बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (14:39 IST)

‘गावठी’चे निर्माते सिवाकुमार यांची थक्क करणारी कहाणी

तामीळनाडूतील छोट्याशा खेड्यातून एम.ए. बी.एड. (अर्थशास्त्र) पदवी घेऊन सिवाकुमार रामचंद्रन नावाचा एक तरूण मुंबईत नशीब अजमावण्यासाठी दाखल झाला. नव्वदच्या दशकात ज्या गावात वीज नव्हती अशा तामिळनाडू राज्यातल्या खेड्यातील असमान्य बुद्धीमत्तेच्या या तरूणाचं अख्ख्या तालुक्याला कौतुक होते. शिक्षकी पेशाचे आकर्षण असलेल्या सिवाने मुंबईत पाय ठेवला खरा पण, त्याचं दिसणं, राहणीमान आणि हिंदी-इंग्रजीचा अभाव यामुळे जवळपास पंधरा ठिकाणी मुलाखती देउनही त्याला नोकरी मिळत नव्हती. केवळ प्रमाणपत्र आणि गावातील थोरामोठ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर नोकरी मिळवू पाहणाऱ्या सिवाला प्रचंड नैराश्य आलं. आता गावी परत गेलं तर आईवडील आणि गावकऱ्यांना काय सांगायचे? अशा विवंचनेत वाशीच्या मार्केट मध्ये हताशपणे बसलेल्या सिवाने पहिले पोटापाण्याचं पाहू, नंतर पुन्हा प्रयत्न करू, असा निर्धार केला. समोरच खूप गर्दी असलेले एक भांड्यांचे दुकान होते. मालक आणि नोकरांची ग्राहकांना हाताळताना तारांबळ होत होती. थोडी गर्दी पांगल्यावर सिवा त्या दुकानात शिरला आणि मालकाला नोकरीसाठी विचारले. योगायोगाने मालकही तामीळ होता. सिवाकडे पाहून मालकाने शिक्षणाविषयी विचारले. तेव्हा मोठ्या हुशारीने सिवाने उत्तर दिले, “दहावी नापास!”
 
खरे शिक्षण सांगितले असते तर कदाचित मालकाने बेभरवशा नोकर नको म्हणून नोकरी दिली नसती, असा विचार करून सिवा शिक्षणाच्या बाबतीत खोटं बोलला. पण, पोटापाण्याची सोय झाली. महिना अठराशे पगारावर एम.ए. बी.एड सिवाकुमार भांड्याच्या दुकानात नोकराचे काम करू लागला. आई-वडीलांची आठवण आणि आलेल्या परिस्थितीमुळे सिवा रोज रात्री दुकानात धाय मोलकून रडायचा. पण, हिम्मत हरला नव्हता. रोज वर्तमानपत्रातील जाहिराती पाहायचा. इंग्रजी संभाषणाची पुस्तके वाचायचा आणि अभ्यास करायचा. कारण इंग्रजी येण्याशिवाय पर्याय नव्हता. एके दिवशी तेव्हाची हत्चीसन मॅक्स म्हणजे आताची वोडाफोन या कंपनीत त्याला कागदपत्र स्कॅन करण्याची नोकरी मिळाली. भांड्यांच्या दुकान मालकाला त्याने भेटून हकीकत सांगितली. त्यावर मालकाने खोटं बोलल्याचे प्रामाणिकपणे मान्य केल्याने पाठीवर कौतुकाची थाप मारली. सिवा स्कॅनर ऑपरेटर म्हणून कामाला लागला. तिथे असंख्य लोक त्याचा संपर्क आले. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण कक्षात सिवाला बढती मिळाली. तिथे सिवाने आपल्या शिक्षणाचे आणि हिंदी-इंग्रजी संभाषणाचे कौशल्य पणाला लावले. पुढे सिवाकुमार एका मॅनपावर आउटसोर्स कंपनीचा मॅनेजर बनला. नोकरी सुखासुखी सुरू होती. डोंबिवलीत स्वत:चं घर घेतले. पण, शिक्षक होता न आल्याचे शल्य त्याला होते.
 
२६ जुलै २००५ च्या पावसाने अख्खी मुंबापूरी आणि आजुबाजूचे जिल्हे पाण्याखाली गेले. अनेक संसार, उद्योगधंदे वाहून गेले. एका पावसाने होत्याचं नव्हते केले होते. आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो. पण, त्याच २६ जूलैच्या महापूरानंतर सिवाचे नशीब पालटले. त्या महापूरात तुर्भे-नवी मुंबईतील एका डेटा रेकॉर्ड मॅनेजमेन्ट गोडाऊन मधील कागदपत्र पाण्याखाली गेली. सर्व कॉरपोरेट कंपन्यांचा हार्ड डेटा गेल्याने कंपन्या चिंतेत होत्या. त्या डेटा रेकॉर्ड मॅनेजमेन्ट कंपनीचा मॅनेजर सिवाला स्कॅनर ऑपरेटर असताना ओळखत होता, त्याने सिवाला बोलावून कागदपत्रांची अवस्था दाखवली. सिवाने सर्व कागदपत्रे स्कॅन करून देण्याची तयारी दाखवली. पण, त्यासाठी अनेक स्कॅनर्स आणि माणसं लागणार होती. कंपनी कडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे कामाची गती रोडावली आणि कंपनीला कॉर्पोरेट कंपन्यांकडून सतत फोन येत होते. कंपनीचा मॅनेजरने सिवाला गळ घातली आणि या सर्व कामाची पैश्यांच्या मोठ्या मोबदल्यासह पूर्ण जबाबदारी दिली. सिवाचा भांड्यांच्या दुकानापासून ते मॅनपावर सप्लाय कंपनी पर्यंत सर्वांशी संबंध चांगले होते. सिवाने एका रात्रीत नवी मुंबईत एक कार्यालय भाड्याने घेतले. स्कॅनर्स घेतले. तिथे दिडशे कामगारांना तीन शिफ्ट मध्ये कामाला लावले. आणि अपेक्षेपेक्षा कमी वेळेत काम व्यवस्थित पूर्ण केले. तिथे सिवाने खरी लढाई जिंकली होती. एका रात्रीत सिवा व्यावसायिक बनला. सिवाचा सिवाकुमार झाला. त्या सर्व कॉर्पोरेट कंपन्यांनी सिवाचे कौतूक केले. त्यातील काही कंपन्यांनी सिवाकुमार यांना मॅनपावर सप्लाय आणि डेटा डिजीटायजेशनचे कंत्राट दिले. आज सिवाची स्वत:ची मोनामी मॅनपावर सप्लाय एजन्सी आहे. संपूर्ण भारतभरात कॉरपोरेट कंपन्यांना स्वत:च्या पगारावर सिवाकुमार यांची कंपनी कर्मचारी पुरवठा करते.
 
या व्यवसायाच्या जोरावर सिवाकुमार यांनी वाशीत छोटेखानी हॉटेल सुरू केले. इतकेच नाही तर खारघर येथे अण्णा किराणा नावाने एक सुपरमार्केटही सुरू केले आहे. आणि आता सिवाकुमार रामचंद्रन यांनी आयुष्याच्या अनुभवावर एक कथा लिहून त्यावर गावठी या चित्रपटाची निर्मिती केलीय. अभिनेता किशोर कदम, नागेश भोसले, नंदकिशोर चौगुले, कुशल बद्रीके, वंदना वाकनीस, अंकूर वाढवे, संदीप गायकवाड सारख्या मातब्बर कलाकारांना घेऊन आणि रेमो डिसोडा यांचे सहायक आनंदकुमार उर्फ ॲण्डी यांना दिग्दर्शनाची जबाबदारी देऊन गावठी हा सिनेमा बनवला आहे.. सुपरस्टार रजनीकांत यांचे सुपरफॅन असणाऱ्या सिवाकुमार यांनी चित्रपट पूर्णपणे मनोरंजक करण्यासाठी कोणतिही तडजोड केलेली नाही. आपल्यासारखी अवस्था कुणाची होऊ नये, प्रत्येक ग्रामीण व्यक्तीचा आत्मविश्वास वाढावा, याकरीता चित्रपट सारखे प्रभावी माध्यम स्विकारले आहे. त्यातही ते यशस्वी होतील याची त्यांना पूर्ण खात्री आहे.