क्रिकेटर युवराज सिंगला अटक आणि जामीन
क्रिकेटर युवराज सिंग याला रविवारी (17 ऑक्टोबर) हरियाणा पोलिसांनी जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली होती. काही वेळातच युवराजला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
हे प्रकरण 2020 चे असून युवराज सिंगने दलित समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होता. रजत कलसन यांनी याविरोधात पोलीस स्टेशला गुन्हा नोंदवला होता.
रोहित शर्मासोबत केलेल्या एका लाईव्ह चॅट दरम्यान युवराज सिंगने फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलबाबत जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचं समोर आलं होतं. यानंतर युवराज सिंगला नेटकऱ्यांनी ट्रोल करत त्याने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर युवराज सिंगने याप्रकरणी समाज माध्यमांमधून माफी मागितली.
रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी लाईव्ह चॅटमध्ये क्रिकेट आणि इतर अनेक गोष्टींबाबत गप्पा मारल्या. यातच भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप आहे. वाल्मिकी समाजाविषयी ही टिप्पणी करण्यात आली होती.