शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (13:33 IST)

ऋत्विक केंद्रेचा 'ड्राय डे' ३ नोव्हेंबरला 'ड्राय डे' सिनेमा प्रदर्शित

सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा ऋत्विक केंद्रे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या चित्रपटातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तरुणाईवर आधारित असलेला हा सिनेमा येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतून घराघरात पाहोचलेला हा लाडका 'विहान' त्याच्या आगामी ड्राय डे सिनेमात 'अजय' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.    
 
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत या सिनेमाबाबत ऋत्विक भरभरून बोलतो. हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास असून, मराठी सिनेजगतात या सिनेमामार्फत डेब्यू करत असल्यामुळे मी खूप उत्सुक असल्याचे तो सांगतो. तसेच दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी मोठ्या भावासारखी मला साथ दि ली असल्यामुळे, हा सिनेमा करताना कोणतेच दडपण आले नसल्याचे देखील त्याने पुढे सांगितले. 
 
'छोट्या पडद्यापासून सुरुवात जरी केली असली तरी, माझा अभिनय अधिक चांगला कसा होईल, यासाठी मी काहीकाळ ब्रेक घेतला होता. या सिनेमात काम करण्याआधी मी स्वतःमध्ये अनेक चांगले बदल घडवून आणले आहेत. शिवाय यादरम्यान मार्शल आर्ट्सचे शिक्षण घेऊन, स्वतःमधील कलाकाराला अधिक चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे 'ड्राय डे' सिनेमातील माझी भूमिका लोकांना आवडेल अशी मी अपेक्षा करतो' अशी भावना ऋत्विक व्यक्त करतो. 
 
ऋत्विकचे आई आणि वडील दोघेही अभिनयक्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्तिमत्व असल्यामुळे, त्याच्याकडून रसिकांच्या अधिक अपेक्षा आहे. अर्थात, याची जाणीव ऋत्विकला देखील आहे. आगामी 'ड्राय डे' सिनेमात त्याच्यासोबत मोनालिसा बागल हि अभिनेत्री झळकणार असून, या दोघांवर आधारित असलेले या सिनेमातील 'अशी कशी' हे प्रेमगीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे.  
 
या सिनेमाचे लेखन दिग्दर्शक संजय पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाटगे, चिन्मय कांबळी, आयली घिए हे तरुण कलाकार आणि अरुण नलावडे, जयराम नायर हे कलावंतदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.