तुळजाभवानीच्या दर्शनाला ‘बापल्योक’चित्रपटाची टीम
वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन २५ ऑगस्टला आपल्या भेटीला येणारा नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला बापल्योक हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.
विशेष म्हणजे 'बापल्योकया चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. नाईंटीनाईन प्रोडक्शन्सचे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्सच्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मनापासून केलेली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यत पोहचते. बापल्योक चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीताला मिळलेला प्रतिसाद हेच दाखवून देतो. हा चित्रपट अनेक नानाविध नात्यांची गुंफण असून बापलेकाच्या नात्यातील मायेचा पदर उलगडून दाखविणारा 'बापल्योकप्रत्येकाला खूप काही देणारा असेल, असा विश्वास निर्माते विजय शिंदे व्यक्त करतात.