‘मी वसंतराव’पाहून पुढील २० वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली - डॉ. रघुनाथ माशेलकर
रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'मी वसंतराव' या चित्रपटाची अद्यापही चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रेक्षक, समीक्षकांपासून सिनेसृष्टीतील कलावंतांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव केला. एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा पाहून प्रत्येकालाच जगण्याची वेगळी ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे.
'मी वसंतराव' अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरत असतानाच पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे देखील चित्रपट पाहून भारावून गेले.
वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल मला फार आदर आहे. राहुल मध्ये वसंतराव आहेत हे आज मला या चित्रपटातून जाणवलं. हा चित्रपट पाहताना प्रत्येक टप्प्यावर नवीन पैलू उलगडत जातातं. चित्रपटाची निर्मिती, मांडणी इतकी सुंदर आहे की चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं. 'मी वसंतराव'ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.