शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (07:21 IST)

विश्वचषक : 17 धावांमध्ये निम्मा संघ बाद, मग कपिल देव मैदानात उतरले आणि इतिहास घडवला

world cup 1983
1983 च्या विश्वचषकापर्यंत सर्व सामने 60 षटकांचे असायचे.
प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजीसाठी जास्तीत जास्त 12 षटकं दिली जायची. तेव्हा पांढऱ्या चेंडूचा वापर सुरू झाला नव्हता.
 
चेंडू लाल रंगाचे असायचे आणि संपूर्ण डावासाठी एक चेंडू वापरला जायचा. मैदानावर कुठलंही अंतर्गत वर्तुळ नसायचं, ना फिल्ड प्लेसिंगसारखा काही प्रकार होता.
 
सर्व खेळाडू पांढरे कपडे घालायचे आणि कसोटी सामन्याप्रमाणे दुपारच्या जेवणाची आणि चहाची वेळ ठरलेली असायची.
 
तोपर्यंत क्रिकेटप्रेमींनी डीआरएसचं नावही ऐकलं नव्हतं.
 
1983 च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यावेळी असं वाटलं की, दोन महिन्यांपूर्वी संघाने बर्बिसमध्ये वेस्ट इंडिजवर जो काही विजय मिळवला होता, तो असाच मिळवला नव्हता.
 
याआधी कोणत्याही संघाने विश्वचषकाच्या सामन्यांत वेस्ट इंडिजला हरवलं नव्हतं. भारताने निर्धारित 60 षटकांत 8 गडी गमावून 262 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 228 धावांत गारद झाला होता.
झिम्बाब्वे विरुद्धचा पुढचा सामना जिंकण्यासाठी भारताला थोडा संघर्ष करावा लागला, पण हा सामनाही पाच गडी राखून जिंकण्यात त्यांना यश मिळालं.
 
पण पुढच्या दोन सामन्यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून मोठ्या फरकाने हरला.
 
कपिल देव यांचा संघ झिम्बाब्वे विरुद्धचा पाचवा सामना खेळण्यासाठी केंटमधील टनब्रिज वेल्सला पोहोचला. यावेळी संघ जिंकण्यासाठी कमी पण त्यांची धावांची गती सुधारण्याचा जास्त विचार करत होता.
 
कपिल देव त्यांच्या 'स्ट्रेट फ्रॉम द हार्ट' या आत्मचरित्रात लिहितात, "ऑस्ट्रेलियन संघ गुणांमध्ये आमच्या बरोबरी आला होता आणि त्यांची धावगती आमच्यापेक्षा चांगली होती. त्यामुळे धावगती सुधारण्यावर आमचा संपूर्ण भर होता. आम्ही प्रथम फलंदाजी करावी आणि 300 पेक्षा जास्त धावांचा डोंगर रचावा ही तेव्हाची गरज होती.
 
"खेळपट्टीत खूप ओलावा होता आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेणं अडचणींना आमंत्रण दिल्यासारखं आहे हे माझ्या अजिबात लक्षात आलं नाही. फलंदाजी शिवाय अन्य पर्यायाचा मी गांभीर्याने विचारच केला नाही. याचा परिणाम असा झाला की आमचे दोन्ही सलामीवीर जास्त धावा न करता पॅव्हेलियनमध्ये परतले."
 
17 धावांमध्ये निम्मा संघ बाद झाला होता
सुरुवातीला गावस्कर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाले.
 
आता सर्वांच्या आशा मोहिंदर अमरनाथवर लागल्या होत्या. पण तेही पाचव्या षटकात झेलबाद झाले. आता धावसंख्या 6 धावांत 2 विकेट्स अशी होती.
 
संदीप पाटील फलंदाजीला आले तेव्हा मैदानावर शांतता पसरली होती. दरम्यान, डीप मिडऑफमध्ये श्रीकांतने सोपा झेल दिला.
 
काही चेंडूंनंतर संदीप पाटील यांनाही यष्टिरक्षकाने झेलबाद केले.
 
संदीप पाटील त्यांच्या 'सँडी स्टॉर्म' या आत्मचरित्रात लिहितात, "कपिलला वाटलं की, त्याची बारी उशिरा येईल म्हणून तो आंघोळीला गेला. पण आमचे खेळाडू इतक्या लवकर बाद झाले की मी यशपाल शर्मासोबत क्रिजवर गेलो. 12 नंबरवर असलेला सुनील वॉल्सन आमच्या दिशेने धावत धावत क्रिजवर आला आणि म्हणाला की कपिल अजूनही वॉशरूममध्ये आहे आणि पुढचा नंबर त्यांचा आहे."
 
"परंतु वॉल्सनने सांगितलेल्या गोष्टीचा आमच्यावर परिणाम झाला नाही. इकडे मी पीटर रॉसनला फ्लिक करण्याच्या नादात झेलबाद झालो होतो. 17 धावांत आमचे 5 गडी बाद झाले होते. ड्रेसिंग रुममध्ये इतर खेळाडूंनी कपिलला पटकन फलंदाजीसाठी तयार केलं."
 
"मी मैदानावर परतत असताना कपिल मला आडवा आला. मी त्याच्याकडे बघणं मुद्दाम टाळलं. जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो तेव्हा मला दिसलं की गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्मा कोपऱ्यात तोंड पाडून बसले होते. बाहेर जाऊन सामना पाहण्याची आमच्यात हिंमत नव्हती."
 
कपिलच्या पहिल्या 50 धावांमध्ये एकही चौकार नाही
कपिल फलंदाजीसाठी क्रीझवर आले तोपर्यंत पीटर रॉसन आणि केविन करेन यांनी भारताच्या आघाडीच्या फळीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.
 
कपिल देव लिहितात, "पॅव्हेलियनमध्ये मदन लालची पत्नी अनु आणि रोमी सोबत येत होत्या. त्यावेळी मदन लालने त्यांना अडवलं आणि विचारलं की, तुम्ही इथे का आलात? हॉटेलवर परत जा. त्यावर अनु म्हणाली, का? यावर मदन लाल म्हणाला, 17 धावांवर आमचे 4 गडी बाद झालेत. दोघीही आश्चर्याने ओरडल्या, 'काय?' मग त्यांना दिसलं की यशपाल शर्माही झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत आहे. स्कोअरबोर्डवर भारताची धावसंख्या होती 5 बाद 17 धावा."
 
कपिल देव सावधपणे खेळू लागले. ते नेहमी खेळतात तसं खेळत नव्हते. त्यांच्या पहिल्या 50 धावांमध्ये एकही चौकार नव्हता.
 
त्यावेळी कपिल देव कसेबसे आपली अब्रू वाचवून भारताची धावसंख्या किमान 180 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होते.
 
त्यांना सोबत करण्यासाठी रॉजर बिन्नी होते. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या 77 पर्यंत नेली. 6 षटकांनंतर रॉसनला पाठवण्यात आल्यावर कपिल आणि बिन्नीच्या जीवात जीव आला.
 
त्यानंतर बिन्नी एलबीडब्ल्यू बाद झाले आणि एक धाव घेतल्यानंतर रवी शास्त्रीही पॅव्हेलियनमध्ये परतले.
 
कपिल देव यांनी मोर्चा सांभाळला
आतापर्यंत गोष्टी थोड्या सुरळीत झाल्या होत्या. कपिल देव विकेटच्या मागे कटिंग करून आणि समोरच्या गॅपमध्ये खेळून धावा जमवू लागले होते.
 
कपिल देव लिहितात, "मी क्रीजवर उभा राहून स्वत:ला सांगत होतो की तुला ही ओव्हर संपेपर्यंत खेळायचं आहे. इतक्यात मदन लाल माझ्याकडे येऊन म्हणाला, मी एक बाजू सांभाळतो, तुम्ही धावा काढा. 35 व्या ओव्हरनंतर जेव्हा दुपारचं जेवण झालं तेव्हा भारताची धावसंख्या होती 7 विकेटवर 106 धावा. मी 50 धावा काढल्या होत्या."
 
संदीप पाटील लिहितात, "आम्हाला जगाच्या नजरेपासून लपायचं होतं. वर जाऊन सामना पाहण्याची आमची हिंमत नव्हती. सुमारे 20 मिनिटांनी आम्हाला प्रेक्षकांचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर आणखी गोंगाट झाला. दर पाच मिनिटांनी आवाज येऊ लागला."
दुसरीकडे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर, यशपाल शर्मा आणि संदीप पाटील शून्यात बघत होते.
 
"भारताची आणखी एक विकेट पडली होती का? की चौकार किंवा षटकार मारला गेला होता? आम्हाला काहीच कळत नव्हतं. शेवटी श्रीकांतने वर जायचा निर्णय घेतला. यानंतर एक एक करून आम्हीही सामना पाहायला वरच्या मजल्यावर गेलो. यानंतर आमच्या डोळ्यांसमोर एक चमत्कार घडताना दिसला. हे आश्चर्य दुसरं तिसरं काही नसून आमचे कर्णधार कपिल देव होते."
 
त्यांनी भारताची बाजू सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि रॉजर बिन्नी, मदन लाल आणि सय्यद किरमाणी त्यांना मदत करत होते.
 
एकही भारतीय खेळाडू त्याच्या जागेवरून हलला नाही
वर येताना सुनील गावस्कर एका बार काउंटरचा आधार घेऊन उभे राहिले.
 
त्यांना येऊन कोणीतरी सांगितलं की, सनी, तू कितीतरी वेळ असाच उभा आहेस ?
 
यावर गावस्कर म्हणाले, "होय, जेव्हापासून कपिलने फलंदाजी सुरू केली, तेव्हापासून मी असाच उभा आहे. मला भीती वाटते की मी माझी जागा बदलली तर कपिल बाद होईल."
यशपाल शर्माही बराच वेळ गुडघे टेकून बसले होते.
 
जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "भारताचा डाव संपेपर्यंत मी असाच बसून राहीन."
 
कपिल देव लिहितात, "त्यावेळी गावस्करने आमच्या प्रशिक्षकाचा ड्रायव्हर बॉब याच्याकडे बोट दाखवलं. तो पण एका खुर्चीवर एक पाय ठेवून तसाच उभा होता. कपिल जोपर्यंत क्रिजवर आहे तोपर्यंत मी जागेवरून हलणार नाही असं तो म्हणाला होता. माझी पत्नी रोमी अनुला म्हणाली, आपण दुपारचं जेवण करायला नको, भारताच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रार्थना करू. अनुनेही याला होकार दिला."
 
कपिल देव यांनी दुपारचे जेवण सोडले आणि दोन ग्लास संत्र्याचा रस प्यायले
दुसरीकडे, दुपारच्या जेवणानंतर कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या संघाचा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. ते सर्व लोक बाहेर गेले होते.
 
कपिल लिहितात, "माझ्या खुर्चीजवळ पाण्याचा ग्लास ठेवण्यात आला होता. आमच्या संघात असा नियम आहे की जेव्हाही नॉटआऊट फलंदाज दुपारच्या जेवणासाठी पॅव्हेलियनमध्ये परततो तेव्हा संघाचा राखीव खेळाडू त्याच्यासाठी ताटात जेवण घेऊन येतो."
 
"त्या दिवशी माझ्या दुपारच्या जेवणाचा कोणताही मागमूस नव्हता. मला जेवणाच्या खोलीत जाऊन स्वतःच जेवण वाढून आणायचं होतं. मला समजलंच नव्हतं की माझे सहकारी माझ्याशी असं का वागत आहेत? नंतर मला समजलं की, माझ्या रागापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी असं केलं होतं. हे ऐकून मी मोठ्याने हसलो. त्यादिवशी मी दुपारच्या जेवणात काहीही खाल्लं नव्हतं आणि दोन ग्लास संत्र्याचा रस पिऊन पुन्हा मैदानावर उतरलो."
 
मदन लाल आणि किरमाणी यांची कपिलला साथ
दुपारच्या जेवणानंतर भारताची धावसंख्या 140 पर्यंत पोहोचली तेव्हा मदन लाल 17 धावा करून बाद झाले.
 
त्यांच्या जागी किरमाणी आले आणि या दोघांनी भारताचा डाव मजबूत करण्यास सुरुवात केली.
 
किरमाणी यांनी या आठवणीविषयी सांगितलंय की, "जेव्हा मी क्रीजवर पोहोचलो, तेव्हा कपिलने मला सांगितलं की, किरी भाई, आपल्याला 60 ओव्हर पर्यंत फलंदाजी करायची आहे. मी म्हणालो, 'कॅप्स, काळजी करू नको. आपण पूर्ण 60 ओव्हर खेळू. मी शक्य तितक्या स्ट्राइक द्यायचा प्रयत्न करतो. तुला प्रत्येक चेंडू खेळावा लागेल, कारण भारतीय संघात तुझ्यापेक्षा चांगला हिटर कोणी नाही.' आम्ही पूर्ण 60 ओव्हर खेळलो. मी आणि कपिल नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतलो."
 
कपिलने शेवटच्या षटकांमध्ये झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला
 
कपिल आणि किरमाणी यांनी मिळून शेवटच्या सात षटकात 100 धावा काढल्या. ते छोटंस मैदान होतं.
 
कॅरेनच्या चेंडूवर कपिलचा मिसहिट देखील मैदान ओलांडून स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांवर पडत होता.
 
कॅरेनच्या चेंडूवर जोरदार फलंदाजी होऊ लागली तेव्हा त्याने कपिल देव यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
 
कपिल लिहितात, "त्यामुळे मला आणखी राग आला. मी त्याला चिथावणी देऊ लागलो की जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याने माझ्यावर बाउन्सर टाकावा. जेव्हा मी त्याच्या एका बाउन्सरवर चेंडू स्टेडियमच्या बाहेर टोलवला, तेव्हा मी माझी बॅट कॅरेनला दाखवली. पुढच्या 18 चेंडूंवर मी तीन चौकार आणि तीन षटकार मारले आणि 49 व्या षटकात शतक पूर्ण केले."
 
भारताच्या 266 धावांच्या धावसंख्येमध्ये कपिलने 175 नाबाद धावा काढल्या होत्या.
 
बीबीसीने या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले नाही
कपिल जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतले तेव्हा गावस्कर यांनी पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढ्यात धरला आणि म्हणाले, "कपिल बॅड लक यार"
 
कपिल त्यांचं सांत्वन करत म्हणाले, स्कोर ठीक आहे. आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो.
 
गावस्कर म्हणाले, "मी त्याबद्दल बोलत नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे की हा खेळ जगात दुसऱ्या कोणी पहिलाच नाही. कारण आज बीबीसीमध्ये संप आहे, त्यामुळे या सामन्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं नाही. केवळ आम्हीच तेवढे नशीबवान ठरलोय, कारण हा सामना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय."
कपिल यांनी लिहिलंय, 'माझ्या मते, झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या मोठ्या खेळीपेक्षा माझे इतर काही खेळ चांगले होते. मी यात माझ्या नेहमीच्या शैलीत खेळलो नव्हतो. मी नेहमी डिफेन्स मध्ये खेळत नाही. पण शेवटच्या 10 षटकांमध्ये मी नेहमीप्रमाणे खेळलो."
 
सुनील गावस्कर यांनी या खेळीचा उल्लेख करताना त्यांच्या 'आयडॉल्स' या पुस्तकात लिहिलंय की, "मदन लाल आणि किरमाणी चांगली साथ देत आहेत, असा विश्वास पटल्यावर ज्या पद्धतीने कपिलने फलंदाजी केली त्याची तोड नाही."
 
"जेव्हा तो 160 वर पोहोचला तेव्हा आमची हृदये वेगाने धडधडू लागली. ग्लेन टर्नरचा 171 धावांचा विक्रम अगदी जवळ असल्याचं आम्हाला माहीत होतं. पण कदाचित कपिलला याची कल्पना नव्हती. मोठे शॉट्स खेळताना कपिलला हा विक्रम मोडता येणार नाही याची आम्हाला भीती वाटत होती."
 
"जेव्हा अंपायर बॅरी मेयर यांनी कपिलला सांगितलं की प्रेक्षक त्याच्या विश्वविक्रमासाठी टाळ्या वाजवत आहेत, तेव्हाच त्याला कळलं की त्याने एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा ग्लेन टर्नरचा विक्रम मोडला आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून कपिलला केवळ पाच वर्ष झाली होती."
 
भारताने 31 धावांनी विजय मिळवला
पण सामना अजून संपला नव्हता. झिम्बाब्वेची सुरुवातही चांगली झाली.
 
पहिली विकेट गमावण्यापूर्वी त्यांनी 44 धावा काढल्या होत्या.
 
पण यानंतर त्यांच्या विकेट पडत राहिल्या आणि एकवेळ त्यांनी 113 धावांत 6 विकेट गमावल्या.
पण त्यानंतर केविन कॅरेनने भारताला प्रत्युत्तर दिलं. भारतीय संघाने 56 व्या ओव्हर मध्ये कॅरेनला बाद केलं होतं पण तोपर्यंत त्याच्या 73 धावा झाल्या होत्या.
 
अखेर भारताने 31 धावांनी विजय मिळवला. कपिल देवला 'सामनावीर' म्हणून गौरविण्यात आलं आणि भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
रवी शास्त्री यांनी त्यांच्या 'स्टार गेझिंग' या पुस्तकात लिहिलंय की, "या खेळीने कपिल देव यांना क्रिकेट विश्वात अमर केलं होतं. या विजयाने भारतीय संघाच्या मनात विश्वचषक जिंकण्याची भावना निर्माण केली, आणि अवघ्या सात दिवसांत विश्वचषक जिंकला देखील."
 






















Published by- Priya Dixit