मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (15:02 IST)

आयसीसी टी-20 क्रमवारी विराट दहाव्या स्थानी घसरला

भारताचा कर्णधार विराट कोहली (673 गुण) आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या नवीन टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फलंदाजांच्या सुचीत दहाव्या स्थानी घसरला आहे. मात्र, त्याचे साथीदार लोकेश राहुल आणि रोहित शर्मा अनुक्रमे दुसर्‍या व अकराव्या स्थानी कायम आहेत. कोहलीने न्यूझीलंडविरुध्दच्या पाच सामन्यंच्या टी-20 मालिकेत चार डावांमध्ये 105 धावा केल्या होत्या हे विशेष. 
 
दुसरीकडे दक्षिण आाफ्रिकेविरुध्द तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 ने मालिका जिंकली. त्यामध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने 136 धावा करणार्‍या कर्णधार इयान मॉर्गनने एकूण 687 गुणांसह नववे स्थान काबीज केले आहे. दुखापतीतून सावरत असलेला रोहित शर्मा फलंदाजीच्या क्रमवारीत 662 गुणांसह अकराव्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम या क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. त्याचे 879 गुण आहेत. राहुल 823 गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे. 
 
फलंदाजीच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकने 10 गुणांची भर घालत 16 व्या स्थानी तर त्याचा सलामीचा जोडीदार टेम्बा बावुमा 127 व्या स्थानावरून मोठी झेप घेत 52 वे स्थान काबीज केले आहे. बावुमाने तीन डावांमध्ये 153.75 च्या सरासरीने 123 धावा केल्या आहेत. 
 
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन जॅक्सनसह संयुक्तपणे बाराव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू तवरेज शम्सीने मोठी झेप घेत अव्वल दहामध्ये स्थान मिळविले आहे. तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिद दक्षिण आफ्रिकेचा एंडिले फेहलु्क्यायोला मागे टाकत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. मालिकेत 5 गडी बाद करणार्‍या आणि दुसर सामन्यात निर्णायक अंतिम षटकात इंग्लंडला दोन धावांनी विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा टॉम कुरेन 28 व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत राशीद खान आणि मोहम्मद नबी अव्वलस्थानी आहेत.