शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 19 फेब्रुवारी 2017 (20:36 IST)

रॅपर श्रेयस गाणार 'आम्ही पुणेरी...'

आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणारे 'रॅप'सॉंग' लवकरच मराठमोळ्या रंगात रंगलेले दिसून येणार आहे. पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेल्या या रॅपसॉंगचे  मराठीकरण करण्याचे काम गायक श्रेयस जाधव याने केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बघतोस काय मुजरा कर;' या सिनेमाचे तरुण निर्माता असलेला श्रेयस एक चांगला रॅपर देखील आहे. मराठी अस्मिता आणि खास करून अस्सल पुणेकर असलेला श्रेयस लवकरच 'आम्ही पुणेरी...' हे रॅप गाताना दिसणार आहे. नुकत्याच या रॅपसॉंगचे सोशल मिडीयावर टीजर आणि पोस्टर लॉच करण्यात आले. पुणेरी बाणा आणि खास शैली असणाऱ्या पुणेकरांसाठी हा रॅप मोठी पर्वणी ठरणार असून, मुंबईकरांसाठी देखील हे गाणे विशेष ठरणार आहे. 
 
श्रेयसने यापूर्वी ऑनलाईन बिनलाईन' सिनेमातील 'ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये रॅप गायले होते. विशेष म्हणजे मराठी-हिंदी फ्युजन असलेल्या या गाण्याला आणि त्याच्या या रॅपला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला असल्याकारणामुळेच, एक संपूर्ण रॅप असलेलं गाणं 'पुणे‘रॅप'च्या माध्यमातून श्रेयस लोकांसमोर घेऊन येत आहे. या गाण्याचे प्रत्येक बोल तरुणाईला भुरळ पाडणारे आहेत. हे गाणं पुण्याबद्दल असून ह्यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच पण त्यासोबतच प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे.
 
हार्डकोअर पुणेकर असणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहे, तसेच हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत लाभले आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे हे पुणेरी रॅप मराठी संगीतक्षेत्राला  महत्वाचे वळण देणारे ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडेल, असा श्रेयसचा विश्वास आहे.शिवाय अजून काही रॅप गाणीदेखील या वर्षात काढणार असल्यामुळे हे नवीन वर्ष तरुणाईसाठी रॅपिंगची झिंग चढवणारे असेल, यात शंका नाही.