के आसिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मोऱ्या’कथा, अभिनय, दिग्दर्शनासह अव्वल
साक्री तालुक्यातील पिंपळनेरचे भूमिपुत्र, सुप्रसिद्ध अभिनेता व मोऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक जितेंद्र बडेंं यांना नुकताच उत्तर प्रदेश येथे उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये नुकताच सहावा के आसिफ-चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 उत्साहात पार पडला आहे.
शहराचा रोज घाण होणारा चेहरा जीवावर उदार होऊन, कोणत्याही मुलभूत सोई-सुविधांविना आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ मोऱ्याची हृदयस्पर्शी कथा मोऱ्या या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळणाऱ्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती असून, ढाका येथील सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-(CIFF) सोबत, लव्ह & होप आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बार्सिलोनामध्ये निवडला गेला आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन कान्स महोत्सवात करण्यात आले होते, तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक-समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
भारतातील एका महान चित्रपट कलावंताच्या नावे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असल्याने हे पुरस्कार आमच्याकरिता विशेष महत्वाचे असल्याचे आणि मोऱ्याचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता जितेंद्र पुंडलिक बर्डे यांनी व्यक्त केले. धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर चे भूमिपुत्र जितेंद्र पुंडलिक बर्डे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल अस्सल खानदेशी भाषेत म्हणजे अहिराणी भाषेत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाचे गायक अवधूत गुप्ते,DOP-आकाश काकडे,एडिटर- रोहन पाटील, म्यूझिक- अमोघ इनामदार,साऊंड- विक्रांत पवार,कलाकार उमेश जगताप,संजय भदाने,कुणाल पुणेकर, निर्माते – तृप्ती कुलकर्णी,राजेश अहिवळे,सह निर्माता – मंदार मांडके,जितेंद्र बर्डे यांनी या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.