मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (18:23 IST)

SARI - प्रेमाच्या 'सरी'ची 'संमोहिनी'

sari marathi movie
प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या 'सरी' चित्रपटातील पहिलं 'संमोहिनी' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले आहे. आनंदी जोशी हिचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार अमितराज असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

'संमोहिनी' या प्रेमगीतामध्ये दिया रोहितच्या प्रेमात मोहित झाल्याचे दिसत असून मनाला भावणाऱ्या या गाण्याचे संगीतही भावपूर्ण आहे. अनेकांचा आयुष्यात कॉलेजपासून एकतर्फी प्रेमाची सुरूवात होते. तो लपाछुपीचा काळ खूप सुंदर असतो. 'संमोहिनी' या प्रेमगीतातून ते सोनेरी क्षण पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, "पहिल्यांदाच मी मराठी संगीतकार आणि गायकांसोबत काम करत असून मराठी शब्दांमध्ये एक वेगळीच मजा आहे. भावना खूप उत्तमरित्या व्यक्त करता येतात.  संगीतकार अमितराज यांचे नाव मी ऐकून होतो, त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव होता. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसाच या चित्रपटातील पहिल्या 'संमोहिनी' प्रेमगीतलासुद्धा मिळेल, अशी आशा करतो."

संगीतकार अमितराज म्हणतात, "'सरी' हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची आतुरता आहे. अशोका के. एस हे अप्रतिम दिग्दर्शक असून या चित्रपटातील गाण्यांना संगीत देताना मजा आली. सगळीच गाणी अप्रतिम आहेत. अशोकजींच्या बाबतीत एक कौतुकास्पद गोष्ट सांगायची म्हणजे, अशोकजी हे बंगळुरूला राहत असले तरी कित्येकदा गाण्यांसाठी ते बंगळुरूहून मुंबईला यायचे. कामाच्या प्रति इतके प्रेम असणाऱ्या टीमसोबत काम करायला मिळाले. अशोकजी हे संगीतप्रेमी आहेत. त्यांना गाण्यांची खूप आवड आहे. 'संमोहिनी' हे गाणं चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यात येत, दिया रोहितला बघते, दियाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गाणं मांडण्यात आलं आहे. तिच्या मनातील भावना गाण्याच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या आहेत. सातत्याने आमचा प्रयत्न होता की काहीतरी नवीन देऊयात. 'संमोहिनी' हे गाणं एका वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे."