बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2019 (12:50 IST)

उमेश - प्रिया सात वर्षांनंतर एकत्र !

सात वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मराठी सिनेसृष्टीतील 'क्युट कपल' अर्थात प्रिया बापट आणि उमेश कामत आता 'आणि काय हवं' या वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही या दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून येते असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या वेबसिरीजमधूनही ते प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील. या वेबसिरीजमध्ये प्रिया 'जुई'ची तर उमेश 'साकेत'ची व्यक्तिरेखा साकारत आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असतानाच ते दर दिवशी एकमेकांच्या नव्यानं प्रेमात पडत आहेत.
 
याविषयी उमेश म्हणतो, ''सात वर्षांपूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं. एक मालिका, एक व्यावसायिक नाटक आणि त्यानंतर 'टाईम प्लीज' हा चित्रपट. अशा विविध माध्यमांमधून प्रिया आणि मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. मात्र त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र काम केलं नाही. परंतु कालांतरानं आम्हालाही याची जाणीव झाली, की आपण एकत्र काम केलं पाहिजे. काही प्रोजेक्ट्सबाबत आम्हाला विचारणाही करण्यात आली. मात्र इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र पडद्यावर झळकण्यासाठी आम्हाला ते विषय तितकेसे भावले नाहीत. याच दरम्यान अनिश जोग आणि वरुण नार्वेकर यांनी या वेबसिरीजबद्दल आम्हाला विचारणा केली. त्यांची संकल्पना ऐकल्यानंतर, त्या क्षणी मनात आले, की इतकी वर्षं थांबल्याचा निश्चितच फायदा झाला.''
 
लग्नानंतर घेतलेलं पाहिलं घर, पहिली गाडी, एकत्र साजरा केलेला पहिला सण अशा लग्नानंतर एकत्र केलेल्या अनेक 'पहिल्या' गोष्टींचं अप्रूप काही औरच! आणि या वेबसिरीजमध्ये हेच लग्नानंतरचे छोटे छोटे सुखद क्षण दाखवण्यात आले आहेत. ही वेबसिरीज बघताना नकळत तुम्हीही तुमच्या आयुष्यातील या अमूल्य आठवणींना उजाळा द्याल. 'मुरांबा' फेम वरूण नावेकर दिग्दर्शित, अनिश जोग, रणजित गुगळे निर्मित 'आणि काय हवं' ही सहा भागांची वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेयरवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.