शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जानेवारी 2019 (00:37 IST)

अवधूत, श्रेयस ने दुबईत रोवला मराठीचा झेंडा...!

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा 'जल्लोष 2018' हा कॉन्सर्ट नुकताच दुबई मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मराठी चित्रपटांमधील जुन्या, नवीन गाण्यांनी सजलेल्या या कॉन्सर्ट ला दुबई मधील मराठी नागरिकांनी अगदी तूफान प्रतिसाद दिला. किंबहुना हा कॉन्सर्ट म्हणजे दुबईकरांसाठी एक पर्वणीच ठरली. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि मराठी मधील पहिला रॅपर श्रेयस जाधव उर्फ किंग जे. डी. यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने आणि धमाकेदार सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि त्यांच्या गाण्यांवर थिरकायला भाग पाडले. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडुन 'वन्स मोर' मिळत होता. आणि या घडणाऱ्या सर्व गोष्टींना चार चाँद लावले ते स्पृहा जोशी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने. दुबई मध्ये एवढया मोठ्या स्वरूपाचा होणारा बहुदा हा पाहिलाच कॉन्सर्ट असेल. जर प्रेक्षक खरे रसिक असतील तर आपली कला सादर करायला खरी मजा येते. अशाच स्वरूपाचे चित्र दुबई मध्ये होते. म्हणतात ना संगीताला कोणत्याही भाषेची मर्यादा नसते. त्याचमुळे अरेबिक देश असूनही आपल्या मराठी भाषेला, मराठी गाण्यांना दुबईकरांनी अगदी सहज स्वीकारले. या मिळणाऱ्या प्रेमाने सर्वच कलाकार भावुक झाले होते. या अशा कार्यक्रमांमुळेच तर आपले मराठी संगीत साता समुद्रापार विस्तारत आहे. हिंदी, इंग्लिश सारख्या संगीताएवढेच महत्त्व मराठी संगीताला मिळत आहे. मराठी संगीताचा हा अटकेपार झेंडा अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांनी अगदी दिमाखात फैलावला आहे यात कोणतीच शंका नाही. आणि या डोळ्याचं पारणं फिटलं अशा सोहळ्यामुळे दुबईकरांसाठी आधीच 2018 चा सुरेल शेवट आणि 2019 ची धमाकेदार संगीतमय सुरवात झाली आहे. पुन्हा लवकरच भेटणार या वचनावर या संपूर्ण 'जल्लोष 2018' च्या टीमने दुबईकरांचा भावुक निरोप घेतला.