मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2017 (16:20 IST)

‘प्रभात’सिनेसाक्षर सुजाण प्रेक्षक घडविणारी चळवळ आहे. – अमोल पालेकर

“प्रभात चित्र मंडळ ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे. भारतात एकूण साडेतिनशे फिल्म क्लब आहेत पण सातत्याने उमेदीने काम करणारी तसेच वयाचा व कार्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारी प्रभात ही एकमेव संस्था आहे. चांगल्या अंगाने चित्रपटाचा रसास्वाद घेऊ शकेल असा प्रेक्षकवर्ग तयार करून तो वृद्धिंगत करण्याचे मोठं कार्य प्रभातच्या माध्यमातून होत आहे. तरूणपिढीपर्यंत जगातील उत्तमोत्तम चित्रपट पोहोचविणं गरजेचं आहे. आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत, षष्ठी महोत्सवाला प्रेक्षकात बसून जोरजोरात टाळ्या वाजवून आनंद साजरा करेन”,  अशा भावना ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेता अमोल पालेकर यांनी प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या.
 
5 जुलै 1968 रोजी वसंत साठे, दिनकर गांगल आणि सुधीर नांदगांवकर आणि इतर सिने अभ्यासकांनी मिळून स्थापन केलेल्या प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ काल संपन्न झाला. प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या प्रक्षागृहात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या शुभहस्ते व अमोल पालेकर, मनमोहन शेट्टी, किरण शांताराम, सुधीर नांदगांवकर, दिनकर गांगल, धर्माधिकारी आणि संतोष पाठारे यांच्या उपस्थितीत प्रभात चित्र मंडळाचे मुखपत्र असलेल्या वास्तव रुपवाणी या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रभात चित्र मंडळाच्या पन्नास वर्षांचा कार्यप्रवास एका ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून उलगडण्यात आला. प्रभातचे विद्यमान अध्यक्ष श्री. किरण शांताराम यांनी प्रास्ताविक केले. प्रभातचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ सिनेसमिक्षक श्री. सुधीर नांदगांवकर आणि दिनकर गांगल यांनी आपल्या खुमासदार शैलीत पन्नास वर्षांच्या वाटचालीतील अनेक आठणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी भारतातील तसेच मुंबईतील इतर फिल्म सोसायटींच्या तुलनेत प्रभात चित्र मंडळाचे कार्य अधोरेखित करताना सुवर्ण महोत्सवानिमित्त व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक शाम बेनेगल, गोविंद निहलानी, नीना कुलकर्णी, रवी जाधव, दिलीप करंबेळकर, मनमोहन शेट्टी आदी मान्यवरांची एक स्वागत समिती गठीत करण्यात आली. या समितीतील मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता कान्स चित्रपट महोत्सवात सर्वात्कृष्ट ठरलेल्या ‘आय डॅनियल ब्लेक’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने करण्यात आली.
 
या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी चित्रपट रसास्वाद शिबिरे, मराठी चित्रपट महोत्सव, ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा महोत्सव, ‘चित्रभारती’-भारतीय चित्रपटांचा महोत्सव, महिलांसाठी विशेष चित्रपट महोत्सव, मान्यवरांच्या पसंतीच्या चित्रपटांचे प्रदर्शन, अभ्यास शिबिरे, चर्चासत्र आणि वास्तव रूपवाणी विशेषंकाचे प्रकाशन त्याच बरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कार्यकारीणी सदस्य अमित चव्हाण यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अभिजीत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष पाठारे यांनी केले.