शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (15:03 IST)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि निर्माते पुन्हा एकत्र ! घेऊन येतायत ‘रावसाहेब’ - रहस्यमय टिझर प्रदर्शित

raosaheb
प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गोदावरी’नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’.या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे लिखित या चित्रपटाचे अक्षय बर्दापूरकर,संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसणारी तगडी स्टारकास्ट आणि टिझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून ‘रावसाहेब’बद्दलची उत्कंठा आताच ताणली गेली आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ‘’ 'रावसाहेब’च्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबतच खिळवूनही ठेवेल. प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा 'रावसाहेब'ला खऱ्या अर्थाने वेगळे करतो.
ग्राउंडब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही. तर ‘रावसाहेब’बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा निखिल महाजन सोबत काम करण्याची संधी मिळाली. निखिलसोबत काम करताना मी नेहमीच उत्सुक असतो. एकतर आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही दोघेही औरंगाबादचे आहोत. निखिलचे विषय हे नेहमीच चौकटीबाहेरचे असतात. त्या चित्रपटांमध्ये भावना असतात. हा सुद्धा एक वेगळा आणि संवेदनशील विषय आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’’