1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

घड्याळ फिरते उलट दिशेने

उलट दिशेने फिरणारे घड्याळ कधी पाहिले आहे का? नाही ना… छत्तीसगड भागातील आदिवासी जमातीतील लोक मागील बऱ्याच वर्षांपासून उलट दिशेने फिरणाऱ्या घड्याळाचा वापर करतात. ऐकून नवल वाटले ना? पण हे खरे आहे. छत्तीसगडमधील कोरबा, कोरिया, सरगुजा, बिलासपूर व जशपूर या काही जिल्ह्यातील आदिवासी लोक उजवीकडून डावीकडे काटे फिरणाऱ्या म्हणजे उलट दिशेने फिरणाऱ्या घड्याळांचा वापर करतात. सन 1980 च्या दशकात या भागात पृथक गोंडवाना आंदोलन झाले होते. या आंदोलना दरम्यान ही उलट दिशेने फिरणारी घड्याळे या आदिवासींना वाटण्यात आली होती.
 
या आदिवासी लोकांच्या म्हणण्यानुसार सूर्य पृथ्वीची परिक्रमा करताना ती उजवीकडून डावीकडे अशी करतो. तसेच शेतीसाठी वापरली जाणारी नांगर, हातचक्‍की अशी काही यंत्रेही उजवीकडून डावीकडे फिरणारी आहेत. शिवाय लग्न आणि मृत्यूच्या क्रियेप्रसंगी घेतले जाणारे फेरेही उजवीकडून डावीकडे असेच घेतले जातात. असे असताना उजवीकडून डावीकडे फिरणारे घड्याळ हे चुकीचे कसे?