शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (08:43 IST)

बाईपण भारी देवा : ‘ते दृश्य ठेवलं म्हणून सेन्सॉरनं U/A सर्टिफिकेट दिलं’

baipan bhari deva
जान्हवी मुळे
 
Baipan Bhari Deva
 ‘अर्धं आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही?’
 
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातली चारू हा प्रश्न विचारते, तेव्हा अनेक बायकांना त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं.
 
या चित्रपटानं सध्या महाराष्ट्रातल्या थिएटर्समध्ये अक्षरश: धूमाकुळ घातला आहे, असं म्हटलं तर चुकीच ठरू नये. या चित्रपटानं 10 दिवसांतच 26.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
 
चित्रपटाला एवढं यश कशामुळे मिळालं आणि विशेषतः महिलांना तो का आवडतो आहे, याविषयी आम्ही या चित्रपटाच्या टीमशी बातचीत केली.
 
फिल्ममधल्या सहापैकी चार बहिणी म्हणजे शशी अर्थात वंदना गुप्ते, साधना अर्थात सुकन्या कुलकर्णी मोने, पल्लवी अर्थात सुचित्रा बांदेकर, केतकी अर्थात शिल्पा नवलकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे या गप्पांमध्ये सहभागी झाले होते.
 
'मोकाट यश'
प्रश्न – या चित्रपटाला एवढं यश मिळेल, असं वाटलं होतं का, कशामुळे लोकांना हा चित्रपट आवडतो आहे?
 
वंदना गुप्ते – एवढ्या यशाची खात्री नव्हती, पण यश मिळेल हे नक्की माहिती होतं, कारण चित्रपटात वेगळेपणा आहे. खरंच हा सिनेमा हटके आहे. बायकांच्या मनात इतक्या गोष्टी दडलेल्या असतात, त्या बाहेर काढायला आम्ही सहाजणी उभ्या आहोत, यातच त्या सिनेमाचं यश आहे.
 
दीपाच्या वयापासून माझ्यापर्यंत, आणि रोहिणी तर माझ्यापेक्षा मोठी आहे. या प्रत्येक वयागटातल्या बाईला आमच्या कॅरेक्टरमधून काही ना काही मिळतं किंवा ती त्यातून गेलेली असते.
 
पुढे काय करायचं या संभ्रमात असताना, ते फ्रस्ट्रेशन बाहेर कसं काढायचं, आनंद कसा लुटायचा या सगळ्या गोष्टी बायकांना आपल्याशा वाटतात. त्यांना एक मोकळी वाट मिळाली आहे, त्यामुळे मोकाट सुटल्या आहेत बायका अगदी.
 
प्रश्न – मग केदार, असा ‘मोकाट’ बायकांचा चित्रपट काढावा असं तुम्हाला कुठे वाटलं?
 
केदार शिंदे – या चित्रपटाची लेखिका वैशाली नाईक मालिकांसाठी बरंच लिहिते. ती 2018 साली मला भेटली. तिनं मला पहिली ओळ ऐकवलेली की, ‘सहा बहिणी ज्यांचं एकमेकींशी पटत नाही, त्या एका मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येतात आणि त्यातून त्यांचं नातं उलगडत जातं.’
 
तिथेच मी म्हटलं की ही फिल्म मला बघावीशी वाटेल. कारण मी प्रेक्षक असेन, तर या सिनेमाचं तिकीट काढेन. आणि पात्रही कशी तर चाळिशीपासून ते साठीपर्यंत. त्यामुळे मला गंमत वाटली.
 
काहीतरी वेगळेपणा दिल्याशिवाय प्रेक्षक थिएटरपर्यंत येणार नाही. मला ही फिल्म एवढा धंदा करेल असं पहिल्या दिवशी वाटलं नव्हतं. पण एवढी खात्री होती की ही फिल्म वेगळी आहे आणि या सहा अभिनेत्री काय करतायत हे पाहायला लोक नक्की येतील.
Baipan Bhari Deva
फिल्मचं पोस्टर तयार केलं, तेव्हा मी म्हटलं की हेच पोस्टर कायम राहणार. त्यांनी बाकीच्या गेटअपमधले पोस्टर्सही तयार केले होते, पण मी म्हटलं की एकही लावायचं नाही.
 
कारण या पोस्टरकडे पाहून बायकांना वाटतं की असं व्हायचंय मला. म्हणजे पूर्वी अमिताभ बच्चनचे चित्रपट पाहताना आपणच मारामारी करतोय असं वाटायचं ना, तसंच या बायकांना या सहाजणींकडे बघून वाटत आहे.
 
त्यामुळे मोकाट बायकांना घेऊन फिल्म करावी आणि ती मोकाट धंदा करणारी असावी, असं मला वाटलं होतं.
 
बहिणींमधलं नातं
प्रश्न – शिल्पा, या चित्रपटात बहिणींमधलं नातं दाखवलं आहे. हे बहिणी-मैत्रिणींमधलं नातं किती महत्त्वाचं असतं, विशेषतः स्त्री वयाचे एक एक टप्पा पार करते तेव्हा?
 
शिल्पा नवलकर – बहिणी आणि मैत्रिणी ही दोन्ही नाती खूप महत्त्वाची आहेत. त्या दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की आपण आपल्या मैत्रिणी निवडू सकतो पण बहिणी निवडू नाही शकत.
 
पण अशा बहिणी किंवा ‘कझिन्स’ असतील, तेव्हा मला वाटतं की मैत्रिणींसोबत नातं टिकवायला जेवढे प्रयत्न करावे लागतात, त्यापेक्षा थोडे जास्त प्रयत्न करावे लागत असतील.
 
मैत्रिणी आपण निवडतो आणि त्यांच्यासोबत नातं जुळत जातं. पण जी जन्मानं मिळाली आहेत, अशा भावंडांसोबतच नातं टिकवायला थोडी जास्त धडपड करावी लागते, कामातून सवड काढून त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो, थोडा संवाद ठेवणं गरजेचं आहे.
 
प्रश्न – सुचित्रा, तुमचं या सिनेमातलं पात्र घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाते आहे. पण असा कुठलाही वेगळा बदल स्वीकारणं एखाद्या महिलेसाठी सोपं नसतं. तुमचा काय अनुभव आहे?
 
सुचित्रा बांदेकर – आपल्या आयुष्यातली परिस्थिती सतत बदलत असते. वेगवेगळ्या परिस्थितीत आपली प्रतिक्रियाही वेगळी असते. कठीण परिस्थितीत उभी राहू शकते तीच तर बाई असते.
 
मला वाटतं हेच आपल्या फिल्मच्या यशाचंही गमक आहे. कारण बायकांना प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रतिबिंब दिसत होतं. म्हणजे ट्रेन पकडायला माझी कशी धावपळ होते, जी सुकन्याची (सुकन्या यांनी रंगवलेल्या पात्राची) होत होती.
 
माझ्या बाहिणीला एकुलती एक मुलगी आहे, तिला वंदनाताईंच्या कॅरेक्टरसारखं वाटत होतं गंमतीत. कारण तिची मुलगी सासूला मम्मा असं म्हणते, तेव्हा आमच्या दीदीचा चेहराही पडलेला असतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटेसे प्रसंगही केदारनं उत्तम प्रकारे फिल्ममध्ये मांडले आहेत.
 
मेनोपॉजपासून सर्व विषयांवर उघड भाष्य
प्रश्न – एका विशिष्ठ वयानंतर अभिनेत्रींना मुख्य भूमिका मिळताना आजही आपल्या देशात फारशा दिसत नाहीत. मग त्या बाबतीत ही फिल्म कशी वेगळी ठरते आहे?
 
सुकन्या कुलकर्णी मोने – देशात अशा फिल्म कमी आहेत असं मी नाही म्हणणार, पण प्रमाण कमी आहे असं म्हणेन मी. हिंदीत विद्या बालन किंवा काजोल यांच्यासाठी अशा भूमिका लिहिल्या गेल्या आहेत.
 
पण मराठीत प्रमाण ‘ना के बराबर’ आहे. मराठीत ते धाडस कुणी करत नाही, जे पूर्वी असायचं. तसे चित्रपटांचे विषय त्यामानानं येत नाहीत. मधल्या काळात कदाचित अभिनेत्रींवर तेवढा विश्वास नसेल त्यांचा. पण केदारनं ते धाडस केलं आणि चित्र तुमच्यासमोर आहे.
 
थोडा आमच्यावरही (आमच्या वयाच्या अभिनेत्रींवरही) विश्वास ठेवायला पाहिजे. त्यासाठी लेखक चांगला पाहिजे आणि सोबतची टीमही तशी असली पाहिजे.
 
सुचित्रा बांदेकर –सहाजणीच नायिका आहेत, म्हणजे तुमच्यावर कुठलीतरी मोठी जबाबदारी आहे, असं केदारनं कधीही सांगितलं नाही. आत्ता तुम्ही मुलाखती घेताय, तेव्हा हे आमच्याही लक्षात येतंय की अरे, आपणच सहजणी आहोत.
 
प्रश्न – मेनोपॉज, मातृत्त्व, नैराश्य या गोष्टींवर समाजातही अजून उघडपणे चर्चा होत नाही. पण तुमच्या चित्रपटानं हे विषय अगदी सहजपणे पडद्यावर मांडले आहेत. त्याला विनोदाची झालर आहे, पण कुठेही गांभीर्य कमी झालेलं नाही.
 
वंदना गुप्ते – प्रेक्षकही आता प्रगल्भ झाले आहेत. आपण उगाचच त्यांना चमच्यानं भरवल्यासारखं करत असतो. मराठी साहित्य तर नेहमीच काळाच्या पुढे असतं. त्यामुळे एका मुलीनंच या विषयांवर मोकळेपणे लिहिलं आहे.
 
आम्हालाही अभिनय करताना मग काही वाटलं नाही. कारण आम्ही एकमेकींशीही खुलेपणानं मेनोपॉज किंवा कुठल्याही विषयावर बोलू शकतो. त्यामुळे काही वावगं आहे, असं वाटलंही नाही.
 
''त्या' दृश्यासाठी सेन्सॉरचं U/A सर्टिफिकेट'
प्रश्न – एक सशक्त लेखक असेल तर असे विषय सहज हाताळले जातात. मग ती लेखक महिला असल्यानं हा फरक पडतो असं वाटतं का?
 
शिल्पा नवलकर – मला असं वाटत नाही की स्त्री लेखक असल्यानं काही फरक पडतो, कारण तसं असतं तर केदारसारखा कुणी हा चित्रपट दिग्दर्शित करू शकला नसता.
 
मला असं वाटतं, असं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी माणूस म्हणूनच संवेदनशील असणं गरजेचं आहे. वैशालीच्या जागी दुसरा कुणी पुरुष असता, पण संवेदनशीलपणे हे मुद्दे समजून घेऊ शकला असता, तर तोही हे लिहू शकला असता.
 
त्यामुळे स्त्री लेखक असण्यापेक्षा चांगला लेखक असणं, संवेदनशील, समंजस माणूस असणं, दुसऱ्याच्या मनातलं जाणून घेणारा लेखक असणं पुरेसं असतं.
 
केदार शिंदे – शिल्पा म्हणते ते खरं असेलही पण आपल्याकडे अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे या चित्रपटातल्या दोन दृश्यांविषयी अगदी वेगळ्या प्रतिक्रिया मिळताना मी पाहिलं आहे.
 
मी ही स्क्रिप्ट काही लोकांना वाचयला दिली होती. एका मातब्बर माणसानं मला सांगितलं होतं की, बाकी सगळं ठीक आहे पण तो स्पोर्ट्स ब्राचा सीन काढून टाक.
 
पण मला असं वाटलं की असं करणं चुकीचं ठरेल. ते वैशालीनं लिहिलं आहे, म्हणूनच मला ते अजिबात काढायचं नव्हतं. कारण त्यात काही वावगं, अनकम्फर्टेबल असेल तर स्त्री म्हणून तीच पहिल्यांदा असं काही लिहिणार नाही.
 
मला वाचतानाही असं कधी वाटलं नाही. कारण त्या सीनमधलं एक अप्रतिम वाक्य आहे की तुम्हाला तुमची साईझ माहिती आहे का की वर्षानुवर्ष तेच?
 
मला एकदम माझी आई आठवली. तिनं कधीच या सगळ्याचं प्रदर्शन मांडलेलं नाही, आपल्या आपल्यातच ही गोष्ट ठेवली असेल. त्या सीनमध्ये रोहिणीताई आणि वंदनाताईचं कॅरेक्टर पाहतानाही वाटतं की या कित्येक वर्ष काही बोलल्या नसतील.
 
दुसरा मुद्दा, सेन्सॉरनं U/A सर्टिफिकेट दिलंय. त्याचं कारण काय तर मी बायकांना दारू पिताना दाखवलंय. तिथे एका व्यक्तीनं सांगितलं की अप्रतिम फिल्म आहे, हा सीन काढा लगेच U सर्टिफिकेट देतो. मी म्हटलं की मी नाही काढणार.
 
त्या व्यक्तीनं म्हटलं की कसं आहे, माझ्या आईसमोर मी कधीही दारू पीत नाही. माझ्या मनात आलं, म्हणजे दारू प्यायल्यावर ती रात्री झोपल्यावर जाताय ना घरी, म्हणजे खोटं तर किती मोठं बोलताय?
 
ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. ती बदलायला आपण आपल्या घरातूनच सुरुवात करायला हवी.
 
वंदना गुप्ते – प्रेशर कुकरची शिटी असतो ना, प्रेशर दबलेलं ते बाहेर पडतं. तसं होतंय बायकांचं हा सिनेमा पाहताना. जे त्यांच्या मनात आहे ते बाहेर पडतंय. जसं ही गाडीत बसून रडतेय, ती बाटलीवर राग काढते असे प्रत्येकीच्या आयुष्यातले फ्रस्ट्रेशन्स बघताना प्रेक्षकांना जाणवतंय.
 
'पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा'
प्रश्न – पुरुष प्रेक्षकांविषयी आपण बोलतो आहोत, पण फिल्ममधली पुरुष पात्रही अगदी वेगळी आहेत.
 
केदार शिंदे – लिखाणात ही पात्रं तशी लिहिली गेली होती. पण कुठे त्यांचं कॅरिकेचर होणार नाही असं ठरवलं होतं. शरद पोंक्षे तेव्हा आजारातून नुकताच बरा झाला होता, त्याचा चेहरा पाहून वाटलं हेच अण्णा. त्याला विचारलं आणि तोही लगेच तयार झाला. पियुष रानडे, स्वप्नील राजशेखर, सतीश जोशी, तुषार दळवी हे सगळेच खरे वाटतात.
 
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. हा चित्रपट खऱ्याखुऱ्या जागी शूट केलाय. त्यामुळे तो लोकांना आणखी खरा वाटतो आहे. एक सांगू, माझ्या आईला फिल्मची गणितं कळत नाहीत पण गोष्ट कळते. आणि तीच गोष्ट या फिल्मनं अगदी व्यवस्थित मांडली आहे.
 
मला वाटतं की स्त्रिया पाहतायत ही फिल्म पण घरातल्या पुरुषाला त्यांनी हा चित्रपट दाखवायला हवा. कारण पुरुष म्हणून सांगतो, की या फिल्ममुळे मला स्त्री कळली.
 
प्रश्न – चित्रपटातल्या साधनाला आवाज फुटतो आणि मग ती आपल्या सुनेलाही मदत करते. तुम्ही अशी कुणाला मदत करत असता?
 
सुकन्या कुलकर्णी – अर्थात अशी मदत करणं गरजेचं आहे, माझी सासू माझ्या पाठीशी होती म्हणून मीही हे सगळं करू शकले. मला एका व्यक्तीचं नाव नाही घेता येणार, पण माझ्या आसपास असलेल्या महिलांना मी शक्य तेव्हा मदत करण्याचा, त्यांच्या व्यवसायाला हातभार लावायचा प्रयत्न मी करते.
 
वंदना गुप्ते – बायका एवढं या फिल्मचं विश्लेषण करतायत, सोशल मीडियावर लिहिताना किती खोल जाऊन आपल्याला जे मांडायचं आहे ते मांडतायत, लिहून पाठवतायत. त्यांना स्वतःच्या आयुष्यात व्यक्त होणं जमलं नसेल, त्याला आता वाचा फुटली आहे सिनेमा पाहताना.
 
केदार शिंदे – मला इन्स्टाग्रामवर अनेक महिला मेसेज करतायत. अनेक गोष्टी शेअर करतायत. आदेश बांदेकरनं गेल्या काही वर्षांत काय मिळवलं असेल, याची एक अनुभुती मला या सात दिवसांत येते आहे. केदार शिंदे त्यांना इतका हक्काचा माणूस हेच मोठं आहे.