1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (21:19 IST)

‘शाब्बास सूनबाई’ एका ध्येयवादी सूनेची गोष्ट; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील मालिका ही प्रेक्षकांसाठी विसाव्याची ठिकाणे असतात. त्यामुळेच त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळते. यामुळेच नवनवीन मालिका करायला निर्मात्यांना उत्साह येतो. मालिका म्हटल्या की सासू – सून यांची भांडण असा समज सर्वच मालिकांनी बदलला आहे. आजची स्त्री ही सोशिक जरी असली तरी ती बंधन, परंपरांचे जोखड तोडून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहणारी आहे. अशा वेगळ्या विषयाच्या मालिका रोज नव्याने दाखल होत आहेत. यातच आता प्रेक्षकांना अजून एका नवीन मालिकेची मेजवानी मिळणार आहे. प्रवाहाविरुद्ध आपला प्रवास सुरू ठेवणाऱ्या एका ध्येयवादी सुनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट घेऊन ‘शाब्बास सूनबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
 
मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात रोज नव्याने भर पडत आहे. काही दिवसांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेल्या मराठी वाहिन्यांमध्ये भर पडत आहे. मराठी मालिकांमध्ये देखील भर पडत आहे. सन मराठी वाहिनीवर ‘शाब्बास सूनबाई’ ही मालिका सुरू होत आहे. कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची ही कथा आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलं आहे. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सर्वोत्कृष्ट असावं. तिच्या वडिलांच्या स्वप्नाला आपलसं करत तिने नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत शैक्षणिक क्षेत्रातही अव्वल राहिली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor