शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन

विश्वधर्माचा पाईक

१२ जानेवारी १८६३.पूर्व क्षितिजावरून सूर्याने अजून सृष्टीकडे कटाक्षही टाकला नसेल तोच ६ वाजून 33 मिनिटे आणि 33 सेकंदाच्या बह्ममुहूर्तावर भुवनेश्वरीदेवींचे घर उजळून निघाले. वीरेश्वराला मागितलेला मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. या मुलाचा जन्म ज्या मुहूर्तावर झाला तो दिवस भारतीयांसाठी पवित्र सणासारखा आहे. तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा..

या मुलाच्या जन्मदिवशी सर्वत्र आनंद असावा अशी जणू परमेश्वरी इच्छाच असावी. हा असामान्य बालक म्हणजे भुवनेश्वरी देवींचा 'बिल्ले'. बंगाली लोकांचा नरेंद्रनाथ (नरेन) आणि तमाम भारतीयांचे श्रध्दास्थान 'स्वामी विवेकानंद'.

हा मुलगा पुढे जाऊन भारतीय तत्त्वज्ञानाची ध्वजा जगभरात फडकवेल असे कुणालाही वाटले नसते. जणू ग्लानी आलेल्या हिंदू धर्माला जागे करण्यासाठीच या महापुरुषाचे आगमन झाले. हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा त्यांनी जगापुढे आणला. हिंदू संस्कृतीचा मानवकेंद्रीत विचार त्यांनी जगभरात पोहोचविला.

जगाला शांततेचा संदेश देणारा नरेन बालपणी मात्र खूप खोडकर होता. अशांतता त्याच्या मनात सतत धुमसत असे. 'जमदग्नी' ऋषींपमाणे राग सतत त्याच्या नाकावर असे. हा राग एवढा प्रचंड की कधी-कधी भुवनेश्वरी देवींना नरेनला शांत करण्यासाठी त्याच्या डोक्यावर थंड पाण्याचा मारा करावा लागे. हा जलाभिषेक होत असताना भुवनेश्वरी देवी सतत 'शिव' चा उच्चार करत आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणात नरेंद्र ध्यानस्थ होत असे.

नरेंद्राची पहिली शाळा म्हणजे त्याचे घरच होते. वडील विश्वनाथ आणि आई भुवनेश्वरी यांच्या सोबतीलाच भुवनेश्वरी देवींची आई या तिघांनी नरेंद्रावर भगवद्गीता आणि वैष्णव पंथांचे संस्कार केले. बंगाली परंपरेनुसार वयाच्या सहाव्या वर्षी नरेंद्राला शाळेत दाखल करण्यात आले. पण तो शाळेत रमत नसे. १८७१ मध्ये नरेंद्राला दुसर्‍या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पं. ईश्वरचंन्द विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटिन इन्स्टिट्यूट या इंग्रजी शाळेत नरेंद्राला पाठवण्यास सुरवात झाली. पुढे दत्त कुटुंब रायपूरला स्थलांतरित झाले. पाहता पाहता नरेंद्राने बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले. शाळा ते महाविद्यालय हा नरेंद्राचा प्रवास आदर्शवत असला तरी त्याचे मन प्रचंड अस्थिर होते.

त्याच्या मनात सतत एकच विषय घोळत असे, परमेश्वर काय आहे? याचा शोध घेण्यासाठी तो तळमळू लागला. १८८१ मध्ये गुरू भेटीसाठी त्यांनी पहिल्यांदा पऱ्यांना केले. स्वामी रामकृष्ण हे पुराणमतवादी विचारसरणीचे होते. नरेंद्राने पहिल्या भेटीतच त्यांना प्रश्न केला आपण परमेश्वराला पाहिले आहे काय? त्यांच्या प्रश्नाने स्वामी रामकृष्ण काही क्षणासाठी स्तब्ध झाले. रामकृष्णांनी मानेनेच होकार देत तुला परमेश्वर पाहायचा का? असा प्रतिपश्न केला. नरेंद्राचा स्वामी विवेकानंद बनण्याचा प्रवास सुरू झाला तो इथून.