1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (08:14 IST)

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली.
अनेक हिंदी आणि मराठी मालिकेत भूमिका केल्या
माधवी गोगटे यांनी मराठी चित्रपटांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटके फार गाजली. माधवी यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही ‘घनचक्कर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.