बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (14:43 IST)

‘विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार

'बालक पालक', 'यलो', 'डोक्याला शॉट' सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी 'अ विवा इनएन प्रॉडक्शन' अंतर्गत मराठी सिनेसृष्टीला आशयपूर्ण, भावनिक आणि त्यासोबतच मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. यातील 'यलो' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून 'बालक पालक', 'डोक्याला शॉट' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या यशानंतर आता उत्तुंग ठाकूर यांचा 'विकून टाक'  हा धमाल, विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तुंगने चित्रपट निर्मितीचे धडे परदेशातून घेतले असून तो आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगल्या विषयांवर चित्रपटाची निर्मिती करत आहे.  
 
  'विकून टाक' चित्रपटाबद्दल उत्तुंग सांगतो, “सुरुवातीला ‘विकून टाक’ चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे याने मला ऐकवली होती. मला कथेचा विषय आवडला परंतु ही कथा थोडी 'ब्लॅक कॉमेडी'कडे झुकणारी होती. कथा ऐकल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मला समीर पाटील यांचे नाव लक्षात आले. कारण आम्हा दोघांनाही एकत्र काम करायचे होते. त्यानंतर मी आणि समीर यांनी एकत्र भेटून या चित्रपटाची कथा ऐकली आणि सिद्धेश्वरच्या परवानगीने या कथेत थोडा बदल केला असून थोड्या विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट जरी विनोदी रुपात असला तरीही हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करतो, असे ही उत्तुंग सांगतो”. उत्तुंगच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे बॉलीवूडसोबत असलेले कनेक्शन. त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधल्या दिग्गज कलाकारांचा सहभाग हा असतो. विकून टाक या चित्रपटामध्ये सुद्धा बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम करत आहे.  दुसरी महत्तवाची गोष्ट म्हणजे उत्तुंग चित्रपटासाठी फक्त आर्थिक सहभाग न दाखवता चित्रपटाच्या सगळ्या प्रक्रियेकडे वैयक्तिक लक्ष देतो.
 
समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या चित्रपटामध्ये शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर 'अ विवा इनएन प्रॉडक्शन' अंतर्गत उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी या चित्रपटची निर्मिती केली असून चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे यांची आहे. तर पटकथा चारुदत्त भागवत आणि समीर पाटील यांनी लिहिली आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.