शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 22 मार्च 2018 (15:02 IST)

महिलांच्या आयपीएलसाठी ही योग्य वेळ नाही : मिताली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर महिलांसाठीही लीग सुरू करावी, या तर्कहीन चर्चांना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने पूर्णविराम दिला आहे. महिला क्रिकेटपटूंची दुसरी फळीच तयार नसल्याने आता ही लीग खेळवण्यात काहीच अर्थ राहणार नाही, असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले आणि ही फळी तयार होण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे तिने सांगितले.
 
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, अजूनही आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडू यांच्यात बराच फरक असल्याचे मितालीला वाटते. 'आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळण्यास योग्य असलेल्या खेळाडूंची फळी निर्माण होण्याची आवश्यकता आहे. भारत 'अ' संघाकडेही सक्षम खेळाडूंची फळी नाही. त्यामुळे जेव्हा अनेक सक्षम खेळाडूंची फळी आपल्याकडे तयार होईल, तेव्हा महिलांच्या आयपीएल लीगचा विचार करणे योग्य ठरेल. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूंमध्ये बरेच अंतर आहे आणि अशापरिस्थितीत आयपीएलसारखी लीग खेळवणे महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी घातक ठरेल,' असे स्पष्ट मत मितालीने व्यक्त केले.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय महिला संघ तिरंगी मालिकेत चांगल्या कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने भारत 'अ' संघाविरुद्ध सराव सामन्यात विजय मिळवले. 'भारत अ' ही संकल्पना आम्ही नुकतीच राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दुसरी फळी तयार होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. या संघात गुणवत्ता असलेले युवा खेळाडू आहेत, परंतु त्यांना पुरेशी संधी मिळायला हवी. असे मिताली म्हणाली.