गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (15:41 IST)

...आणि पावसाळा होणार 'कलरफुल'

२ जुलैला प्रदर्शित होणार सई, ललितचा 'कलरफुल'-
मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे रसिकांना चित्रपटगृहांपासून लांब राहावे लागले. काही महिने चित्रपटगृहांचा अनुभव न घेतलेल्या प्रेक्षकांना २०२० वर्षाने जाता जाता अनलॉकचे गिफ्ट दिले. कोरोनाचा बसलेला हा विळखा जसा कमी व्हायला लागला, तसतशी मनोरंजनसृष्टी पूर्ववत होऊ लागली आणि आता नवनवीन मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांचा, घोषणांचा सिलसिला सुरु झाला.
 
काही दिवसांपूर्वीच मराठीतल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कलरफुल’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय सुंदर आणि रंगीन नाव असणारा हा सिनेमा घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टर झळकले असून प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ जुलैला प्रेमाच्या पावसाने चिंब भिजवायला हा सिनेमा येत आहे. हे पोस्टर प्रेमाचे सुखद अनुभव देणारे नवीन रंग उधळणारे आहे. अतिशय सुंदर, रोमँटिक धुक्यात हरवलेल्या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेली सई आणि ललितची जोडी अतिशय मोहक दिसत असून प्रेमाने ओतप्रोत असलेले त्यांचे डोळे आणि दोघांच्या कानावर लावलेले फुल लक्षवेधक ठरत आहे. जसजशी या सिनेमाविषयीची माहिती समोर येत आहे, तसतशी चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.
 
प्रकाश कुंटे दिग्दर्शित ह्या सिनेमाची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे. मानसी या मुखत्वे हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत असून हा सिनेमा मानसी यांच्या यंत्रा पिक्चर्स आणि मुन्ना शकुल यांच्या शकुल शोबिझ या दोन्ही बॅनरच्या सहयोगाने सादर होणार आहे. यानिमित्ताने यंत्रा पिक्चर्स बँनरच्या मानसी सांगतात, " मला यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ यांच्या एकत्रीकरणामुळे खूप आनंद होत आहे. आता आम्ही मिळून लवकरच हिंदी, मराठी आणि गुजराती सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. आमची मराठी चित्रपटांची सुरुवात 'कलरफुल' सिनेमाने होत असल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. यंत्रा पिक्चर्स, शकुल शोबिझ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने २ जुलैला प्रदर्शित होणारा हा सिनेमा नक्कीच सर्वांना प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवेल यात शंका नाही." यावर्षी यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ मराठीसह गुजराती चित्रपट आणि वेबसिरीज सुद्धा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.