गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (17:16 IST)

'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे प्रदर्शित

लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.
 
लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल निर्मित आणि प्रस्तुत 'पिप्सी' सिनेमातील या सप्तरंगी गाण्याचे लिखाण ओमकार कुलकर्णी यांचे आहे. या गाण्याची पडद्यामागील गोष्ट म्हणजे, हे गाणे बनविण्याआधीच त्याचे शुटींग झाले होते. साधारणत: गाणे बनविल्यानंतर त्याचे चित्रीकरण केले जाते, मात्र 'ता ना पि हि नि पा जा' या गाण्याबाबत अगदी उलट घडले. या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी यांचा प्रभावशाली अभिनय आणि सिनेमातील त्यांचा मूड टिपत, संगीतदिग्दर्शक देबार्पितो यांनी ते सुरेख रचले.
 
  लहान मुलांच्या कल्पनाशक्तीची रंगीत सफर घडवून आणणाऱ्या या गाण्याला विदित मिथिलेश पाटणकर आणि अनाहिता अमेय जोशी या बालगायकांचा गोड आवाज लाभला आहे. लहानग्यांचा गोंडस स्वर या गाण्याला लाभला असल्यामुळे, 'ता ना पि हि नि पा जा' हे गाणे मनाला सुखावते.