शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2015 (16:21 IST)

जल्लोषात पार पडला 'बंध नायलॉनचे'चा संगीतमय सोहळा !

टेक्नॉलोजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा 'बंध नायलॉनचे' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २९ जानेवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नात्यांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या या सिनेमाचा अंधेरी येथील 'द क्लब' मध्ये नुकताच धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा पार पडला. लॅविश वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात सिनेमातील स्टारकास्ट सोबतच सिनेवर्तुळातील अनेक स्टार चेह-यांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात 'बंध नायलॉनचे' या सिनेमातील गायक अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे आणि आदित्य पाटेकर यांनी कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. दिग्दर्शक जतिन वागळे, लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित या त्रिकुटाने स्वतः सुत्रासंचानाची धुरा सांभाळत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सिनेमाचे निर्माते सुनिल चंद्रिका नायर यांच्या हस्ते 'बंध नायलॉनचे' या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सिनेमाच्या स्टारकास्टने देखील सिनेमातील भूमिकेविषयी आपले मत मांडले. 
या सिनेमात महत्वाची भूमिका असणारे अभिनेता महेश मांजरेकर यांनी भूमिकेविषयीसांगितले, 'या सिनेमाचा विषय मला खूप आवडला तो एका नावाजलेल्या एकांकिकेवर आधारित आहे. तसच जतिनने सिनेमाचे अप्रतिम दिग्दर्शन केले असून त्यात माझी एक वेगळी भूमिका आहे. सिनेमात मी पहिल्यांदा डबल रोल केलाय आणि स्टोरीमध्ये एक मस्त ट्विस्ट पण आहे, त्या ट्विस्टचा मी एक महत्वाचा भाग आहे याचा मला आनंद वाटतो. तसेच अभिनेत्री मेधा मांजरेकर म्हणाल्या, 'सिनेमाच्या निमित्ताने मला प्रथमच महेश सोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडेल अशी मी आशा करते'. या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री श्रुती मराठे हिने देखील आपल्या भूमिके माहिती दिली. मी या सिनेमात सून, बायको आणि आई अशी तिहेरी भूमिकेत आहे ज्या माझ्यासाठी खूप चॅलेन्जिंग होत्या.  दिग्दर्शकांनी माझ्याकडून हि भूमिका अतिशय चांगल्यारीत्या करवून घेतली. 'महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या दोन दिग्गज कलाकारांसोबत मला करण्याची संधी मिळाली. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून प्रत्येक घराघरात जे घडते तेच या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सुबोध यांनी सांगितले. मराठी सिनेसृष्टीतील एवरग्रीन व्यक्तिमत्व अभिनेता सुनील बर्वे यांनीही सिनेमाविषयी आपले मत मांडत दिग्दर्शक जतिन सोबत पुन्हा काम करायला आवडेल अशी इच्छा बोलून दाखवली. तसेच या सिनेमातून अवधूत, आदर्श, आदित्य, आणि मी (अमितराज) असा 'अ'चा सुर जुळून आला असून, त्याद्वारे प्रेक्षकांना गाण्यांचे विविध झोन ऐकायला मिळणार असल्याचे अमितराज यांनी सांगितले. लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित लिखित 'बंध नायलॉनचे' या एकांकिकेवर आधारित हा सिनेमा आहे. संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी संगीतबद्ध केलेली 'कुणीतरी', 'एक तारा' आणि 'उठे कल्लोळ कल्लोळ' ही गाणी लोकांना खूप आवडतील यात शंका नाही. गीतकार मंदार चोळकर आणि सचिन पाठक या दोघांनी मिळून सिनेमाची गीते लिहिली आहेत. झिरो हिट्स बॅनरखाली 'बंध नायलॉनचे' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सीजी नायर आणि सुनील चंद्रिका नायर हे सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, संजय नार्वेकर, सुनील बर्वे असे प्रसिद्ध चेहरे असून प्रांजल परब ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि संगीत लाभलेला हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.