त्या निमित्ताने द्वारकानाथ संझगीरी यांनी
	"चहा"ला लिहीलेले पत्र मला आवडले ते खास तूमच्यासाठी ..........
				  													
						
																							
									  
	 
	पत्र लिहिण्यास कारण की,
	 
	चहा हे असं पेय आहे. जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सवर्च पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. “चहातरी घेऊन जा” असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या “रात्री सात नंतर चहा घेत नाही” असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजून चहाची येते. म्हणूनच हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र,
				  
	प्रिय चहाच्या कपास,
	 
	रोज सकाळी तुझी भेट झाल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही. तुझा घोट पोटात गेल्यावर पूर्णपणे डोळे उघडतात. एरवी ब्रश करणं, तोंड धुणं वैगरे प्रकार मी पेंगतच करत असतो. तुझा घोट पोटात गेल्याशिवाय वर्तमानपत्रातील अक्षरही मला नीट दिसत नाहीत. त्यानंतर दिवसभरात तुझी भेट बऱ्याचदा तरी नक्की होते. तुझी भेट झाल्याशिवाय ऑफिसात कामाला सुरुवात होत नाही. दुपारी तुझ्या आगमानाची मी चातकासारखी वात पाहत असतो. घरी गेल्यावर बायकोच्या हाताचा तुझा घोट तरतरी आणून साहेबाची बोलणी विसरायला लावतो. अलीकडे सातनंतर तुझा आस्वादघेण शिष्टसंमत नाही असं म्हणतात. शेवटी इतर पेयांनीही वाव हवाच ना! पण मला रात्री बारा वाजताही तुझी कंपनी नकोशी वाटत नाही. रात्री, “चला स्टेशनवर जाऊन चहा मारायचा का?” अशी साद दोस्तांना घातली तर नाही म्हणणारे अल्पसंख्याकअसतात आणि एरवी हा आला म्हणून घेतला, तो म्हणाला म्हणून घेतला, असं घेणं सुरूच असतं. तुला भेटायला चाललोय या सबबीखाली ऑफिसातून तास दोन तास गुल होता येत. आमच्या रिकाम्या खुर्चीकडे आलेल्या माणसाला चहाला गेलेत ही थाप सहज पचते.
				  				  
	 
	दिवसभरात तुझी वारंवार भेट होते कारण तू आमच्या आदरतिथ्याचा एक भाग आहेस. भेटायला आलेल्या माणसाला, “अर्धा कप चहातरी घेऊन जा, हे सांगायची आमची पद्धत आहो किंवा कुणी आदरतिथ्य केलंच नाही की आम्ही चिडून म्हणतो, इतक्या लांबून गेलो त्याच्याकडे, पण साधा चहा घेतो का, विचारलं नाही.” “कुणी तोंडदेखील तुझी ऑर्डर देऊन तू आला नाहीस की आम्ही पुटपुटतो  “ नानाचा चहा मागवलेला दिसतोय.” आमच्या अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेतही तू भर घातलीय. टू नसलास तर चहाच्या पेल्यातले वादळ हा वाक्प्रचार का झाला असता? लाच घेतानाही तुझा वापर सरार्स केला जातो. हुरळन जाऊ नकोस. त्यात तुझा काहीही संबंध नसतो. तुझं नाव वापरून केलेलं डील असतं. तू घरचाच ना,म्ह्णून तुझं नाव वापरलं जातं.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	तुझी माझी पहिली भेट कधी झाली ते मला आठवत नाही. पण नंतर आजतागायत कधी ताटातूट झाली नाही. असिडीटी झाली तरी गोळी घेतो,पण तुझी संगत सोडत नाही. सुदैवाने चहानिषिद्ध या संस्कृतीत मी लहनपणी वाढलो नाही. माझ्या वडिलांचा दिवसाकाठी १०-१५ कप चहा व्हायचा. घरी माणसांची वर्दळ प्रचंड असायची. त्यामुळे तुझं आधण कधी स्टोव्ह आणि  नंतर गॅसवरून उतरलच नाही. तू आलास की पाठोपाठ बिस्किटं येतात. बिस्कीटाला काय किंवा पावाला काय तुझ्यात न्हाऊ घातल्याशिवाय मला खाण जमतच नाही. पाव तर आंघोळ घालून पिळूनच मग घशात उतरतो. मला एक मित्र नेहमी सांगतो, “ अरे वेड्या, बिस्कीट कुरकुरीत करण्यासाठी फार मोठा खर्च केला जातो आणि टू ते चहात बुडवून एका क्षणात लिबलिबीत करतोस?” आधी बिस्कीट तोंडात टाकायचं मग तुझा घोट घ्यायचा ही स्टाईल माझी नव्हे. टू बिस्किटाच्या अणुरेणूत शिरलास की बिस्कीटाला वेगळीच चव येते.
				  																								
											
									  
	 
	.तुझी सवय झाली की तू हळूहळू आमच्या रक्तात शिरून तिथून तुला हुसकावण कठीण असतं. हे जास्त तुझ्या कृष्णवर्णीय बहिणीबद्दल म्हणजे कॉफीबद्दल म्हटलं जातं. पण का कुणास ठाऊक ती आमच्या घरात कधी नांदलीच नाही. इंग्लड –अमेरिकेला गेल्यावर तिच्या वेगवेगळ्या रुपाची चव मी घेतो, नाही असं नाही. ती मनात रुतून राहणारी प्रेयसी नाही. ती कॅज्युअली भेटणारी मैत्रीण आहे. तुझी सवय सोडणं कठीण असतं. तुझी ओढ ठायीठायी वाटते. विचार करताना तू हवास. काही लिहित बसायचं? तू हवाच. हे पत्र लिहितानाही टू बाजूच्या पेल्यात वाफाळतोयस. थकून आलो. मनाला तरतरी आणायलाही तूच आणि पोटावर प्रेशर आणायलाही तूच.
				  																	
									  
	 
	आणि तुला हुस्कावायाचा प्रश्नच कुठे येतो? लहानपणी आम्हाला शिकवलं गेलं की तुझ्या टॅनिन नावाच विष असतं म्हणून चहा जास्त पिऊ नये. शुद्ध वेडेपणा ! अरे! विष कशात नाही? श्रीखंडात साखर असते. ती वाईट. मधुमेह होऊ शकतो. पापड तर तेलकट आणि खारट, थेट ब्लड प्रेशरच हात पसरून स्वागत! मद्याचा लिव्हरवर प्रचंड राग. अरे असा विचार केला ना, तर फक्त  तुळशीचा रस आणि आळशीचा काढा घ्यावा लागेल. पण तुला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अलीकडे असा शोध लागलाय की तुझ्यात असा एक गुण आहे ज्यामुळे हृदयविकार सहसा जवळ येत नाही. किती बरं वाटलं मला. वाईन आणी टू माझ्या सर्वात आवडत्या पेयांच्या कपाळावरचा डाग पुसला गेला.
				  																	
									  
	 
	तू खरा समाजवादी आहेस (आमच्या मुलायमसिंहसारखा नाहीस) मोठ्या बिझनेसमनपासून उघड्या कामगारापर्यंत कुणीही तुझा आस्वाद घेऊ शकतं. फक्त तुझा पोशाख बदलतो. पंचतारांकित हॉटेलात तुझ आगमन नक्षीदार किटली नी कपातून होतं. कामगार,टपरीवरचा चहा तुटलेल्या कानाच्या कपातुनही पितो. तुला सांगतो. आम्हा मुंबईकरांच्या दुपारच्या सवयी उडप्याने आणि रात्रीच्या सवयी क्वार्टर सिस्टीम आणि डान्स बारवाल्या शेट्टींनी बदलल्या. पण तुला आमच्यापासून कुणीही दूर घेऊन जाऊ शकलं नाही. अगदी उडप्याच्या दुकानातून येणारा कॉफीचा वाससुद्धा! आम्ही मुंबईकर चहा कधीही पितो. तो एकवेळ तीर्थप्रसाद नाकारेल. पण तुला नाकारणार नाही. मुंबईत माणसाला काहीही करायला जमलं नाही. तर तुझी टपरी टाकावी कुठल्याही नाक्यावर! ती चाललीच पाहिजे. धडा नाही म्हणून टपरी बंद झाली असं कधी घडलेलं नाही. अस्सल मुंबईकर  तुझा आस्वाद घेताना कप कसे आहेत? तुला  काळकुट्ट फडक्यातून गाळलय  की गाळण्यातून ? भांड्यांना किती वर्ष कल्हई केलेली नाही? कप नीट धुतले जातात की एका पाणी भरलेल्या बादलीत बुचकळले जातायत? याचा विचार करीत नाही. त्याला दूधही कुठलंही चालतं. म्हशीच पावडरचं किंवा हायकिंगसाठी डोंगरमाथ्यावर गेल्यावर शेळीसुद्धा. त्याचा मतलब असतो तो तुझ्या उकळत्या पावडरशी!
				  																	
									  
	 
	तुझे वेगवेगळे अवतार मी पाहिले आहेत. तुझा तो साहेबी, चिनी किंवा हिरवा अवतार मला तितकासा आवडत नाही. तुझा साहेबी अवतार तर अतिनेमस्त. साहेबांच्या देशात तुला थंड करूनही पितात. ते काय कोंबडीसुद्धा थंड करून खातात. आपल्याला भाजी काय? वडे काय? भात-चपातीसुद्धा गरम लागते. आणि बऱ्याच गोष्टी गरम लागतात. पण इथेच थांबतो. तुला बर्फाळलेल्या अवस्थेत तर मी स्वीकारुच शकत नाही. तुझे खरं व्यक्तीमत्व घडवलं आम्ही मुंबईकरांनी. तुझ्यात तिघांनी क्रांती केली. १) स्टेशनबाहेरच्या टपऱ्या , २) लक्ष्मी विलास हॉटेल आणि ३) इराणी हॉटेल. कोको टी , चॉकलेट टीपासून कुठलाही स्वाद असलेला टी स्टेशन बाहेरच्या टपऱ्यात पहाटे तीनलाही मिळतो. अजून बियर टी किंवा व्हिस्की टी आलेला नाही. पण येईलही. अशक्य हा शब्द तुझ्या बाबतीत वापरता येत नाही. “हॉटेल” हे तुझ्यावर आणि फार तर खारी बिस्किटावर चालू शकतं. हे लक्ष्मी विलास हॉटेलानी दाखवलं.  आजही विलास करण्याएवढी लक्ष्मी त्यांच्या खिशात पडत असावी. तुझी वेगवेगळी रूपं मी तिथे पाहिली आहेत. पण केशरी, उकाळा ही भानगडच वेगळी. एखाद्या तुझ्या रुपाला बासुंदी चहा नाव का देत नाही ते कळत नाही. काही वेळी तो इतका दुधाळलेला आणि गोडच असतो की बासुंदीत तुझी पावडर टाकल्यासारखी वाटते.
				  																	
									  
	 
	पण माझ्या तारुण्यात, भावविश्वाचा एक भाग बनल होते ते इराण्याच हॉटेल. बन मस्का किंवा ब्रून मस्का आणि तू त्या संगमरवरी चेहऱ्याच्या लाकडी टेबलावर आलास की पूर्णब्रम्ह म्हणजे काय ते कळायचे. तुझ्या सानिध्यात तिथे बसून तासनतास गप्पा व्हायच्या. कधी राजकारणावर, कधी नाटक सिनेमांवर , कधी क्रिकेटवर आणि पोरीबाळी हा तर हक्काचा विषय. भैरवीशिवाय मैफल संपत नाही तशी त्या चहाशिवाय आमची मैफल संपायची नाही. सेनाभवनासमोरच्या इराण्यात बसून मी किती तरी लेख लिहिले आहेत. तो इराणी जाऊन चंद्रगुप्त हे हायफाय हॉटेल आलं तेव्हा माझ्या आठवणींच्या पुस्तकातील पानं कुणा धनदांडग्याने क्रूरपणे टरकावल्यासारखी वाटली. पण तुझ्यातला प्रामाणिकपणा  समाजवादी मी तिथे अनुभवला. दोन कपात आम्ही चारजण सहज तास दोन तास बसायचो. पाचपानी किंवा बारापानी असं तुला कितीवेळा उकळलं गेलेय हे सांगायचा प्रामाणिकपणाही मला इथेच पाहायला मिळाला. पाणी कम चहा ही इथलीच आवृत्ती. त्यातून टपरीवर कटिंगची कल्पना फुलली असावी. पण तुला कपभर प्यायची गरज नाही इथे जाणवलं. तुझी कटिंग किंवा पानी कमची किमत ही पैशाची शेवटची किमत दाखवते. त्याखाली एखादं चॉकलेट किंवा बडीशेपशिवाय काही मिळत नाही. इराण्यातलं पानी कम हे तुझं मला सर्वात आवडणार रूप. त्यात अंड्याचा बलक घालतात असं म्हटलं जायचं. ते कावळ्याच अंड असलं तरी चालेल मला, पण चव तीच हवी.
				  																	
									  
	 
	माझ्या समाजवादी मित्रा, हे कशाया पेया, तुझे कौतुक करायला माझी प्रतिभा करिश्माच्या कपड्यांपेक्षाही तोकडी पडली. पण मध्यंतरी माझ्या एका मित्राने एका गावात भिंतीवर तुझ्याबद्दल लिहिलेल्या चार ओळी वाचल्या आणि मला सांगितल्या. तो कवी अनामिक असेल, पण जे मी लांबलचक पत्रातून सांगू शकलो नाही ते त्याने चार ओळीत सांगितलं.  तर एक तुझं कौतुक –
				  																	
									  
	 
	“चाय चतुर्भज कप नारायणा, वशी प्रभू की माया
	फुक मारकर जो पिया वो, अडसठ तीर्थ नहाया “