सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची व्हिडीओ पोस्ट करत आत्महत्या
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी पुण्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हंटले आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून, यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा सांगितल्या आहेत.
व्हिडीओमध्ये राजू म्हणतात
आत्महत्येपूर्वी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजू म्हणतात, नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.
हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.