसे मिळतील असं एका अहवालानुसार सांगण्यात येत आहे.
 
कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनाही आपलं पद गमवावं लागू शकतं, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
या सर्व संकटांमध्ये, IT सेवा कंपनी सर्फर टेक्नॉलॉजीने NCLT ला Byju's विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया पुढे नेण्याचं आवाहन केलं आहे.
 
2020 मध्ये जेव्हा देशव्यापी लॉकडाऊनमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद होती. तेव्हा बायजूचे यश शिखरावर पोहोचलं होतं.
 
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर एका वर्षात कंपनीने एक अब्ज डॉलरहून अधिक भांडवल उभं केलं.
 
या काळात बायजूच्या अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या बाजारातून बाहेर पडल्या.
 
या काळात बायजूने एकामागून एक अनेक अधिग्रहणं केली. कंपनीने आपल्या खर्चातही अनेक पटींनी वाढ केली होती.
 
एकेकाळी, Byju's कदाचित भारतीय टीव्ही चॅनेलवर सर्वांत जास्त दिसणारा ब्रँड होता.
 
पेटीएम आणि बायजूने काय चूक केली?
पेटीएम आणि बायजूने अशी कोणती चूक केली, ज्यामुळे ते आज अडचणीत सापडले आहेत?
 
अर्थतज्ज्ञ आणि स्टार्ट-अप्स गुरू म्हणून ओळखले जाणारे शरद कोहली यांच्यामते,
 
"Paytm ने RBI च्या काही नियमांचे पालन केलं नाही. दोन वर्षांपूर्वी पेटीएमच्या पेमेंट्स बँकेबाबत काही सवाल-जबाब करण्यात आले होते. यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली नाही. मिळालेल्या इशाऱ्यानुसार स्वत:मध्ये बदलही केला नाही. त्याचे परिणाम आज त्याला भोगावे लागतायत”
 
बायजूच्या अपयशाचे कारण सांगताना ते म्हणतात, "बायजूजचं मॉडेल खूप महत्त्वाकांक्षी होतं. कंपनीने एकापाठोपाठ एक अधिग्रहण सुरू केले आणि गुंतवणूकदारही त्यात पैसे गुंतवू लागले. कंपनीचं मूल्यांकन 22-23 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचलं होतं. पण कंपनी विसरली की त्यांचे ऑपरेशनचे मॉडेल कोरोना काळापुरतेच होते.”
 
पण कोरोना काळानंतर मुलं शाळेत जाऊ लागली आणि वर्गात बसून अभ्यास सुरू झाला.
 
मुलांनी ऑनलाइन अभ्यास करणं बंद केलं. पण कंपनीला वाटलं की मुलं कदाचित पुन्हा शाळेत जाणार नाहीत.
 
ऑनलाइन अभ्यास कमी होताच कंपनीला तोटा होऊ लागला. दुसरीकडे, मधल्या काळात त्यांनी आपला खर्चही वाढवला होता.
 
भारतात 1 लाख 15 हजार नोंदणीकृत स्टार्ट-अप आहेत. अमेरिका आणि चीननंतर भारतात सर्वांत मोठी स्टार्ट-अप इको सिस्टम आहे.
 
स्टॉक मार्केट विषयाचे अभ्यासक डॉ. अनिरुद्ध मालपाणी म्हणतात की बायजू आणि पेटीएम या कंपनी अडचणीत येण्याची दोन वेगवेगळी कारणं आहेत.
 
ते म्हणतात, "बायजूने सुरुवातीला खूप चुकीची विक्री केली. त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये ओरिजिनल गोष्ट नव्हती. अमेरिकेतल्या खान अ‍ॅकडमीचं ते कॉपी-पेस्ट मॉडेल होतं. फरक एवढाच होता की बायजू विद्यार्थ्यांना टॅबलेट द्यायचे."
 
कंपनीची सुरुवातीची भरभराट पाहून अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसा टाकायला सुरुवात केली.
 
मालपाणी म्हणतात. “एका गुंतवणूकदाराने त्याचे पैसे दुप्पट केले, तर दुसऱ्याने ते चौपट केले. त्यांच्यात एक चढाओढ सुरू झाली. प्रत्येक गुंतवणूकदार इतरांना पाहून पैसे गुंतवत होता आणि विचार करत होता की जेव्हा प्रत्येकजण पैसे गुंतवेल तेव्हा नक्कीच हा उपक्रम यशस्वी होईल. पण कंपनीचं ऑपरेशन मॉडेल फेल झालं आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले.”
 
पेटीएमने काही काळ चांगली कामगिरी केली पण हळूहळू तेही अडचणीत आले.
 
“पेटीएम अशा सेक्टरमध्ये काम करत होते जे नियमांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजे RBI तिथल्या घडामोडींवर बारीक नजर ठेवते. फिनटेक कंपन्यांना RBIचे सर्व नियम पाळावे लागतात. पेटीएमने नियमांचं पालन केलं नाही आणि RBIच्या निगराणीखाली आले. इथूनच समस्या सुरू झाली," असं मालपाणी सांगतात.
 
पण शिक्षण मंत्रालय आणि वाणीज्य मंत्रालयाने बायजूजच्या प्रकरणात आधीच कारवाई केली असती तर बायजूड एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक करू शकले नसते, असं मालपाणी यांना वाटतं.
 
चुकीच्या महसूल मॉडेलमुळे बायजूज देखील अयशस्वी झाल्यांच त्यांना वाटतं.
 
पत्रकार आणि 'मॉर्निंग कॉन्टेक्स्ट' या संशोधन कंपनीचे संस्थापक प्रदीप साहा म्हणतात,
 
"बायजूजच्या सिस्टीममध्ये समस्या होती. त्याचं महसूल मॉडेल योग्य नव्हतं. बिझनेस मॉडेलमध्येही त्रुटी होती. कंपनीचं विक्री धोरणही योग्य नव्हतं. कंपनीची विक्री चुकली होती. ती तिच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसा मिळवत होती. त्यामुळे मालकांनी क्षमतेपेक्षा जास्त कंपन्या खरेदी करण्यास सुरुवात केली. कंपन्या विकत घेण्यासाठी खूप पैसा लागतो. त्यामुळे कंपनीने $1.2 बिलियनचे कर्ज घेतलं आणि शेवटी कर्जाची परतफेड करण्यात ती असमर्थ ठरली."
 
भारतातील स्टार्ट-अप विश्व
पेटीएम आणि बायजू अडचणीत आल्यानंतर काही लोकांनी देशातील स्टार्ट-अप सिस्टिमबद्दल शंका व्यक्त केली आहे. देशात ही व्यवस्था अपयशी ठरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
पण तज्ज्ञांनी अशा शंका पूर्णपणे फेटाळल्या आहेत.
 
स्टार्ट-अप गुरू शरद कोहली म्हणतात, "तुम्ही एक किंवा दोन स्टार्ट-अप कंपन्यांच्या अपयशाला संपूर्ण यंत्रणेचं अपयश म्हणू शकत नाही. अनेक यशस्वी स्टार्टअप्स आहेत जे भारतात आणि भारताबाहेरही नाव कमवत आहेत.”
 
स्टार्ट-अप व्यवसायात यशाचा दर फक्त 30-40 टक्के आहे. 60 ते 70 टक्के स्टार्टअप्स अयशस्वी होतात.
 
जे चांगले स्टार्ट अप आहेत ते अतिशय यशस्वीपणे व्यवसाय करतात आणि मोठ्या संख्येने लोकांना रोजगार देतात, असं कोहली सांगतात.
 
कोहली पुढे सांगतात, पेटीएम आणि बायजूजसारखे स्टार्ट-अप हे जाणूनबुजून किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे तोट्यात जातात. यामुळे भारताच्या स्टार्ट-अप इको सिस्टीमला थोडं बदनाम केलं जातं. मात्र, भारताची स्टार्ट-अप प्रणाली आणि उद्योजकता मजबूत आहे. एक-दोन स्टार्ट-अपच्या निकृष्ट कामामुळे त्याचं नुकसान होणार नाही.
 
अनिरुद्ध मालपाणी यांनीही भारतीय स्टार्ट-अप्स कोसळण्याची भीती निराधार असल्याचं म्हटलं आहे.
 
पण मालपाणी हेही सांगतात की, "अनेक स्टार्ट-अप्स गुंतवणूकदारांकडून पैसे घेतात आणि म्हणतात की ते त्यांचे पैसे दुप्पट किंवा चौपट करतील. त्यासाठी त्यांना आणखी अनेक आश्वासनं द्यावी लागतात आणि ती पूर्ण होत नाहीत. अशा स्टार्ट अप्सचा अर्धा पैसा जाहिरात, विपणन आणि प्रेस रिलीझमध्ये खर्च होतो."
 
मालपाणी म्हणतात की ते भारतातील स्टार्ट-अप्सबद्दल खूप आशावादी आहेत.
 
"गुंतवणूकदार आणि या कंपन्यांची सेवा घेणारे लोक आता प्रश्न विचारू लागले आहेत. त्यांना हे विश्व बऱ्यापैकी समजू लागलं आहे. त्यांना यापुढे मूर्ख बनवणं सोपं राहिलं नाही. पेटीएम आणि बायजूसारख्या परिस्थितींपासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं याचा ते अभ्यास करू लागले आहेत."
 
प्रदीप साहा यांच्यामते, भारतात स्टार्ट अप्सची व्यवस्था अपयशी ठरत नाही. ज्यांचं बिझनेस मॉडेल चांगलं नाही अशाच स्टार्ट-अप कंपन्या अपयशी ठरत आहेत.
 
हा स्टार्ट अप्ससाठी आव्हानांचा काळ आहे. जगभरातील स्टार्टअप्सना निधीची समस्या भेडसावत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा स्टार्ट-अप्स कंपन्यांवर परिणाम होत आहे.
 
साहा म्हणतात, "पेटीएमआणि बायजूजचं अपयश पाहता, तुम्ही असं म्हणू शकत नाही की स्टार्ट-अप्स इको सिस्टम भारतात अपयशी ठरत आहे. पेटीएम आणि बायजू सारख्या स्टार्ट-अप कंपन्यांनी चुका केल्या आहेत. त्यांच्या संस्थापकांनी हे मान्य करून त्यात सुधारणा करावी. या क्षेत्रात नवोदितांनी इतिहासातून धडा घेतला पाहिजे. आपण काय करू नये हे इतिहास दाखवतो. जर तुम्ही बायजूकडे पाहिले तर तुम्हाला कळेल की EduTechमध्ये काय करायला नको होते."
 
Published By- Priya Dixit