शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (15:36 IST)

जिंद कौर : शीख साम्राज्याची राणी, जिने 1857 पूर्वी ब्रिटिशांशी लढा दिला

jind kaur
खुशहाल लाली
"तुम्ही मला कैदेत टाकलं, चहूबाजूंनी संताळांचा पहारा बसवला. तुम्ही विचार केला की, राणी जिंदला डांबून ठेवता येईल. पण मी जाते आहे. मी तुमच्या नाकाखालून निसटून जाते आहे."
 
लेखिका चित्रा बॅनर्जी यांनी त्यांच्या 'द लास्ट क्वीन' या पुस्तकात हा उतारा दिला आहे. महाराणी जिंद कौर (जिंदा) यांनी तुरुंगाच्या वॉर्डनला लिहिलेलं हे व्यंग्यात्मक पत्र आहे.
 
महाराणी जिंद कौर यांनी मिर्झापूर येथील चुनार किल्ल्याच्या तुरुंगातून पळून जाताना हे पत्र लिहिलं होतं.
 
जिंद कौर यांना सुरुवातीला लाहोरच्या किल्ल्यात कैदी म्हणून ठेवण्यात आलं. नंतर शेखूपुरा तुरुंगात आणि नंतर पंजाबमधून उत्तरप्रदेशात पाठवण्यात आलं.
 
औरंगजेब कोण होता? 300 वर्षांनंतरही त्याचं नाव का काढलं जातंय?
10 जून 2023
शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटली...
6 जून 2023
संभाजी भिडे हे खरंच अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्डमेडलिस्ट आहेत का?- फॅक्ट चेक
29 जुलै 2023
जिंद कौर या महाराजा रणजित सिंह यांच्या सर्वात तरुण आणि धाकट्या पत्नी होत्या. रणजित सिंह यांच्या अनेक राण्या असल्या तरी जिंद कौर ही त्यांची पट्टराणी होती.
 
रणजितसिंहांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी शीख राज्य बळकावण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना महाराणी जिंद कौर यांनी कडाडून विरोध केला.
 
राणी जिंद कौरवर 'बाघी राणी' हा माहितीपट बनवणारे प्रसिद्ध निर्माते मायकल सिंग यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "महाराणी जिंद कौर यांनी आपला मुलगा दलीप सिंह यांना केवळ जिवंतच ठेवलं नाही तर पंजाबचं सिंहासन मिळवण्यासाठी वाघिणीप्रमाणे लढा दिला. ''
 
इंग्रजांशी लढण्याचं आवाहन
चित्रा बॅनर्जी त्यांच्या पुस्तकात लिहितात की, पहिल्या अँग्लो-शीख युद्धातील पराभवानंतर लाहोरमध्ये खालसा दरबार भरणं बंद झालं होतं. त्यामुळे निराश आणि दुखावलेल्या सेनापतींचं एक प्रतिनिधी मंडळ दिवान-ए-आम मध्ये पोहोचलं.
 
ते म्हणाले, "आम्ही तुमच्यासाठी आमचा जीव धोक्यात घालतोय. आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे."
 
त्यावेळी रणजितसिंहांचा धाकटा मुलगा दलीप सिंह अवघ्या पाच वर्षांचा होता आणि त्याला गादीवर बसवलेलं. ती परिस्थिती पाहून तो खूप घाबरला. पण महाराणी जिंद कौर यांनी त्याला सांभाळून घेतलं.
 
त्या पडद्यामागून लोकांना म्हणाल्या, "तुम्ही मला तुमचे कपडे द्या आणि मी माझे कपडे तुम्हाला देते. तुम्ही राजवाड्यात राहा आणि मी तुमच्या जागी युद्धात उतरेन आणि खर्‍या खालसा सैनिकाप्रमाणे लढून मरेन."
 
महाराणीच्या या आव्हानाने युद्धात हरलेल्या लोकांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झालं. जे बंडखोरी करण्याच्या तयारीत होते त्यांचाही सूर बदलला. त्यातलाच एकजण म्हणाला, "आम्ही लढू, आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. आणि बलिदानाची वेळ आलीच तर आमच्या मातृभूमीसाठी आम्ही प्राण द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही."
 
भारत सरकारच्या "आजादी का अमृत महोत्सव' या संकेतस्थळावर जिंद कौर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, "महाराणी जिंद कौर 1843 ते 1846 या काळात शीख साम्राज्याच्या शेवटच्या महाराणी होत्या. त्या शीख साम्राज्याचे पहिले महाराजा रणजित सिंह यांच्या सर्वात धाकट्या पत्नी आणि शेवटचे महाराज दलीप सिंह यांच्या आई होत्या. इतर शीखांप्रमाणे त्यांनीही दोन गोष्टी केल्या, राज्य करणं आणि बंड करणं."
 
महाराणी जिंद कौर यांना राणी जिंदा या नावाने देखील ओळखलं जातं. सुरुवातीला त्या रणजित सिंहांची पत्नी म्हणून आल्या आणि अखेरीस शीख राज्याच्या सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या राणी बनल्या.
 
अनेक इतिहासकारांनी त्यांना 'राणी माई' किंवा 'राणी मां' असं म्हटलंय. पण भारतातील ब्रिटिश राजवटीने तिला 'पंजाबची मेसालिना' हे नाव दिलं. भारत सरकारच्या अधिकृत माहितीनुसार जिंद कौर आणि रोमन सम्राज्ञी व्हॅलेरिया मेसालिना यांच्यात फारसं साम्य नव्हतं.
 
चित्रा बॅनर्जी यांनी त्यांच्या 'द लास्ट क्वीन' या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, महाराणी जिंद म्हटल्या होत्या की, "ब्रिटिश मला 'पंजाबची मेसालिना' म्हणतात. यामागे गुलाबसिंहचं कारस्थान आहे." रोमची राणी मेसालिना तिचं साम्राज्य पुन्हा स्थापण्याचा कट रचण्यासाठी आणि तिच्या घायाळ करणाऱ्या अदांसाठी प्रसिद्ध होती.
 
अमृत महोत्सव संकेतस्थळावर असं म्हटलंय की, "जिंदची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि पंजाबवर आपली सत्ता स्थापनेसाठी ब्रिटिशांनी जिंद कौरची तुलना मेसालिनाशी केली."
 
जेव्हा जिंद कौरने पंजाबचं नेतृत्व केलं
पृथ्वीपाल सिंह कपूर यांनी द मेजर करंट्स ऑफ द फ्रीडम स्ट्रगल इन पंजाब या पुस्तकात लिहिलंय की, रणजीत सिंह यांनी जिंद कौरच्या अप्रतिम सौंदर्यामुळे आणि धार्मिक स्वभावामुळे त्यांच्याशी लग्न केलं होतं.
 
त्यांनी रणजित सिंहांच्या धाकट्या मुलाला जन्म दिला आणि 10 महिन्यांनंतर महाराजांचं निधन झालं.
 
रणजित सिंह यांचा मोठा मुलगा खडक सिंह, नातू नौनिहाल सिंह यांच्या मृत्यूनंतर, महाराजा शेर सिंह, कंबर प्रताप सिंह आणि राजा ध्यानसिंह यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर राणी जिंद कौर यांचा पाच वर्षांचा मुलगा दलीप सिंह यांना गादीवर बसविण्यात आलं आणि जिंद कौर पडद्यामागून राज्यकारभार बघू लागल्या.
 
कपूर लिहितात, "जिंद कौर यांना संरक्षक बनवल्यानंतर राज्यातून आणि बाहेरून तीव्र विरोधाला सामोरं जावं लागलं."
 
यात पहिले विरोधक होते ब्रिटिश आणि दुसरे त्यांना भेटायला आलेले दरबारी. याच दरबाऱ्यांनी राणीविरुद्ध कट रचला होता. परंतु राणीने दलीप सिंहच्या किशोरवयीन कारकिर्दीत लाहोरमध्ये ब्रिटिश सैन्य तैनात करण्यास मान्यता दिली नाही शिवाय वैरोवाल कराराच्या मसुद्यालाही मान्यता दिली नाही.
 
शिरोमणी समितीने प्रकाशित केलेल्या "प्रसिद्ध शीख व्यक्तिमत्त्व" या पुस्तकात जिंद कौर यांच्याविषयी सिमरन कौर यांनी एक लेख लिहिलाय. त्या लेखानुसार "पहिल्या अँग्लो-शीख युद्धानंतर 15 डिसेंबर 1849 रोजी, जेव्हा लाहोरमध्ये तह सुरू होता तेव्हा दिवाण दिनानाथ यांचं मत होतं की, यात राणीचाही सल्ला घेतला पाहिजे. तेव्हा फ्रेडरिक क्युरी म्हणाले होते की, "गव्हर्नर जनरल हे सरदारांचे आणि शीख राज्याच्या स्तंभांचे मत लक्षात घेतात, राणीचे नाही."
 
सत्तेबाहेर असलेल्यांना कैद केलं
महाराणी जिंद यांनी राज्याविरोधात शिजणाऱ्या कारस्थानांना कडाडून विरोध केला होता. त्यांना सर्वसामान्यांचा पूर्ण पाठिंबा होता. परंतु जेव्हा इंग्रजांनी तेजसिंहला वजीर पदावर बसवलं आणि महाराजा दलीपसिंहाला त्यास मान्यता द्यायला सांगितली तेव्हा दलीपसिंहाने महाराणी जिंदच्या सूचनेनुसार तसं करण्यास नकार दिला.
 
यानंतर महाराणी जिंद आणि दलीपसिंह यांना शाही किल्ल्यात कैद करण्यात आलं. पृथ्वीपाल सिंह कपूर लिहितात, "पंजाबचे गव्हर्नर हेन्री लॉरेन्स आणि त्यांच्या दरबाऱ्यांनी राणीला नव्या प्रशासनातून बेदखल करण्याची योजना आखली होती."
 
"दरम्यान, राणीला शाही किल्ल्याच्या एका बुरुजात कैदी म्हणून ठेवण्यात आलं होतं." खालसा दरबाराचा बराच काळ विरोधक असलेल्या अफगाण शासक दोस्त मुहम्मद याला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत सिमरन कौर लिहितात, "महाराणीचा इतका छळ झाला की तिला साधं पाणीही दिलं नाही. तिला भयंकर यातना देण्यात आल्या."
 
बंडखोरीची प्रेरणा
महाराणी जिंद खालसा दरबारच्या समर्थकांना आणि सहानुभूतीदारांना पत्र लिहून त्यांच्यावर लादलेल्या अटीची माहिती देत राहिल्या. याचा जनतेवर खोलवर परिणाम झाला आणि या कारणास्तव इंग्रजांनी महाराणीला लाहोरबाहेर पाठवलं.
 
त्यांना दलीप सिंहपासून वेगळ करण्यासाठी शेखूपुरा कारागृहात ठेवण्यात आलं. इथे त्यांना एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे वागवलं. त्यांचा माही नावाचा एक सहाय्यक होता. त्याला खालसा दरबारातील एक निष्ठावान गुप्तहेर, अवतार यांनी कसंबसं तुरुंगात पाठवलं होतं.
 
महाराणी जिंद यांनी आपल्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबाबत पत्र लिहून ते पत्र सार्वजनिक केलं. त्यानंतर पंजाबमध्ये इंग्रजांविरुद्ध बंड झालं. खालसा आपल्या 'माई'च्या अपमानाने संतापला.
 
चित्रा बॅनर्जी लिहितात, "मुलतान मधील मूळ राज्याला बंड करण्यासाठी शेरसिंह अटारीवाला आणि त्याचे वडील चतर सिंह यांनी चिथावणी दिली होती. त्यांनी सैन्य उभं करून राम नगर येथे इंग्रजांवर हल्ला केला. दोस्त मुहम्मद यांनी आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली अफगाण घोडदळाची एक तुकडी मदतीसाठी पाठवली."
 
आता पंजाबला पुन्हा स्वातंत्र्य मिळेल असं वाटतच होतं, पण इंग्रजांनी संपूर्ण भारतातून सैन्य तैनात केल्यामुळे आणि जम्मूचा राजा गुलाबसिंह याने पुन्हा एकदा विश्वासघात केल्यामुळे हा विजय मिळू शकला नाही.
 
शीख सैन्य शौर्याने लढले. शेरसिंहचे तीन घोडे लढताना मारले गेले, सैन्याचा दारूगोळा संपला आणि शेवटी अटारीवालाला शरणागती पत्करावी लागली. भाई महाराज सिंह यांच्यासारखे धार्मिक नेतेही बंडात सामील झाले होते असं काही लोक म्हणतात. त्यात हेन्री लॉरेन्स आणि तेज सिंह यांच्या हत्येचा कटही रचण्यात आला होता. पण ही माहिती फुटल्यामुळे हा कट पूर्णत्वास गेला नाही.
 
कपूर लिहितात, "पंजाबमध्ये इंग्रजांविरुद्धच्या सुरुवातीच्या बंडांमागे महाराणी जिंदचा हात होता. आणि भाई महाराज सिंह हे त्या बंडाचे सर्वेसर्वा होते. त्यावेळी ब्रिटीश सरकारने भाई सिंह यांच्यावर एक लाख रुपयांचा इनाम ठेवला होता."
 
स्वातंत्र्याची पहिली लढाई?
वरिष्ठ पत्रकार जगतार सिंग आणि गुरदर्शन सिंह बहिया यांनी त्यांच्या 'कालापानी' या पुस्तकात पंजाब आणि पंजाबींशी संबंधित स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख केला आहे. भाई महाराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेलं बंड आणि जिंद कौर यांनी केलेले प्रयत्न याला लेखकाने स्वातंत्र्याची पहिली लढाई असं म्हटलंय.
 
1849 मध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढलं गेलेलं युद्ध हे सध्याच्या भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये लढलं गेलेलं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असल्याचं बरेच इतिहासकार सांगतात. ते लिहितात, "1857 च्या उठावाला पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणणं वादाचा मुद्दा आहे. पंजाबशी संबंधित इतिहासकारांनी दुसऱ्या अँग्लो-शीख युद्धाला (1849) भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटलंय."
 
मात्र, पंजाबी आणि शीख इतिहासकारांच्या या मताला भारतात राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही. भारतातील 1857 च्या उठावालाच भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटलं जातं.
 
नेपाळमधून सत्तेसाठी प्रयत्न
महाराणी जिंद कौर चुनार तुरुंगातून साध्वी म्हणून निसटल्यानंतर नेपाळमध्ये पोहोचल्या. नेपाळमध्ये अद्याप ब्रिटीश साम्राज्याची वसाहत नव्हती. नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान जंग बहादूर यांनी त्यांना आश्रय दिला, ज्यामुळे भारत सरकारसाठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.
 
पृथ्वीपाल सिंह कपूर लिहितात, "नेपाळमध्ये असताना महाराणी जिंद कौर यांनी पंजाबच्या बंडखोरांशी आणि अलाहाबादमध्ये बंदिस्त असलेल्या राजकीय कैद्यांशी संपर्क साधला. त्यांना पंजाबमधील ब्रिटिश सत्तेला हाकलून लावायचं होतं. त्यांना सर्व शक्यता पडताळून पाहायच्या होत्या, पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही."
 
त्यांनी येथूनच दलीप सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत राणीचे जंगबहादूरशी संबंध बिघडले होते आणि त्यांची दृष्टीही खराब झाली होती. पण त्यांनी अमृतसर आणि पाटणा येथील आपल्या लोकांमार्फत दलीप सिंहशी संपर्क प्रस्थापित केला.
 
कपूर यांच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा 1857 चा उठाव सुरू झाला तेव्हा जिंद कौरने पंजाबमधील बंडखोरांना पत्र लिहिली आणि बनारस आणि अलाहाबाद येथील भारतीय रेजिमेंटच्या कमांडरशी संपर्क साधला. त्यांनी या पत्रात सांगितलं की, ब्रिटिशांकडे भारतात लढण्यासाठी पुरेसे सैनिक नाहीयेत. "
 
जिंद कौरच्या भारतातील ब्रिटीश विरोधी कारवायांमुळे कंटाळलेल्या दलीप सिंह यांना अखेर 1860 मध्ये त्यांच्या आईला इंग्लंडला घेऊन जाण्याची परवानगी मिळाली.
 
मात्र, तोपर्यंत दलीपसिंह पूर्णपणे इंग्रजांच्या रंगात रंगले होते.
 
दलीप सिंहचा कायापालट
ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार, आई आणि मुलगा (जिंद कौर आणि दलीप सिंह) एप्रिल 1861 मध्ये भेटले. पण जेव्हा राणीने दलीप सिंहला केस कापलेलं पाहिलं तेव्हा त्या घाबरल्या. सिमरन कौर लिहितात की, जेव्हा आई जिंद आपल्या मुलाला भेटल्या तेव्हा त्यांनी त्याला तीन गोष्टी सांगितल्या.
 
तुमचा धर्म शीख धर्म आहे. तुम्हाला अमृत चाखून पुन्हा सिंहासनावर बसलं पाहिजे. (पुन्हा शीख बनलं पाहिजे)
 
इंग्रजांनी तुमची फसवणूक करून राज्य लुटलं आहे
 
त्यावेळी भैरोवाल कराराला मान्यता मिळाली होती. या करारानुसार इंग्रज तुमचे पालक होते आणि ते तुम्हाला गादीवरून हटवू शकत नव्हते.
 
सिमरन कौरने त्यांच्या लेखात दावा केलाय की जिंदच्या प्रेरणेमुळेच दलीप सिंह पुन्हा शीख बनले.
 
इंग्लंडमध्ये येऊनही दलीप सिंह यांना जिंदला भेटू दिलं नव्हतं. दरम्यान जिंद यांची तब्येत सतत खालावत होती, त्यामुळे दलीप सिंह यांनी त्यांना यॉर्कशायरमधील मलग्रोव्ह कॅसलमध्ये आणण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली. हा कॅसल त्यांनी लॉर्ड नॉर्मंडीकडून भाडेतत्त्वावर घेतला होता. त्यांना आपल्या आईला तिथे आणण्याची परवानगी मिळाली.
 
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये समाधी
इथे जिंद यांनी दलीपसिंहला शीख राज्यासोबत झालेल्या विश्वासघाताच्या कथा सांगितल्या. त्यांनी दलीप सिंह यांना आई आणि मुलाची वेदनादायक कथा सांगितली. शेवटी त्यांनी आपल्या मुलाला गोर्‍यांच्या भूमीवर स्वतःचं अंत्यसंस्कार न करण्याचा सल्ला दिला. 1863 मध्ये त्यांचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाला.
 
आपल्या आईच्या इच्छेचा आदर करण्यासाठी दलीप सिंह त्यांचा मृतदेह घेऊन भारतात आले. परंतु सरकारने त्यांना पंजाबमध्ये येऊ दिलं नाही. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एक छोटीशी समाधी बांधण्यात आली.
 
नंतर दलीपसिंह यांची मुलगी राजकुमारी बंबा यांनी आपल्या आजीच्या अस्थी तिथून बाहेर काढल्या आणि महाराजा रणजित सिंह यांच्या समाधीमध्ये ठेवण्यासाठी लाहोरला नेल्या.
 
भले ही महाराणी जिंद यांची समाधी आधी महाराष्ट्र आणि नंतर लाहोरमध्ये बांधली असेल, पण महाराणी जिंद या पंजाबच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. आणि इतिहास त्यांना कायम नायिका म्हणूनच स्मरणात ठेवेल.