रोहित शर्माच्या मार्यामुळे भारताने बांग्लादेशचा पराभव केला
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि अचूक मा-यामुळे आशिया करंडक स्पर्धेत भारताने आज (बुधवार) विजयी सलामी दिली. भारताच्या १६७ धावांच्या आव्हानासमोर बांगलादेश संघाने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १२१ धावा केल्या. बांगलादेशकडून शबीर रेहमानने सर्वाधिक ४४ धावा केल्या.
रोहित व हार्दिक पांडया यांच्या २७ चेंडूंतील ६१ धावांच्या भागीदारीमुळे १६६ धावांचा पल्ला गाठल्यावर भारताने बांगलादेशला १२१ वर रोखण्याची कामगिरीही चोख पार पाडली. फलंदाजी सोपी नसलेल्या खेळपट्टीवर हे लक्ष्य कठीणच होते. भारतीयांनी बांगलादेशला सुरवातीपासून दणके दिले. हॅटटिड्ढकची संधी असलेल्या नेहराने तर डावाच्या मध्यावर बांगलादेशच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या.
तत्पूर्वी पुण्यात काही दिवसांपूर्वी भारतीय संघ हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीवर गारद झाला होता. बांगलादेशने आजच्या लढतीसाठी खेळपट्टीवर चांगलेच हिरवे गवत ठेवले आणि त्यात नाणेफेकही जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताचे तीन फलंदाजही लवकर बाद केले; परंतु फॉर्मात असलेल्या रोहितने तशा प्रतिकूल परिस्थितीत आणि वातावरणात कशी फलंदाजी करायची, याचा वस्तुपाठ सादर केला.
५० धावांच्या आतच भारताचे तिघे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. रोहित शर्माने एका बाजुने प्रयत्न करत डाव सावरला. त्याचे शतक अवघ्या १७ धावांनी हुकले. सलामीवीर शिखर धवन अवघ्या दोन धावांवर बाद झाला. हुसेनने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर रोहित आणि विराट डाव सावरतील असे वाटत असतानाच विराट कोहलीही अवघ्या ८ धावांवर बाद झाला. त्याची विकेट विकेट कर्णधार मशरफी मुर्तझाने घेतली. तर महमदुल्लाहने १३ धावांवर खेळत असताना रैनाचा त्रिफळा उडवला. हे प्रमुख मोहरे लवकर बाद करण्यात बांगलादेशला यश आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनानंतर प्रथमच दीर्घ खेळी करण्याची संधी मिळालेला युवराजसिंगही फार कमाल करू शकला नाही. तो १५ धावा करून बाद झाला.
मात्र, या खेळीमध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करण्याचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. यावेळी कर्णधार धोनीने हार्दिक पांड्याला फलंदाजीत बढती दिली. पांड्यानेही हा निर्णय योग्य ठरविला. अखेरच्या पाच षटकांत भारताने ६९ धावा चोपल्या. शेवटच्या षटकात धावगती उंचावण्याच्या प्रयत्नांत रोहित शर्मा बाद झाला. त्याने ५५ चेंडूंत ८३ धावा केल्या. हार्दिक पांड्या १८ चेंडूंत ३१ धावा करुन बाद झाला.