शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 6 ऑगस्ट 2023 (10:47 IST)

वर्ल्डकपला मोजून 100 दिवस उरलेत, पण भारतीय संघात अजूनही फेरबदलच सुरू आहेत

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने भारतीय क्रिकेट संघाविषयी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय.
 
त्याने म्हटलंय की, भारतीय क्रिकेटमध्ये इतके प्रतिभावंत खेळाडू आहेत की, बीसीसीआय एकावेळेस एक, दोन नव्हे तर तीन-तीन संघ मैदानात उतरवू शकते.
 
जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रायन लाराच्या तोंडून असं कौतुक होणं भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. वेस्ट इंडिज मालिकेत भारताची कामगिरी संमिश्र होती.
 
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 असा विजय आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय निश्चितच चांगला आहे. पण यामुळे भारतीय संघ इतर कोणत्याही संघाला हरवू शकतो असा विश्वास निर्माण होत नाही.
 
ब्रायन लाराच्या विधानाचं बारकाईने विश्लेषण केलं तर प्रश्न उपस्थित होतो की, भारतीय संघाकडे जर इतके प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत तर संघ अजून स्थिरस्थावर का होत नाहीये?
 
आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे खरोखरच बीसीसीआय एकावेळी तीन संघ उभे करू शकते का?
 
कदाचित टी 20 मध्ये हे शक्य आहे. पण एकदिवसीय सामन्यासाठी हे अवघड आहे. आणि कसोटी सामन्यात तर वरिष्ठ खेळाडूंचे पर्याय देखील मिळत नाहीयेत.
 
नुकतीच कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरूवात झाली आहे आणि एकदिवसीय विश्वचषक सामने तर अगदी तोंडावर आले आहेत.
 
संघाच्या चेहऱ्यावरच संशय
दोन महिन्यांनंतर भारतात आयसीसीचे एकदिवसीय विश्वचषक सामने पार पडणार आहेत. 2011 मध्ये भारतीय संघ घरच्या मैदानावर विजयी झाला होता.
 
यावेळीही भारतीय संघ आवडत्या संघांच्या यादीत नंबर एकवर आहे. मात्र भारतीय संघाची रुपरेषा कशी असेल याबाबत साशंकता आहे.
 
याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे, मागील काही काळापासून भारतीय संघात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे संघ मजबूतपणे स्थिरावू शकलेला नाही.
 
किमान गेल्या वर्षभरापासून भारतीय निवड समितीने एकदिवसीय विश्वचषकाकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवं होतं.
 
गेल्या दोन विश्वचषकांमध्ये भारतीय संघ अंतिम फेरीतही पोहोचू शकलेला नाही. आणि यामुळे भारतीय संघ जगातील अव्वल संघ असल्याचा त्यांचा दावा फेटाळून लावला जातो.
 
क्रिकेटमध्ये फक्त सहा सुपरपॉवर संघ आहेत. आणि यातही तुम्ही जर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर असाल तर भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
 
या गोष्टी मार्गी लागतील अशी आशा आहे. निवड समितीने कंबर कसली असेल तरी त्यांचं पिक आणि ड्रॉप धोरण काम करत नाहीये.
 
एकदिवसीय संघात तिलक वर्माला स्थान का नाही?
 
उदाहरण म्हणून बघायचं झालंच तर मागील टी 20 सामन्यात तिलक वर्माची झालेली निवड पाहा.
 
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची संघात निवड झाली आणि त्याने चांगलं प्रदर्शन देखील केलं. पण भारतीय एकदिवसीय संघाला नेमकी कशाची गरज आहे?
 
अनेक तज्ज्ञांच्या मते, संघात डावखुऱ्या फलंदाजांची जास्त गरज आहे. 2011 च्या विश्वविजेत्या संघात गंभीर, युवराज आणि रैनाने विरोधी गोलंदाजांना स्थिर होऊ दिलं नव्हतं.
 
तिलक वर्माची केवळ परीक्षाच घ्यायची होती तर त्याला एकदिवसीय सामन्यात संधी मिळायला हवी होती.
 
आणि गेल्या सहा महिन्यांतील भारतीय संघांवर नजर टाकली तर डावखुऱ्या फलंदाजांचा दुष्काळ आहे.
 
यशस्वी जैस्वालची कसोटीतच निवड झाली होती आणि दुसरा उमेदवार शिवम दुबे देखील आयर्लंडमध्ये फक्त टी20 संघासाठी खेळणार आहे.
 
सततचे बदल, धोक्याची घंटा
या वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की टी-20 असो वा एकदिवसीय सामने, भारतीय संघात सातत्याने बदल होत आहेत.
 
जर आकडेवारीवर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की गेल्या 6-7 महिन्यांत भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात एकूण नऊ फलंदाजांना आजमावून पाहिलंय.
 
यात असे अनेक खेळाडू होते ज्यांना फक्त एक किंवा दोन सामने खेळायला मिळाले. तर काही जण केवळ संघाचा भाग होते. यात कधी पृथ्वी शॉ तर कधी ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार होते.
 
निवडकर्त्यांनी या खेळाडूंवर पूर्ण विश्वास ठेवलाच नाही. आणि मिळालेल्या एखाद्या सामन्यात खेळाडूंना स्वतःला सिद्ध करता आलं नाही.
 
यावर्षी कोणा-कोणाची निवड झाली होती
जानेवारी, टी 20 मालिका, भारत विरुद्ध न्यूझीलंड
 
फलंदाज - शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, सूर्य कुमार यादव, पृथ्वी शॉ
यष्टिरक्षक - इशान किशन, जितेश शर्मा
अष्टपैलू खेळाडू (ऑल राऊंडर) – हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज - अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, उमरान मलिक, शिवम मावी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
जानेवारी, न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका
 
फलंदाज - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार
यष्टिरक्षक - ईशान किशन, श्रीकर भरत
अष्टपैलू खेळाडू – हार्दिक पांड्या, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज - मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
 
फेब्रुवारी-मार्च, ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका
 
फलंदाज - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर
यष्टिरक्षक - ईशान किशन, के एल राहुल
अष्टपैलू खेळाडू – हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल
गोलंदाज - मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट
जुलै, वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका
 
फलंदाज - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, ऋतुराज गायकवाड
यष्टिरक्षक - ईशान किशन, संजू सॅमसन
अष्टपैलू खेळाडू – हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
गोलंदाज - मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट
ऑगस्ट, वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिका
 
फलंदाज - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्य कुमार यादव
यष्टिरक्षक - ईशान किशन, संजू सॅमसन
अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, तिलक वर्मा
गोलंदाज - अर्शदीप सिंग, आवेश खान, उमरान मलिक, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई
ऑगस्ट, आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका
 
फलंदाज – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग
यष्टिरक्षक - संजू सॅमसन, जितेश शर्मा
अष्टपैलू - शिवम दुबे, तिलक वर्मा, शहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज - जसदीप बुमराह, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा
सलामीवीरांचा भडीमार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीरांची भूमिका महत्त्वाची असते. पण संघाचे सलामीचे 2 फलंदाज कोण आहेत हे माहीत असणं आवश्यक असतं.
 
भारतीय संघाकडे अर्धा डझन पर्याय होते आणि यातल्या प्रत्येकाला संधी देण्यात आली होती.
 
विश्वचषकाच्या दोन महिने आधीच संघाकडे अर्धा डझन सलामीवीर आहेत. आणि तरीही अजून नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
यासाठी रोहित, गिल, इशान, सॅमसन, गायकवाड आणि शॉ यांना आजमावून देखील पाहण्यात आलं.
 
यात रोहित शर्मा तर निश्चित आहे. पण या पाच जणांपैकी त्याचा जोडीदार नेमका कोण असेल हे सांगता येणार नाही.
 
बुमराह समोरील अडचणी
निवडकर्त्यांकडून बुमराहच्या बाबतीतही चुका होताना दिसत आहेत.
 
हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला होता की, "आपण विराट कोहलीची नेहमीच स्तुती करत असतो पण जसप्रीत बुमराह गोलंदाजी मधला कोहली आहे. आताच्या घडीला गोलंदाजीत त्याच्यापेक्षा मोठं नाव दुसऱ्या कोणाचंच नाही."
 
दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहबाबत तज्ञांना वाटतं की, त्याला आता प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळता येणार नाही, त्याने एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
 
आणि नंतर मग कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण भारतीय कसोटी सामन्यात 20 विकेट घेण्याची क्षमता केवळ बुमराह मध्येच आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला देखील वाटतं की, बुमराहला पुढील दुखापती टाळायच्या असतील तर त्याने एक फॉरमॅट निवडायला हवा. त्याने त्याच्या कामाचं व्यवस्थापन करायला हवं.
 
पण याच्या अगदी उलटं घडतंय. बुमराह फक्त टी-20 मध्येच पुनरागमन करतोय असं नाही तर त्याला कर्णधार म्हणून मैदानात उतरवलं जातंय.
 
त्यामुळे हे कामाच्या व्यवस्थापनाचं अजिबात चांगलं उदाहरण नाहीये.
 
जर आयर्लंडमध्ये त्याला पुन्हा काही दुखापत झाली तर मग एकदिवसीय विश्वचषक खेळणं शक्यच नाही.
 
तसं घडायलाच नको, पण जर तसं घडलंच तर याला जबाबदार कोण?
 
गोलंदाजी आणि यष्टीरक्षण कोण करणार?
तसं तर सलामीवीरांप्रमाणेच भारतीय गोलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्येही अनेक बदल दिसून आले आहेत. काही काळापूर्वी एक्स्प्रेस पेस गोलंदाजी करणारा शिवम मावी अचानक गायब झाला आहे.
 
बुमराहप्रमाणेच मोहम्मद शमीलाही सातत्याने दुखापती होत असतात. उमेश यादवची कारकीर्द घसरत चालली आहे तर अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी आयपीएलच्या पलीकडे जाऊन आपल्या गोलंदाजीत परिपक्वता आणलेली नाही.
 
अशा स्थितीत आवेश खानने चांगली कामगिरी केलेली नसताना देखील त्याला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलं आहे.
 
दुसरीकडे, यष्टिरक्षकांवर नजर टाकली तर या काळात ईशान किशन, के एल राहुल, संजू सॅमसन, श्रीकर भारत आणि जितेश शर्मा यांना संघात स्थान मिळालं आहे.
 
पण यातल्या केवळ एकाचीच निवड होणार. ज्या खेळाडूंना निवडकर्त्यांनी सतत संधी दिली होती, तेच खेळाडू यासाठी तयार दिसत आहेत.
 
यष्टिरक्षकांमध्ये ईशान किशन आणि गोलंदाजांमध्ये मुकेश कुमार यांना नेहमीच संधी मिळाली आहे. शिवाय या दोघांनीही चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलंय. त्यामुळे निदान ईशान किशनला संघात निश्चित स्थान असेल असं वाटतंय.
वरिष्ठ खेळाडूंची जागा कोण घेणार?
आता पुन्हा एकदा ब्रायन लाराच्या विधानाकडे येऊ. भारत एकाचवेळी तीन टी- 20 संघ मैदानात उतरवू शकतो, पण कसोटीत प्रतिभेची कमतरता स्पष्टपणे दिसून येते. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ बदलाच्या टप्प्यातून जात आहे.
 
2011-12 मध्ये अशीच वेळ संघावर आली होती.
 
त्या दरम्यान तेंडुलकर, कुंबळे, द्रविड, लक्ष्मण, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग यांसारखे दिग्गज खेळाडू क्रिकेट मधून निवृत्ती घेत होते. आणि भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया कडून 4-0 ने मालिका गमावत होता.
 
याच काळात संघात कोहली, पुजारा, रहाणे, अश्विन, जडेजा या खेळाडूंनी आपली जागा पक्की केली आणि लवकरच भारतीय संघ विजयाच्या मार्गावर परतला.
 
पण सध्याच्या घडीला संघात नवा कोहली किंवा अश्विन आहे का? बुमराह आणि शमीची जागा घ्यायला कोण आहे? द्रविड आणि पुजारासारखे अभेद्य फलंदाज कोण आहेत? अशा प्रश्नांवर बीसीसीआय मौन बाळगून आहे.
 
पण या प्रश्नावर तोडगा काढायचा असेल तर बीसीसीआयला आधी हे मान्य करावं लागेल की त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर आहे. तरच त्यावर तोडगा निघू शकेल.
 



Published By- Priya Dixit